बंडखोरांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरेंची आजपासून निष्ठा यात्रा, पक्षाला लागलेली गळती रोखण्याचं आव्हान
Aaditya Thackeray Nishtha Yatra : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी केलेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांना भेटण्यासाठी निष्ठा यात्रेची घोषणा केली आहे.
Aaditya Thackeray Nishtha Yatra : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी केलेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांना भेटण्यासाठी आदित्य निष्ठा यात्रेची घोषणा केली आहे. आदित्य ठाकरे यांच्या निष्ठा यात्रेला आजपासून सुरुवात होत आहे. शिवसेनेतील बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात आणि मुंबईतल्या 236 शाखांमध्ये जाऊन ते शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. ताज्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आदित्य हे शाखाशाखांमधील शिवसैनिकांशी संवाद साधतील. तसंच बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात ते भेटीगाठी आणि मेळावे घेऊन शिवसेनेशी एकनिष्ठ राहिलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना बळ देण्याचा प्रयत्न करतील.
शिवसेनेच्या डॅमेज कंट्रोलसाठी आदित्य ठाकरे मैदानात उतरले आहेत. आदित्य ठाकरे यांची आजपासून निष्ठा यात्रा सुरु होत आहे. शिंदे यांच्या बंडानंतर राज्यभर शिवसैनिकांची द्विधा मनस्थिती आहे. अशात अजूनही शिंदे गटामध्ये जाण्याचं प्रमाण वाढलं आहे. काल ठाण्यात 66 नगरसेवक शिंदे गटात गेले आहेत. सोबतच काही खासदार देखील शिंदे गटात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देखील सतर्क झाले आहेत. त्यांनी देखील बैठकांचा सिलसिला लावला आहे. ते स्वत: शिवसैनिकांशी संवाद साधत आहेत.
आज संजय राऊत हे नाशिकपासून डॅमज कन्ट्रोलला सुरुवात करणार आहेत. संजय राऊत उत्तर महाराष्ट्र संपर्क नेते आहेत. आज शुक्रवारी पदाधिकारी बैठका, पत्रकार परिषद घेणार आहेत. तर शनिवारी कार्यकर्ता मेळावा देखील ते घेणार आहेत.
40 आमदारांनंतर आता खासदारही बंडखोरीच्या तयारीत
40 आमदारांनंतर आता खासदारही बंडखोरीच्या तयारीत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 20 जूनला विधानपरिषद निवडणुक पार पडल्यानंतर राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला. सत्तेत असलेल्या शिवेसेनेचे 40 आमदार फुटले, आणि सत्तेतून बाहेर पडले. यानंतर शिवसेनेची न भरून येणारी हानी झाली. मात्र असे असताना आता शिवसेनेचे खासदार ही त्या वाटेवर आहेत अशी जोरदार चर्चा आहे.