Vijay Shivtare : विजय शिवतारेंना टप्प्यात शांत केल्याने बारामतीमधील बारा भानगडी थांबल्या; आता लक्ष माढाकडे!
बारामती लोकसभेमधील वाद मिटवल्यानंतर आता महायुतीमधील नेत्यांच्या नजरा पूर्णतः माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये लागल्या आहेत. भाजपकडून रणजितसिंह निंबाळकर यांना कडाडून विरोध असल्याने अडचणी वाढल्या आहेत.
Madha Lok Sabha : बारामती लोकसभेला सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांचे नाव निश्चित झाल्यानंतर माजी मंत्री शिंदे गटाचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी बंडाची घोषणा केली होती. त्यांनी कोणत्याही परिस्थितीत बारामती लोकसभेला निवडणुकीची घोषणा केली होती. कोणत्याही परिस्थितीत माघार नाही असे म्हणणाऱ्या शिवतारे यांनी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर तलवार म्यान केली आहे. त्यामुळे एक प्रकारे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या बारामतीमधील बारा भानगडी एक प्रकारे थंड करण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यश आलं आहे. त्यामुळे अजित पवार यांचा बारामती लोकसभा मतदारसंघातील एक मोठा अडथळा दूर झाल्याचे बोलले जात आहे.
विजय शिवतारे आणि हर्षवर्धन पाटलांना शांत करण्यात यश
अजित पवार यांच्या पुणे जिल्ह्यातील पूर्वीच्या गटातटाच्या राजकारणामुळे बारामती लोकसभेला वातावरण चांगलेच तापलं आहे. त्यामुळे तेव्हाचे विरोधातील गट आता एकमेकांविरोधात उभ ठाकले आहेत. इंदापूरमधून सुद्धा हर्षवर्धन पाटील गटाने बारामतीमध्ये मदत करण्यासाठी विधानसभेचे गणित मांडलं होतं. त्यामुळे बारामती लोकसभेची जागा अडचणीत आहे का?असा सुद्धा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र, विजय शिवतरे तसेच हर्षवर्धन पाटील यांना शांत करण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना यश आल्याने एक प्रकारे दोन अडथळे बारामती लोकसभेमधील पार झाले आहेत. त्यामुळे बारामती लोकसभेला गेल्या काही दिवसांपासून जी चर्चा रंगली होती त्याला आता पूर्णविराम मिळाला आहे.
बारामतीचा उतारा माढामध्ये चालणार की नाही?
बारामती लोकसभेमधील वाद मिटवल्यानंतर आता महायुतीमधील नेत्यांच्या नजरा पूर्णतः माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये लागल्या आहेत. भाजपकडून रणजितसिंह निंबाळकर यांना भाजपच्या पहिल्या यादीत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्या ठिकाणी चांगलाच संघर्ष पेटला आहे. याठिकाणी भाजप नेत्यांच्या बैठकांवर बैठका, त्याचबरोबर संकटमोचक गिरीश महाजन यांचे दौऱ्यांवर दौरे होऊन सुद्धा तेथील तिढा अद्याप सुटलेला नाही. याठिकाणी भाजपचेच मोहिते पाटील हे रणजितसिंह निंबाळकर यांच्या विरोधात आहेत. अजित पवार गटातील रामराजे नाईक निंबाळकर हे सुद्धा विरोधात आहेत. त्यामुळे तिढा अजून सुटलेला नाही.
धैर्यशील मोहिते पाटील काय निर्णय घेणार?
असे असतानाच शरद पवार गटाकडून सुद्धा या ठिकाणी महादेव जानकर यांच्या उमेदवारीची घोषणा केली होती. मात्र, शरद पवार गटाकडून महादेव जानकर यांना उमेदवारी जाणार लक्षात येताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार यांनी जानकर यांना एक जागा देण्याची कबूल करत त्यांना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यास भाग पाडले. त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील काय निर्णय घेणार? याकडे लक्ष आहे. मोहिते पाटील गटाकडे सुद्धा शरद पवार गटाकडून चाचपणी सुरू आहे. कार्यकर्त्यांमधून धैर्यशील मोहिते पाटील यांनी तुतारी हाती घ्यावी असं बोललं जात आहे.
ज्या पद्धतीने बारामतीचा तिढा सोडवण्यात आला त्याच पद्धतीने आता माढामध्ये हालचाली करून कसा सोडवला जातो? याकडे आता लक्ष असेल. माढा आणि बारामतीमधील वाद मिटवण्यात महायुतीला यश आल्यास ते मोठे यश असेल. उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीपासूनच वादाची किनार दोन्ही मतदारसंघात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या