Sudhir Mungantiwar :विदर्भातील नागरिकांच्या हक्काचे सुधीरभाऊ कॅबिनेटवर
एकदा भेट घेतली की दुसऱ्यांदा नावाने हाक मारणारे नेते बोटावर मोजण्याएवढेच. सतत लोकांच्या संपर्कात असणारे व कामामध्ये स्वतःला झोकून देणारे नेता', अशी मुनगंटीवारांची ओळख.
Nagpur : राजकीय नेत्यांकडे विविध समस्या आणि कामे घेऊन येणाऱ्यांची रिघ असते. या वर्दळीत प्रत्येकाला भेटणे त्यांची समस्या सोडविणेच नव्हे तर दुसऱ्यांदा परत ती व्यक्ती भेटण्यासाठी आली तर नावाने हाक मारून त्याची आस्थेने विचारपूस करणारे आणि अन्यायाविरोधात लढा देणारे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी नुकतीच कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. महाविद्यालयीन जीवनापासूनच त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली. छात्रसंघाचे सरचिटणीस ते राज्याचे अर्थमंत्रीपद आणि सध्या कॅबिनेट मंत्रीपद… ही त्यांची राजकीय झेप सर्वांना अचंबित करणारी आहे. अभ्यासू, हजरजबाबी आणि उत्कृष्ट वक्ते असलेल्या मुनगंटीवार यांची राजकीय कारकिर्द नेमकी कशी आहे, त्यावर टाकलेला हा प्रकाश…
अभ्यासू नेते
सुधीर मुनगंटीवार यांचा जन्म 30 जुलै 1962 रोजी विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात झाला. सुधीर मुनगंटीवार यांनी एम.कॉम., एल.एल.बी., एम.फिल., डी.बी.एम., बी.जे. इत्यादी पदव्या संपादन केल्या आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. सरदार पटेल महाविद्यालयाच्या छात्रसंघाची निवडणूक जिंकून ते सरचिटणीसपदी निवडून आले. यानंतर लवकरच म्हणजे 1981मध्ये ते चंद्रपूर शहर भाजपाचे चिटणीस झाले आणि त्यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरूवात झाली.
पहिली निवडणूक 1995मध्ये
मुनंगटीवार यांनी 1995मध्ये पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली. त्यावेळी ते 55 हजाराच्या मताधिक्याने विजयी झाले होते. त्यानंतर चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले. भाजपा-सेनेच्या युती सरकारमध्ये ते पर्यटन आणि ग्राहक संरक्षण खात्याचे मंत्री देखील झाले. त्यांना 1998मध्ये उत्कृष्ट संसदपटू म्हणूनही गौरवण्यात आलं होतं. याखेरीज समाजातील अंध-अपंग व्यक्तींच्या मदतीसाठी वैधानिक लढा देणाऱ्यास दिला जाणारा जी.एल.नार्देकर स्मृती पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी असलेले गोंडवन विद्यापीठ उभे करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते.
समाजकार्यात अग्रेसर
गोरगरिबांना मदतीचा हात देता यावा म्हणून त्यांनी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून चंद्रपूरमध्ये वाचनालय आणि माहिती व मार्गदर्शन केंद्र सुरू केलं. संस्थेच्या माध्यमातून अपंग मार्गदर्शन मेळावे, बचतगट महिलांसाठी मार्गदर्शन व प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन केले. याच संस्थेच्या माध्यमातून त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घूस, मुल, चिचपल्ली, धाबा येथील नागरिकांसाठी रुग्णवाहिका सुरू केल्या. रुग्णांना मोफत चष्मे वाटप, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया आदी उपक्रमही त्यांनी राबविले.
प्रतिज्ञा अन् लढ्याला यश
1995 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी प्रतिज्ञा केली होती. 'जर आमदारकीच्या कार्यकाळात बल्लारपूर तालुक्याची निर्मिती करू शकलो नाही, तर पुन्हा निवडणूक लढणार नाही' अशी प्रतिज्ञा त्यांनी केली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर त्यांनी बल्लारपूर तालुका होण्यासाठी अथक प्रयत्न केले आणि अखेरीस 1999मध्ये बल्लारपूर तालुक्याची निर्मिती झाली.
क्रांतिवीर लहुजी साळवे मातंग आयोगाची स्थापना
त्यांच्या प्रयत्नानंतर क्रांतिवीर लहुजी साळवे मातंग आयोग स्थापन झाला. तसेच स्वतंत्र खनिज विकास मंत्रालयाची निर्मितीही त्याच्या प्रयत्नांना आलेलं यश आहे. चंद्रपूर, गडचिरोली या दोन जिल्ह्यांसाठी स्वतंत्र गोंडवाना विद्यापीठ स्थापन करण्यासाठीही त्यांनी सातत्याने संघर्ष केला. त्यामुळे अखेरीस या विद्यापीठाची निर्मिती करण्यात आली.
विदर्भातील महत्त्वाचा चेहरा
सुधीर मुनगंटीवार यांनी आमदारकीसोबतच विविध महत्वाच्या पदांवर कार्यकेले आहे. ते भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आहेत. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे जवळचे नेते म्हणूनही मुनगंटीवारांची ओळख राहिली आहे.