शासकीय मुलींच्या वसतीगृहात बनावट मद्य तयार करुन विकणारी टोळी अटकेत
शासकीय मुलींच्या वसतीगृहात बनावट मद्य तयार करुन विकणाऱ्या टोळीला अटक करण्यात आले आहे. 17 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अमरावती : मेळघाटात सेमाडोह येथे जय महाकाली शासकीय अनुदानित मुलींच्या वसतिगृहात चक्क बनावट दारू निर्मितीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अमरावती स्थानिक गुन्हे शाखा आणि चिखलदरा पोलिसांनी शुक्रवारी रात्री या वसतिगृहात धाड टाकून एकूण 17.50 लाखाचा माल जप्त केला. तसेच 10 जणांना अटक केली. या घटनेमुळे मेळघाटासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
एकूण 20 ते 25 मुलींच्या क्षमतेचे हे वसतिगृह असून लॉकडाऊनमुळे हे वसतिगृह 11 महिन्यापासून बंद होते. शुक्रवारी रात्री सेमाडोह येथील जय महाकाली मुलीच्या वसतिगृहात धाड टाकली असता या ठिकाणावरून दारू बिटलींग करण्याकरिता प्रत्येकी 200 लिटर क्षमतेच्या 5 प्लास्टिक ड्रममध्ये 1000 लिटर अल्कोहोल, एका स्टील कोठीमध्ये 20 लिटर पाणी मिश्रित अल्कोहोल, मिनरल वॉटर पाण्याच्या 36 कॅन, 180 एमएलच्या देशी दारूच्या काचेच्या 6 हजार 302 बाटल्या, आयबी कंपनीच्या 180 एमएलच्या 620 रिकाम्या बाटल्या, एलट्रॉनिल मीटर, काचेचे चंचुपपात्र, हायड्रोमिटर, थर्मामिटर, 7 लिटर व्हीस्की फ्लेवर रसायन यासह एक बोलेरो आणि डिझायर कार असा एकूण 17 लाख 60 हजार 340 रुपयांचा माल जप्त केला. या कारवाईत एकूण 10 जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये अमरावती शहरातील दोन तर आठ जण मध्यप्रदेश मधील आहे.
काही दिवसांपूर्वीच चंद्रपुरातील अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी एन्ट्री पॉईंटवर पाळत ठेवून शहरात येणाऱ्या सहा बोलेरो पिकअप वाहनांना आणि त्यांना पायलट करणाऱ्या एका गाडीला अडवले. चंद्रपूर शहराच्या वेशीवर असलेल्या पडोली चौकात आमदार जोरगेवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी गुप्त माहितीवर आधारित हे अभियान राबवले. या सर्व गाड्यांमध्ये देशी दारुचे बॉक्स भरलेले होते. दारु भरलेली ही सर्व वाहने पडोली पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आली आहे.
संबंधित बातम्या :