'नीट'चा पेपर अवघड गेल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, मराठा आरक्षण रद्द झाल्याने आत्महत्या केल्याचा नातेवाईकांचा दावा
नीट पेपर कठीण गेल्याने या परीक्षेत चांगले गुण मिळतील की नाही? याची चिंता त्याला सतावत होती. या तणावातून त्याने आज दुपारी स्वत:च्या शेतात जाऊन लिंबाच्या झाडास दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
बीड : वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या नीट परीक्षेचा पेपर अवघड गेल्याने निराश झालेल्या मुलाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. विवेक कल्याण रहाडे असं या 18 वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मराठा आरक्षणासाठी विवेकने आत्महत्या केल्याचा दावा नातेवाईकांनी केला आहे.
शेतकरी कुटुंबातील विवेक बारावीमध्ये चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झाला होता. त्याचे डॉक्टर होण्याचे स्वप्न होते. वैद्यकीय प्रवेशासाठी त्याने 15 दिवसांपूर्वी नीट परीक्षा दिली होती. या परीक्षेसाठी त्याने चांगली तयारी केली होती. पण पेपर कठीण गेल्याने या परीक्षेत चांगले गुण मिळतील की नाही? याची चिंता त्याला सतावत होती. या तणावातून त्याने आज दुपारी स्वत:च्या शेतात जाऊन लिंबाच्या झाडास दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आकस्मिक मृत्यूची नोंद बीड ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली.विवेकने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली असून मृत्युपूर्वी त्याने तशा आशयाची चिट्ठी लिहून ठेवल्याचा दावा नातेवाईकांनी केला आहे. “मी कष्टकरी आणि गरीब शेतकऱ्याचा मुलगा असून जीवनात खूप मोठे होण्याची इच्छा आहे. परंतु मराठा आरक्षण गेल्यामुळे माझा नीट परीक्षेत नंबर लागत नाही. मला खाजगी महाविद्यालयात शिकवण्याची माझ्या कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती नाही, त्यामुळे मी माझे आयुष्य संपवत आहे. माझ्या मृत्यूनंतर तरी राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांना मराठ्याच्या मुलाची किव येईल आणि माझे मरण सार्थकी लागेल” असे विवेकने त्या कथित चिट्ठीत लिहिल्याचे सांगितले जात आहे.