ST Strike : एसटीची बांधिलकी प्रवाशांशी, एसटी चालू झाली पाहिजे, कृती समितीशी झालेली चर्चा सकारात्मक: शरद पवार
कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा होईल पण एसटी सुरु झाली पाहिजे यावर राज्य सरकार आणि कृती समितीचे एकमत झाल्याची माहती खासदार शरद पवारांनी दिली.
मुंबई : एसटी महामंडळातील कामगारांच्या वेगवेगळ्या 21 संघटनांच्या कृती समितीसोबत आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी चर्चा झाली. ही चर्चा अत्यंत सकारात्मक झाल्याचं कृती समितीच्या नेत्यांनी सांगितल्यानंतर एसटी कामगार-कर्मचाऱ्यांची बांधिलकी प्रवाशांशी असली पाहिजे असं आवाहन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केलं. एसटी कामगारांच्या अनेक मागण्या मान्य झाल्या आहेत, काही मागण्यांबाबत चर्चा सुरु राहील, असं सांगतानाच त्यांनी एसटी सुरु झाली पाहिजे असं आवाहन केलं.
राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या राज्य सरकारने मान्य करुनही विलीनीकरणाच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी संप कायम ठेवला. हा प्रश्न सुटावा, यातून मार्ग निघावा यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब आणि कर्मचारी कृती समिती यांच्यात चर्चा झाली. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत सरकार सकारात्मक आहे, एसटीची बांधिलकी प्रवाशांशी आहे, त्यामुळे एसटी सुरु झाली पाहिजे यावर एकमत झाल्याची माहिती खासदार शरद पवारांनी दिली.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, "परिवहन मंत्री आणि बाकीच्या अधिकाऱ्यांनी कृती समितीसोबत चर्चा केली. माझ्या दृष्टीने महाराष्ट्राचा प्रवासी आहे तो अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. दोन महिने संपामुळे प्रवाशांची जी स्थिती झाली तिचं वर्णन न केलेलं बरं. दुसरं एक संकट देशावर आलंय, ते कोरोनाचा नवा अवतार आपण पाहत आहोत. या सगळ्या गोष्टीचा परिणाम महाराष्ट्राच्या अर्थकारणावर होत आहे. असा परिणाम होत असतानाही राज्य सरकारला त्याची किंमत देण्याची, आर्थिक किंमत देण्याची स्थिती असताना सुद्धा माझ्या मते परिवहन मंत्र्यांनी जेवढं जास्त करता तेवढं करण्याचा प्रयत्न केला. त्यांचा प्रयत्न याठिकाणी कृती समितीच्या लोकांसमोर मांडल्यानंतर कृती समितीचेही काही प्रश्न आहेत, सरकारच्या निर्णयामध्ये काही कमतरता आहेत, हे कृती समितीने निवेदन आणून दिलं. त्याही बाबत सकारात्मक निर्णय घेण्याची तयारी मंत्रीमहोदयांनी दिली."
ही तयारी करत असताना एसटी चालू झाली पाहिजे, कर्मचाऱ्यांनी सेवेत यायला हवं, तुमच्या मनात ज्या काही शंका आहेत, प्रश्न आहेत, त्याबाबत आपण सकारात्मक मार्ग काढू शकतो असं परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले.
शरद पवार म्हणाले की, "आनंद गोष्टीचा एका गोष्टीचा आहे, कृती समितीचे 20-22 प्रतिनिधी आहेत त्या सर्वांना कामगारांच्या प्रश्नांचा जसा आग्रह आहे जो रास्त आहे, त्याप्रमाणे प्रवाशांचं हित आणि एसटी टिकली पाहिजे, याही बाबतीत ते सकारात्मक आहेत. त्यामुळे त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन केलं आहे. माझं आवाहन आहे कर्मचाऱ्यांना आपली बांधीलकी प्रवाशांसी आहे, जे आवाहन कृती समितीने कर्मचाऱ्यांना केलं आहे त्याचा गांभीर्याने विचार कर्मचाऱ्यांनी करावा."
संबंधित बातम्या :