शिर्डी विमानतळावरील विमानसेवा 24 दिवसानंतर उद्यापासून सुरु होणार
खराब हमानामुळे दृष्यमानता कमी झाल्याने शिर्डी विमानतळावरील विमानसेवा ठप्प झाली होती. गेल्या 24 दिवसांपासून विमानसेवा ठप्प होती
शिर्डी : साईबाबांच्या दर्शनासाठी आणि इतर कामासाठी शिर्डीत येणाऱ्यांना आनंदाची बातमी आहे. मागील 24 दिवसांपासून बंद असलेली शिर्डी विमानतळावरील सेवा आता बुधवार 11 डिसेंबरपासून पुन्हा सुरु करण्याचा निर्णय स्पाईस जेट कंपनीने घेतला आहे. ही सेवा 12 वाजेनंतर आणि 5.30 आधी सुरु राहणार आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने तसं पत्र दिल्यानंतर स्पाईस जेट कंपनीने त्यास लगेच प्रतिसाद देत हा निर्णय घेतला आहे. त्यापाठोपाठ 'इंडिगो' आणि 'इंडियन एअरलाइन्स' या कंपन्यांनीही विमानसेवा सुरु करण्याची तयारी सुरू केली आहे. नाताळाच्या सुट्ट्यांपूर्वी हे विमानतळ सुरु होत, असल्याने विमानसेवेचा लाभ घेणाऱ्या भाविकांना दिलासा मिळणार आहे.
खराब हमानामुळे दृष्यमानता कमी झाल्याने शिर्डी विमानतळावरील विमानसेवा ठप्प झाली होती. गेल्या 24 दिवसांपासून विमानसेवा ठप्प झाल्याने विमान कंपन्याना मोठा तोटा सहन करावा लागला. तर भाविकांनाही मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. शिर्डी ऐवजी औरंगाबाद आणि पुणे विमानतळावर उतरावे लागत होते. त्यामुळे भाविकांचा वेळ आणि अधिकचा पैसा खर्ची होत होता. बुधवारपासून सेवा सुरु होणार असल्याने भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कमी दृष्यमानता विमान उतरवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्याच शिर्डी विमानतळाचे व्यवस्थापक दीपक शास्त्री यांनी सांगितलं आहे.
मागील वर्षी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते शिर्डी विमानतळाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. सरकारच्या उडाण योजनेत सहभागी नसताना शिर्डी विमानतळ साईभक्तांच्या प्रतिसादामुळे यशस्वी ठरलं आहे. दिल्ली, हैदराबाद, बंगळुरु, भोपाळ व मुंबई या ठिकाणाहून सुरू झालेल्या विमानसेवेला मोठा प्रतिसाद मिळाला असून अवघ्या वर्षभरात या विमानतळावर 28 उड्डाणे दररोज होऊ लागली. मात्र अवकाळी पावसामुळे अचानक पडलेल्या थंडीमुळे गेल्या सध्या 24 दिवसांपासून विमान सेवा ठप्प झाली होती. विमान सेवेला 5 किमीपर्यंत दृष्यमानता आवश्यक असताना गेल्या सहा दिवसांपासून अवघी 3 किमीपर्यंत दृष्यमानता असल्याने विमान सेवा ठप्प झाली होती.