काँग्रेसने सुद्धा शड्डू ठोकला! राज्यसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीत रस्सीखेच; एकमेव जागेसाठी शरद पवारांची राष्ट्रवादी अन् काँग्रेसच्या बैठकीत काय घडलं?
Rajya Sabha Election: राज्यसभेत काँग्रेसचे संख्याबळ वाढवणे ही काळाची गरज असून, राष्ट्रीय स्तरावर पक्षाची ताकद मजबूत करण्यासाठी ही जागा काँग्रेसलाच मिळावी, असा पवित्रा काँग्रेसने घेतला आहे.

Rajya Sabha Election: आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नेत्यांमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत दोन्ही पक्षांनी राज्यसभेच्या जागेवर दावा मांडल्याने महाविकास आघाडीत पेच निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. बैठकीत काँग्रेस नेत्यांनी राज्याच्या राजकारणापेक्षा देशातील राजकीय समीकरणांवर भर दिला. राज्यसभेत काँग्रेसचे संख्याबळ वाढवणे ही काळाची गरज असून, राष्ट्रीय स्तरावर पक्षाची ताकद मजबूत करण्यासाठी ही जागा काँग्रेसलाच मिळावी, असा पवित्रा पक्षाने घेतला आहे. ही जागा काँग्रेससाठी प्रतिष्ठेची असल्याचेही नेत्यांनी स्पष्ट केले.
शरद पवारांच्या अनुभवावर राष्ट्रवादीचा जोर
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नेत्यांनी शरद पवार यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा मुद्दा उपस्थित केला. शरद पवार हे देशातील ज्येष्ठ नेते असून, राष्ट्रीय पातळीवर पक्षाची ताकद आणि प्रभाव कायम ठेवण्यासाठी त्यांनाच उमेदवारी मिळणे आवश्यक आहे, असे मत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मांडले. शरद पवार यांची या संदर्भातील वैयक्तिक इच्छा काय आहे, हे जाणून घेतल्यानंतरच राष्ट्रवादी काँग्रेस (शप) आपली अंतिम भूमिका जाहीर करणार आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका समजून घेणार
दोन्ही पक्ष आपापल्या जागांसाठी अडून बसले असले तरी, यावर अद्याप कोणताही अंतिम तोडगा निघालेला नाही. काँग्रेसने या संदर्भात 'शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)' पक्षाशी चर्चा करून पुढचा निर्णय घेऊ, असे राष्ट्रवादीला कळवले आहे. राष्ट्रवादीकडून जयंत पाटील आज शरद पवार यांची भेट घेऊन बैठकीचा तपशील देणार आहेत. त्यानंतर ते उद्धव ठाकरे यांचीही भेट घेणार असून त्यासाठी त्यांनी वेळ मागितली आहे.
विधान परिषद वेटिंगवर
राज्यसभेवरून चर्चा रंगलेली असताना, विधान परिषदेच्या जागेबाबत मात्र या बैठकीत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे समजते.
इतर महत्वाच्या बातम्या

























