Sanjay Gaikwad : "मी सती सावित्री सारख्या महिलांच्या आरोपांना उत्तर देतो, इतरांना देत नाही"; संजय गायकवाड यांचा सुषमा अंधारेंवर पलटवार
सुषमा अंधारेंसारख्या महिलेने जो आरोप केलाय त्यांना आपण उत्तर देणार नाही. कारण मी सती सावित्री सारख्या महिलांनी केलेल्या आरोपांना उत्तर देतो, इतरांना देत नसल्याचा पलटवार संजय गायकवाड यांनी केला आहे.
Akola News अकोला : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्या माजूरड्या आमदारांना लगाम लावावा, अशी टीका शिवसेना उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी संजय गायकवाड यांचे नाव न घेता अप्रत्यक्षरित्या टीका केली होती. त्यांच्या या टीकेला आता शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी देखील प्रत्युत्तर देत सुषमा अंधारेंवर निशाणा साधला आहे. सुषमा अंधारे सारख्या महिलेने जो आरोप केलाय त्यांना आपण उत्तर देणार नाही. कारण मी सती सावित्री सारख्या महिलांनी केलेल्या आरोपांना उत्तर देतो, इतरांना देत नसल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री करण्यासाठी 145 आमदार पाहिजेत
नाकावर टिच्चून आमचा मुख्यमंत्री करू, असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी आपल्या सभेतून बोलताना केला आहे. यावर संजय गायकवाड यांनी भाष्य करत त्यांनी उद्धव ठाकरेंवर देखील टीका केली आहे. यावेळी ते म्हणाले, नाकावर टिच्चून मुख्यमंत्री करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी डोक्यावर टिच्चून मुख्यमंत्री करा की, नाकावर टिच्चून करा, मात्र मुख्यमंत्री करण्यासाठी 145 आमदार पाहिजेत, हे लक्षात ठेवा. त्यात आपले किती येतील ते देखील पहा. असा खोचक सल्ला देत त्यांचावर टीका केली आहे. उल्हासनगरमधील गोळीबार म्हणजे हे काही गँगवार वगैरे नाही. प्रॉपर्टी आणि दोन परिसरातला तो वाद आहे. दोघांच्या भांडणात हा विषय घडला असल्याचे देखील संजय गायकवाड म्हणाले.
फाटक्या तोंडाचे लोक ज्याला त्याला नाव ठेवतात
आमच्या लोकांना युतीतल्या लोकांबरोबर काम करणे हे जर मोदीबिंदू दिसत असेल तर हे त्यांचे दुर्दैव. आमच्या पक्षाचे हे प्रेम आहे की , आमचा नेता वारिष्ठाशी चांगले संबंध ठेवून आहे. त्यामुळे राज्यातल्या लोकांना त्याचा फायदा होतो . हे एकनाथ शिंदे साहेबांचे कसब आहे. संजय राऊतांना कधी कोणाशी चांगले संबंध ठेवताच आले नाही. ते फाटक्या तोंडाचे ज्याला त्याला नाव ठेवतात. आता यांचा कुणी मित्र पण राहिलेला नाही. अशी खोचक टीका संजय गायकवाड यांनी संजय राऊतांवर केली आहे.
अशी भाषा त्यांनी यापुढे तरी बंद केली पाहिजे
मंत्री छगन भुजबळ हे राज्यातले मोठे नेते आहेत. त्यांनी राज्यातल्या एकमेकांच्या समाजा बद्दल घाणेरडे आणि विषारी शब्द वापरून आग लावायचे प्रयत्न करू नये. आम्ही हे वारंवार सांगत आलोय, ऐवढ्या मोठ्या नेत्याबद्दल आरोप करायला आम्हालाही बर वाटत नाही. किमान अशी भाषा त्यांनी यापुढे तरी बंद केली पाहिजेत. अशा शब्दात गायकवाड यांनी मंत्री छगन भुजबळ यांना सल्ला दिला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या