एक्स्प्लोर
गांजा तस्करीसाठी एसटीचा वापर, 30 किलो गांजा जप्त
जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या पिंपळखुटी नाक्यावर आज निवडणूक विभागाच्या तपासणी पथकाने एका बसमधून 30 किलो गांजा जप्त केला आहे.

यवतमाळ : जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या पिंपळखुटी नाक्यावर आज निवडणूक विभागाच्या तपासणी पथकाने एका बसमधून 30 किलो गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तेलंगणा राज्यातील तीन तस्करांना ताब्यात घेतले आहे. यात दोन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. आदिलाबाद येथून ही बस नागपूरला जात होती. या बसमध्ये सहा काळ्या बॅग होत्या. त्यात खाकी रंगाच्या पिशव्यांमध्ये गांजाची 15 पाकिटं ( 30 किलो) होती. या बॅग्समधील तब्बल 30 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, निवडणूक विभागाचे पथक जेव्हा या बसची तपासणी करत होते. तेव्हा या बॅग कोणाच्या आहेत? असा सवाल अधिकाऱ्यांनी बसमधील प्रवाशांना विचारला. परंतु त्यावेळी कोणीही त्याची जबाबदारी घेत नव्हते. पुढे बसमधील सर्व प्रवाशांची चौकशी केल्यानंतर तीन जणांना ताब्यात घेण्यात आले. तीनही आरोपी तेलंगणामध्ये या गांजाची कमी किंमतीत खरेदी करुन जास्त किंमतीत विकत होते, अशी माहिती तपासात समोर आली आहे. पांढरकवडा पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
आणखी वाचा























