आज जर देशात यूपीएचं सरकार असतं, तर देश चीनकडे गहाण राहिला असता; सुजय विखेंचा हल्लाबोल
Sujay Vikhe Patil on Inflation : आज जर देशात यूपीएचं सरकार असतं तर देश चीनकडे गहाण राहिला असता. महाआघाडी नव्हे तर महावसुली सरकार, असं म्हणत खासदार सुजय विखेंनी लोकसभेत हल्लाबोल केला आहे.
Sujay Vikhe Patil on Inflation : जगासह देशभरात वाढत असलेल्या महागाईवर काल अखेर लोकसभेत चर्चा झाली. यावेळी लोकसभेत बोलताना सुजय विखे पाटील यांनी युपीए सरकारवर निशाणा साधला. आज जर देशात यूपीएचं सरकार असतं तर देश चीनकडे गहाण राहिला असता. महाआघाडी नव्हे तर महावसुली सरकार, असं म्हणत खासदार सुजय विखेंनी (Sujay Vikhe Patil) लोकसभेत हल्लाबोल केला आहे.
भाजप खासदार सुजय विखे पाटील बोलताना म्हणाले की, "यूपीए असती तर आज देश गहाण असता, असं का म्हणालो? तर, चीननं कर्ज जाळं धोरण राबवलं आणि तब्बल 165 देशांना कर्ज देऊन त्यात अडकवलं. आता त्याच देशांना चीन कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतंय. कर्ज देऊन देशांना अडकवण्याचा प्रयत्न केला गेला. काँग्रेसनं 2008 मध्ये चायनातल्या सत्ताधारी पक्षासोबत एक एमओयु साइन केलं. त्यातील मुद्दे आजपर्यंत कधीच बाहेर आले नाहीत. त्याचबरोबर चीननं राजीव गांधी फाउंडेशनला अज्ञात देणगी दिली. याप्रकरणी चौकशीही झाली आहे. त्या काळात पैशाची गरज नसताना जर पैसे घेतले. आज जर युपीए असतं तर चायनाच्या या कर्ज जाळे धोरणात आपणही अडकलो असतो."
पाहा व्हिडीओ : महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कुणीही येवो, फडणवीस उपमुख्यमंत्री असणं समाधानकारक
"मोदी पंतप्रधान असल्यानं आपण कुठेही भीक मागायला गेलो नाही. कोरोना संकट झालं, रशियन-युक्रेन युद्धामुळं अनेक परिणामांचा सामना करावा लागला. पण आपला देश कुठेही देणग्या घेण्यासाठी गेला नाही. पण हेच जर युपीए असती तर मात्र आपला देश चीनकडे गहाण राहिला असता.", असं म्हणत सुजय विखे पाटलांनी युपीएवर हल्लाबोल केला आहे.
"यूपीए हा केंद्राचा विषय माझे वडील राज्यस्तरावर मंत्री होते. अनेकदा त्यांनी राज्य सरकारमध्ये असूनही शेतकरी विरोधी निर्णयांना कॅबिनेटमध्ये विरोध केला आहे. नगरमधल्या पाण्याचा प्रश्न मराठवाड्याला दिले जाण्याचा.", असंही ते म्हणाले. महागाईच्या चर्चेत सुजय विखे पाटील यांनी महाविकास आघाडीवरही टीका केली. याबाबत बोलताना ते म्हणाले की, "भ्रष्टाचाराचा संबंधही महागाईवर आहे. नगरमध्ये राष्ट्रवादीसोबत आमचा पाण्याचा संघर्ष कायम आहे. आमच्या सरकारच्या काळात आम्ही हा संघर्ष कायमचा संपवणार आहोत. उरलेल्या अडीच वर्षांच्या सत्तेत फडणवीस उपमुख्यमंत्री असणं हे आमच्यासाठी पुरेसं आहे."
"सुप्रिया सुळे यांच्या सरकारनं दारूवरचा कर कमी केला होता आणि पेट्रोलवरचा तसाच ठेवला, याचं उत्तर द्यावं. आरोप-प्रत्यारोपांमध्ये त्यांनी कविता सुंदर म्हटली. पण राष्ट्रवादीने दुधातून निघणारा कुठलाही पदार्थ सोडला नाही. राष्ट्रवादीने ना दूध सोडलं, ना लोणी सोडलं, ना तूप सोडलं, पैसा, भ्रष्टाचार, वेगवेगळ्या पक्षातून लोकांचे प्रवेश करणे, गुन्हे दाखल करून दबाव करणं ही यांची रणनीती. आम्ही तर किमान गाय सोडली, त्यांनी तर ती पण सोडली नाही.", असं सुजय विखे पाटील म्हणाले.