दूध प्रश्न सोडवण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करणार, शरद पवारांचं शेतकऱ्यांना आश्वासन, दूध दर आंदोलनाला पवारांचा पाठिंबा
दूध (Milk) उत्पादकांच्या प्रश्नाबाबत तातडीने हस्तक्षेप करुन हा प्रश्न सोडवण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करु असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिले आहे.
Sharad Pawar on Milk Price News : दूध (Milk) उत्पादकांच्या प्रश्नाबाबत तातडीने हस्तक्षेप करुन हा प्रश्न सोडवण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करु असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिले आहे. दुधाला 40 रुपये प्रति लिटर दर मिळावा या प्रमुख मागणीसाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने राज्यभर आंदोलन सुरू आहे. आंदोलनाचा भाग म्हणून अकोले (Akole) तालुक्यातील कोतुळ या ठिकाणी 14 दिवस शेतकरी बेमुदत धरणे आंदोलनावर बसले आहेत. या पार्श्वभूमीवर दूध उत्पादकांच्या प्रश्नांमध्ये लक्ष घालावे अशी विनंती करणारे निवेदन दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने शरद पवार यांना देण्यात आले. यावेळी पवार बोलत होते.
शरद पवारांचा दूध आंदोलनाला पाठिंबा
शरद पवार हे अकोले येथे अशोकराव भांगरे यांच्या जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यासाठी आले होते. यावेळी मेळाव्याच्या मंचावर जाऊन शेतकऱ्यांनी हे निवेदन शरद पवार यांना दिले. किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे शेतकरी मेळाव्यासाठी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मांडणी करत असताना दूध उत्पादकांच्या प्रश्नाबाबत त्यांनी सखोल विश्लेषण केले. दूध प्रश्नावर सुरू असलेल्या आंदोलनास कुणाचा पाठिंबा आहे त्यांनी हात वर करावा असे आवाहन त्यांनी सभेस केले. त्यावेळी हजारोच्या संख्येने उपस्थित असणाऱ्या शेतकऱ्यांनी हात उंचावून या आंदोलनास पाठिंबा दिला. मंचावर उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार निलेश लंके, खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यासह सर्वच मान्यवरांनी व उपस्थित शेतकरी कार्यकर्त्यांनी आंदोलनास हात उंच करून पाठिंबा जाहीर केला.
22 जुलैला अशोक ढवळे उद्धव ठाकरे यांची भेट घेणार
कोतुळ येथे सुरू असलेल्या आंदोलनाला शेतकरी मेळाव्यानंतर किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे यांनी भेट दिली. किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले हे यावेळी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत व विशेषतः दूध उत्पादकांच्या सुरू असलेल्या आंदोलनाबाबत किसान सभेने सक्रियपणे आंदोलनात उतरावे असे आवाहन ढवळे यांनी केले. किसान सभा आंदोलनाच्या पाठीमागे ठामपणे आहेच, शिवाय महाविकास आघाडीच्या सर्वच शीर्ष नेतृत्वाला व सत्तेत असणाऱ्या सर्व सत्ताधार्यांना भेटून दूध उत्पादकांच्या प्रश्नांबाबत लक्ष घालण्याचे आवाहन आपण करणार असल्याचे डॉ. अशोक ढवळे यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, 22 जुलै रोजी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन दूध प्रश्नाकडे त्यांचे लक्ष वेधणार असल्याचेही डॉ. अशोक ढवळे यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या: