(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ZP Pension Scam : जिल्हा परिषद पेंशन घोटाळा; दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी, वरिष्ठांच्या भूमिकेवरही संशय
Nagpur News : महिला लिपिकाने केलेल्या घोटाळ्याने राज्य सरकार हादरलं आहे. राज्यात आता अशा किती मयत पेन्शनधारकांच्या नावे पेंशन सुरु आहे, याचा शोध घेणे गरजेचे असल्याची मागणी जोर धरत आहे.
Nagpur News : नागपूर जिल्हा परिषदेमध्ये नुकताच पेन्शन घोटाळा उघडकीस आला. या घोटाळ्याच्या तपासात दररोज नव नवीन खुलासे समोर येत आहेत. शिक्षण विभागातील महिला लिपिक सरिता नेवारे यांनी स्वतःच्या मृत पतीच्या बँक खात्याचा वापर करुन कोट्यावधी रुपयांची पेंशन लाटली असल्याचा आरोप आहे. तीन सदस्यांच्या समिती मार्फत या संपूर्ण प्रकाराची चौकशी सुरु आहे. मात्र आज झालेल्या स्थायी समिती बैठकीत जिल्हापरिषद पदाधिकाऱ्यांनी दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
नियमानुसार एक लिपिक एका ठिकाणी तीन वर्षापर्यंत काम करु शकतो. विभाग बदलीची मर्यादा ही पाच वर्षांची असते. असे असतांनाही सरिता नेवारे या गेल्या दहा वर्षांपासून एकाच विभागात, एकाच टेबलवर काम करत आहेत. त्यामुळे यात घोटाळ्यात वरिष्ठांची काय भूमिका आहे? याचा ही तपास होणे गरजेचे असून चौकशी झाल्यास अनेक नावे समोर येणार असल्याची जिल्हा परिषद वर्तुळात चर्चा सुरु आहे.
नागपूर जिल्हा परिषदेमध्ये पेन्शन घोटाळा उघडकीस आला असून सेवानिवृत्त मयत शिक्षकाच्या नावाने शिक्षण विभागाचे कर्मचाऱ्याने ही पेन्शन उचलत असल्याचे पुढे आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे मृत पेन्शनधारकांची रक्कम परस्पर वळती करण्यासाठी शिक्षण विभागातील महिला लिपिक सरिता नेवारे यांनी स्वतःच्या मृत पतीच्या बँक खात्याचा वापर केला. सध्या जिल्हापरिषद चे कार्यकारी अधिकारी यांनी या महिला लिपिकाला निलंबित केले आहे.
19 मयत शिक्षकांची पेंशन परस्पर वळती?
या नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी पंचायत समिती अंतर्गतच्या शिक्षण विभागामध्ये कार्यरत असलेल्या महिला लिपिक सरिता नेवारे आहे. त्या 2012 पासून सेवानिवृत्तांच्या पेन्शनचा टेबल सांभाळत होत्या. पारशिवनी पंचायत समिती अंतर्गत सुमारे 190 वर सेवानिवृत्त शिक्षक आहेत. त्यामुळे मयत सेवानिव्रुत्त शिक्षकाचा अहवाल शासनाकडे पाठवून ती पेन्शन बंद करणे सरिता नेवारे यांच्या कडून अपेक्षित होते. मात्र त्यांनी मयत सेवानिवृत्त शिक्षकाला जिवंत दाखवून पेन्शनची रक्कम आपल्या नातेवाईकाच्या खात्यात हस्तांतरित केली. यात जवळपास 19 मयत शिक्षकांच्या नावे ही पेंशन सुरु ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. धक्कादायक प्रकार उघडकिस आल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी सरिता नेवारे यांना निलंबित केले असून पेन्शन घोटाळ्याच्या चौकशीसाठी मुख्य वित्त व लेखा अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय चौकशी समिती नेमली आहे.
राज्यात किती मयत पेंशनधारकांची पेंशन सुरु?
चौकशी समितीने पारशिवनी पंचायत समितीत तपासणी करून कागदपत्रे ताब्यात घेतले असून चौकशी सुरु केली आहे. आज नागपूर जिल्हा परिषदच्या स्थायी समिती बैठकीत हा पेंशन घोटाळा गाजला असून जिल्हापरिषद उपाध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्यांनी दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. दर वर्षाच्या नोव्हेंबर महिन्यात पेन्शनधारक हयात आहे कि नाही याची पडताळणी केली जाते. असे असतांना जिल्हा परिषद मध्ये महिला लिपिकाने केलेल्या या घोटाळ्याने नागपूर जिल्हा परिषद सोबतच राज्य सरकार देखील हादरून गेले आहे. राज्यात आता अशा किती मयत पेन्शनधारकांच्या नावे पेंशन सुरु आहे याचा शोध घेणे गरजेचे असल्याची मागणी जोर धरत आहे.
हेही वाचा