एक्स्प्लोर
Advertisement
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाबासाहेब धाबेकर यांचं निधन
उपसरपंच, सरपंच, बार्शीटाकळी पंचायत समिती सदस्य, सभापती, जिल्हा परिषद सदस्य, जि.प. सभापतीनंतर अध्यक्ष असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला.
अकोला : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी जलसंधारण मंत्री बाबासाहेब धाबेकर यांचं आज मुंबईत उपचारादरम्यान निधन झालं. ते 92 वर्षांचे होते. गेल्या काही महिन्यांपासून आजारी असलेल्या धाबेकरांवर मुंबईत एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. गत काही दिवसांपासून मुंबई येथील रुग्णालयात उपचारार्थ भरती असलेल्या बाबासाहेब यांनी मंगळवारी आज सकाळी 11.30 वाजता अखेरचा श्वास घेतला. बाबासाहेब धाबेकरांचं मूळ नाव केशवराव नारायण गालट असं होतं. मात्र, अकोला जिल्ह्यातील धाबा गावच्या या सुपुत्राला राज्याच्या राजकारणात 'बाबासाहेब धाबेकर' या नावाने ओळखलं जात होतं.
बाबासाहेब हे बार्शीटाकळी तालुक्यातील धाबा गावचे रहिवासी होते. धाबा ग्रामपंचायत सदस्य पदापासून त्यांनी राजकीय कारकीर्द सुरु केली. उपसरपंच, सरपंच, बार्शीटाकळी पंचायत समिती सदस्य, सभापती, जिल्हा परिषद सदस्य, जि.प. सभापतीनंतर अध्यक्ष असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला. ते तब्बल 12 वर्ष अकोला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. त्यांच्या अध्यक्षपदाचा कालावधी अकोला जिल्हा परिषदेचा 'सुवर्णकाळ' समजला जातो. या कार्यकाळात त्यांनी अकोला जिल्ह्यात राबवलेल्या अनेक योजना पुढे राज्यात लागू झाल्यात.
पुढे 1985 मध्ये ते काँग्रेसच्या तिकीटावर कारंजा मतदारसंघातून विजयी झाले. 1995 मध्ये कारंजातून अपक्ष म्हणून विजयी झालेल्या बाबासाहेबांच्या नेतृत्वात 42 अपक्ष आमदारांनी तेव्हाच्या युती सरकारला पाठिंबा दिला. बाबासाहेब तेव्हा मनोहर जोशींच्या मंत्रीमंडळात राज्यमंत्री झाले. 1999 मध्ये कारंजातून ते काँग्रेसच्या तिकीटावर विजयी झालेत. पुढे विलासराव देशमुख यांच्या सरकारमध्ये बाबासाहेब ग्रामविकास आणि जलसंधारण खात्याचे कॅबिनेट मंत्रीपदी झालेत. ग्रामविकास मंत्री, जलसंधारण खातं त्यांच्याकडे आल्यावर त्यांनी महाराष्ट्रात जलसंधारणाच्या कामांना गती दिली.
यासोबतच सहकार क्षेत्रातही त्यांनी भरीव कार्य केले. यासोबत त्यांनी 2009 मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर अकोला मतदारसंघातून लोकसभा निवडणुकही लढविली होती. अकोला आणि वाशिम जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातही बाबासाहेबांचा मोठा दबदबा होता. सुतगिरणी, साखर कारखान्याची उभारणीही त्यांनी केली. त्यांच्या कार्यकाळात स्थापन झालेला साखर कारखाना त्यांनी अनेक वर्ष नफ्यात ठेवला. रोखठोक भूमिका घेणारे नेते व विकास महर्षी म्हणून त्यांची संपूर्ण राज्यात ओळख होती. राज्यातील सर्वच पक्षातील नेत्यांसोबत त्यांचे सलोख्याचे व मैत्रिपूर्ण संबंध होते. उद्या (6 नोव्हेंबर) दुपारी बारा वाजता धाबा येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
निवडणूक
निवडणूक
मुंबई
Advertisement