(Source: Poll of Polls)
Maharashtra Cabinet Expansion : मी शपथ घेतो की... 18 आमदार शपथबद्ध, सर्व कॅबिनेट मंत्री
Maharashtra Cabinet Expansion : जवळपास 40 दिवसांपासून रखडलेला राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार आज (9 ऑगस्ट) पार पडला. राजभवनातील दरबार हॉलमध्ये एकूण 18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
Maharashtra Cabinet Expansion : राज्याला अखेर कारभारी मिळाले आहेत. जवळपास 40 दिवसांपासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार आज (9 ऑगस्ट) पार पडला. आज 11 वाजता राजभवनातील दरबार हॉलमध्ये एकूण 18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये शिंदे गटाचे नऊ तर भाजपकडून नऊ जणांचा शपथविधी पार पडला. या सर्व आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह एकूण 20 जणांचे हे मंत्रिमंडळ असणार आहे.
भाजपकडून पहिली शपथ काँग्रेसमधून भाजपवासी झालेले राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली. त्यानंतर सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, विजयकुमार गावित, गिरीश महाजन, शिंदे गटातील आमदार गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, सुरेश खाडे, संदीपान भुमरे, उदय सामंत, तानाजी सावंत, रवींद्र चव्हाण, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, अतुल सावे, शंभूराज देसाई, मंगलप्रभात लोढा या क्रमाने 18 आमदार शपथबद्ध झाले.
या शपथविधी सोहळ्याला राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, केंद्राचे प्रतिनिधी म्हणून भाजपचे राष्ट्रीय महसचिव विनोद तावडे उपस्थित होते.
शिंदे गटातील मंत्री
गुलाबराव पाटील (कॅबिनेट)
दादा भुसे (कॅबिनेट)
संजय राठोड (कॅबिनेट)
संदीपान भुमरे (कॅबिनेट)
उदय सामंत (कॅबिनेट)
तानाजी सावंत (कॅबिनेट)
अब्दुल सत्तार (कॅबिनेट)
दीपक केसरकर (कॅबिनेट)
शंभूराज देसाई (कॅबिनेट)
भाजपतील मंत्री
राधाकृष्ण विखे पाटील (कॅबिनेट)
सुधीर मुनगंटीवार (कॅबिनेट)
चंद्रकांत पाटील (कॅबिनेट)
विजयकुमार गावित (कॅबिनेट)
गिरीश महाजन (कॅबिनेट)
सुरेश खाडे (कॅबिनेट)
रवींद्र चव्हाण (कॅबिनेट)
अतुल सावे (कॅबिनेट)
मंगलप्रभात लोढा (कॅबिनेट)
शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाची वैशिष्ट्ये
- आजच्या मंत्रिमंडळ विस्तारात सर्व 18 आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.
- भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटील यांनी पहिली शपथ घेतली, तर शिंदे गटातून पहिल्यांदा शपथ घेण्याचा मान गुलाबराव पाटील यांना मिळाला
- विशेष म्हणजे या मंत्रिमंडळात एकाही महिला नेत्याचा समावेश नाही. 'पुरुषप्रधान मंत्रिमंडळ' असा उल्लेख शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा करता येईल.
- तर शिंदे गटातील आक्रमक चेहरा संजय शिरसाट यांचा पत्ता कट झाला असून मागे पडलेलं अब्दुल सत्तारांचं नाव ऐनवेळी आघाडीवर आलं.
- भाजपच्या आरोपामुळे मंत्रिपद गमावलेल्या संजय राठोडांना पुन्हा मंत्रिपदाचा मान
महिनाभरापासून मंत्रिमंडळाची प्रतीक्षा
एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेना आमदारांनी बंड केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि एकनाथ शिंदे हे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्री होणं हा मोठा आश्चर्याचा धक्का मानला गेला. शिंदे-फडणवीसांनी शपथ घेऊन 39 दिवस उलटून गेले आहेत. या दिवसांमध्ये राज्यात पावसानं धुमाकूळ घातला. शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं. दोघांचंच मंत्रिमंडळ असल्यानं शिंदे आणि फडणवीसांनी काही ठिकाणी दौरे देखील केले. मात्र जिल्ह्यांना पालकमंत्री नसल्यानं आणि मंत्रिमंडळ नसल्यानं म्हणावं तसं लक्ष दिलं गेलं नाही, असं म्हणत विरोधकांसह सामान्य जनता देखील सरकारवर टीका करु लागली होती.