संपूर्ण देशात हॉटस्पॉट ठरलेल्या जळगाव जिल्ह्यात दिलासादायक चित्र
संपूर्ण देशात हॉटस्पॉट ठरलेल्या जळगाव जिल्ह्यात दिलासादायक चित्र. दुसरी लाट ओसरण्याच्या मार्गावर.
जळगाव : कोरोनाच्या बाबतीत जळगाव जिल्हा सुरुवातीला संपूर्ण देशात हॉटस्पॉट म्हणून चर्चेला आला होता. त्यानंतर मात्र प्रशासनाने उपाययोजनांबाबत घेतलेली गंभीर दखल आणि त्याला जनतेने दिलेली साथ याचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले आहेत. सध्या जळगाव जिल्ह्यात नोंद होत असलेल्या कोरोना बाधितांची संख्या पाहता कोरोनाची दुसरी लाट पूर्णपणे ओसरण्याच्या मार्गावर असल्याचं दिलासादायक चित्र जळगावमध्ये पाहायला मिळत आहे.
कोरोनाची रुग्णसंख्या सध्या नाहीच्या बरोबर असली तरी कोरोना अद्याप तरी संपलेला नाही. तिसरी लाट येण्याची शक्यता पाहता नागरिकांनी नियमांचं पालन करणे गरजेचे असल्याचं आवाहन जिल्हाधकारी अभिजित राऊत यांनी केले आहे. जळगाव जिल्ह्यात सध्या कोरोनाची सक्रीय रुग्णसंख्या 366 इतकी आहे. गेल्या आठ दिवसांपासून वीसच्या आत बाधित रुग्ण आढळून येत आहेत. तर बरे होणाऱ्या रुग्णाचे प्रमाण दुप्पटीने वाढले आहे. शिवाय पॉझिटीव्हिटी दरही एक टक्के आलेला असल्याने जळगाव जिल्ह्यात कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात प्रशासनाला चांगलंच यश मिळाले असल्याचं पाहायला मिळत आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर नियत्रण मिळविण्यात यश मिळाल्याच्या मागील कारणाबाबत विचार केला तर दुसऱ्या लाटेदरम्यान प्रशासनाने ब्रेक द चेन मोहीम राबविली होती. यामध्ये अनेक निर्बंध लावण्यात आले होते. याशिवाय सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझेशन यांचा वापर करण्यासंदर्भात करण्यात आलेली जनजागृती आणि जिल्ह्यातील आठ लाख लोकांना करण्यात आलेले लसीकरण या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यात यश मिळालं असल्याचं दिसत असलं तरी कोरोना अद्याप पूर्णपणाने संपलेला नाही. त्यामुळे पुढील काळात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका पाहता नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे असल्याचं, आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.
नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन
कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी भविष्यात तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाने केलं आहे. कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी लसीकरण हाच एकमेव मार्ग आहे. त्यामुळे नागरिकांना लस घेण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे.