एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ऊस दराची कोंडी फुटली, कोल्हापुरातील आंदोलन मागे
सोमवारपासून कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखाने सुरु होणार आहे. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात होणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे चक्काजाम आंदोलन देखील मागे घेण्यात आले आहे. मात्र राज्यात इतर ठिकाणी आणि विशेषत: सांगली जिल्ह्यामध्ये होणाऱ्या आंदोलनावर स्वाभिमानी शेतकरी संघटना ठाम असल्याचे सांगण्यात आले आहे.
कोल्हापूर : यंदाच्या गळीत हंगामात एफआरपीची रक्कम, पहिली उचल म्हणून एकरकमी देण्याबाबत साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांमध्ये एकमत झाल्याने अखेर ऊस दराची कोंडी फुटली आहे. त्यामुळे सोमवारपासून कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखाने सुरु होणार आहे. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात होणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे चक्काजाम आंदोलन देखील मागे घेण्यात आले आहे. मात्र राज्यात इतर ठिकाणी आणि विशेषत: सांगली जिल्ह्यामध्ये होणाऱ्या आंदोलनावर स्वाभिमानी शेतकरी संघटना ठाम असल्याचे सांगण्यात आले आहे.
यावर्षीच्या गळीत हंगामात पहिली उचल एफआरपी अधिक 200 रुपये देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली होती. मात्र बाजारातील साखरेचे दर पाहता ऊसाला एफआरपी देणेही कठीण असल्याने साखर कारखानदारांनी कारखाने बंद ठेवले होते. त्यामुळे ऊसदाराची कोंडी निर्माण झाल्याने, यातून मार्ग काढण्यासाठी आज साखर कारखानदारांची बैठक झाली.
शेतकरी संघटनांनी केलेली मागणी, म्हणजे अवाजवी आहे. साखरेच्या दरात मोठी घसरण झाल्याने कारखाने अडचणीत आहेत. त्यामुळे एफआरपी अधिक 200 रुपये देणे कारखान्यांना शक्य होणार नाही. मात्र कायद्याने एफआरपी देणे बंधनकारक असल्याने, पहिली उचल म्हणून एफआरपीची रक्कम एकरक्कमी देण्याचा निर्णय साखर कारखानदरांच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत बैठक
मात्र हा निर्णय केवळ साखर कारखानदारांच्या बैठकीत झाल्याने, याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटने सोबत चर्चा करणे गरजेचे होते. त्यानुसार जवाहर साखर कारखान्याचे चेअरमन माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्वाखाली आमदार सतेज पाटील, तसेच शरद कारखान्याचे चेअरमन राजेंद्र पाटील-यड्रावकर आदींनी शासकीय विश्रामगृहात जावून, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेवून चर्चा केली.
शेतकऱ्याच्या ऊसाला अधिकचा भाव मिळायला हवा, याबाबत साखर कारखानदारांचे दुमत नाही. मात्र सद्यस्थितीत साखरेचे बाजारातील भाव पाहता, एफआरपी अधिक 200 रुपये देणे शक्य नसल्याचं साखर कारखानदारांच्या वतीने माजी मंत्री प्रकाश आवाडे आणि आमदार सतेज पाटील यांनी चर्चेवेळी सांगितले. त्यामुळे पहिली उचल म्हणून एफआरपीची रक्कम एकरक्कमी देण्याबाबत कारखानदार तयार असल्याच सांगण्यात आले. मात्र एफआरपी अधिक 200 रुपयांच्या मागणीवरचं स्वाभिमानी शेतकरी संघटना ठाम राहिली.
राजू शेट्टी यांच्यासोबत फोन वरून चर्चा
शिवाय गत वर्षीच्या हंगामातील, 200 रुपयांची रक्कम अनेक साखर कारखान्यांनी थकवली असल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांनी बैठकीत सांगितलं. त्यामुळे बैठकीत पुन्हा दराचा पेच निर्माण झाला. त्यामुळे खासदार राजू शेट्टी यांच्यासोबत फोन वरून चर्चा करण्यात आली. पहिली उचल म्हणून, एफआरपी एकरक्कमी देण्याबाबत कारखानदार तयार आहेत. यापुढे बाजारातील साखरेचे दर वाढल्यास मागील थकीत रक्कम देण्याबरोबरच, एफआरपी अधिक 200 रुपये देण्याबाबत देखील साखर कारखानदार तयार असल्याच सांगण्यात आलं. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं देखील हा तोडगा मान्य केल्याच माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी सांगितलं. शिवाय साखरेच्या दरात घसरण झाल्याने एफआरपी देणे शक्य होणार नसल्याने, सरकारने देखील साखर कारखानदाराना मदत करावी यासाठी मुख्यमंत्र्याकडे साकडे घालण्यात येणार असल्याचही यावेळी कारखानदारांच्यावतीने आवाडे यांनी स्पष्ट केलं.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांनी बैठकीत निघालेला तोडगा मान्य असल्याचं सांगितलं. त्यामुळे उद्या रविवारी होणारे चक्काजाम आंदोलन कोल्हापूर जिल्ह्यात होणार नसल्याचंही त्यांनी जाहीर केलं. मात्र महाराष्ट्रात इतर ठिकाणी आणि विशेषत: सांगली जिल्ह्यात उद्या रविवारी चक्का जाम आंदोलन होणार असून कोल्हापुरातील कार्यकर्ते सांगली येथे होणाऱ्या चक्काजाम आंदोलनात सहभागी होणार असल्याचं भगवान काटे यांनी सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
महाराष्ट्र
आयपीएल
राजकारण
Advertisement