एक्स्प्लोर
पोलादपूर घाटात बस दरीत कोसळली, 30 जणांचा मृत्यू
पोलादपूर बस दुर्घटना: कोकणाला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणाऱ्या पोलादपूरजवळी आंबेनळी घाटात एक खासगी बस 800 फूट दरीत कोसळली. या बसमध्ये चालकासह 31 जण होते, त्यापैकी 30 जणांचा मृत्यू झाला. हे सर्व दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे कर्मचारी होते.
पोलादपूर बस दुर्घटना: रायगड : कोकणाला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणाऱ्या पोलादपूरजवळ आंबेनळी घाटात एक खासगी बस 800 फूट दरीत कोसळली. या बसमध्ये चालकासह 31 जणांचा मृत्यू झाला. हे सर्व दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे कर्मचारी होते. धक्कादायक म्हणजे जो कर्मचारी वाचला, त्याने खोल दरीतून वर येत, मोबाईलला रेंज मिळाल्यानंतर कोकण कृषी विद्यापीठाला फोन करुन झालेल्या अपघाताची माहिती दिली. प्रकाश सावंत-देसाई असं या अपघातातून बचावलेल्या कर्मचाऱ्याचं नाव आहे. प्रकाश सावंत देसाई हे कोकण कृषी विद्यापीठाचे अधीक्षक आहेत.
या बसमध्ये कोकण कृषी विद्यापीठाचे 38 कर्मचारी आणि 2 चालक-वाहक असे एकूण 40 जण असल्याची प्राथमिक माहिती होती.
मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे.
महिन्याचा चौथा शनिवार आणि रविवार अशी सलग सुट्टी आल्याने कर्मचारी दापोलीहून महाबळेश्वरला पिकनिकला निघाले होते. यासाठी त्यांनी विद्यापीठाचीच बस भाड्याने घेतली होती. परंतु बस रायगडमधील पोलादपूर घाटात आल्यावर दरीत कोसळली. खोल दरीत बस कोसळल्याने बसचा चेंदामेंदा झाला आहे. इतकंच नाही तर मृतदेहांची अवस्था छिन्नविछिन्न झाली आहे.
दरवर्षी भाताची लावणी झाल्यानंतर कृषी विद्यापीठातील कर्मचारी पिकनिकला जातात. त्याप्रमाणे हे कर्मचारी आज सकाळी साडेसहाच्या सुमारास दापोलीहून महाळेश्वरला जाण्यासाठी निघाले. परंतु साडेदहा वाजता कर्मचाऱ्यांची बस दरीत कोसळल्याचा फोन आम्हाला आला. अशी माहिती कोकण कृषी विद्यापीठाचे विस्तार संचालक संजय भावे यांनी दिली.
दरम्यान, बस अपघाताची माहिती मिळताच सर्व यंत्रणा आणि महाबळेश्वर ट्रेकर्स ग्रुप कर्मचाऱ्यांच्या बचावासाठी पोलादपूरला रवाना झाले. स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य सुरु आहे. बचावकार्य सुरु असलं तरी पोलादपूर घाटातील वाहतुकीवर सध्या तरी सुरळीत आहे.
अपघाताची माहिती कशी मिळाली?
या अपघातातून एक कर्मचारी आश्चर्यकारकरित्या बचावला. त्या कर्मचाऱ्याने घाटातून वर येऊन या अपघाताची माहिती कोकण कृषी विद्यापीठाला कळवली, अशी माहिती कोकण कृषी विद्यापीठाचे विस्तार संचालक संजय भावे यांनी दिली.
आमची बस दरीत कोसळली, अशी माहिती प्रकाश सावंत देसाई नावाच्या कर्मचाऱ्याने विद्यापीठात फोन करुन सांगितलं, असं संजय भावे यांनी एबीपी माझाला सांगितलं.
रेंज आली आणि अपघाचा थरार कळवला
या अपघातातून प्रकाश सावंत देसाई आश्चर्यकारकरित्या बचावले. प्रकाश देसाई हे कसेबसे 800 फूट दरीतून वर आले. वर आल्यानंतर रस्त्यावर त्याच्या मोबाईलला रेंज आली, त्यानंतर त्यांनी सर्वात आधी या अपघाताची माहिती कोकण कृषी विद्यापीठाला कळवली. आमची बस दरीत कोसळली, आम्हाला मदत करा, अशी माहिती प्रकाश सावंत-देसाई यांनी दिली.
या अपघाताची माहिती त्या कर्मचाऱ्याने दिली नसती, तर हा अपघात झालाय हे समजण्यास अनेक तास-दिवस लागले असते. कारण अपघात झाला, ते ठिकाण अवघड वळणाचं किंवा अपघातग्रस्त ठिकाण नव्हतं.
वाचलेल्या कर्मचाऱ्याने अपघाताची माहिती मिळाल्यानंतर, दापोली कृषी विद्यापीठाच्या प्रशासनाने त्याची माहिती पोलिसांनी दिली. सर्वात आधी महाबळेश्वर पोलीस आणि पोलादपूर पोलिस घटनास्थळी पोहोचले. मात्र त्यांना नेमका अपघात कुठे झाला, हेच कळत नव्हतं. बस नेमकी कुठून खाली कोसळली आणि ती बस दरीत कुठे आहे, हेच शोधण्यात पोलिसांचा वेळ गेला. अखेर पोलिसांना बस कोसळलेलं ठिकाण आणि ठिपक्याएवढी बस दिसली आणि रेस्क्यू ऑपरेशन सुरु झालं.
पिकनिक रद्द केलेल्या कर्मचाऱ्याची प्रतिक्रिया
प्रविण रणदिवे हे सुद्धा कोकण कृषीविद्यापीठाचे कर्मचारी आहेत. ते सुद्धा या पिकनिकला जाणार होते. मात्र नुकतंच लग्न झालेल्या प्रविण यांना त्यांच्या बायकोने न जाण्याची विनंती केली होती. त्यामुळे त्यांनी तब्येत बरी नसल्याचं कारण देत पिकनिकला जाणं टाळलं होतं.
प्रविण रणदिवे यांच्याशी एबीपी माझाने संपर्क साधला असता ते म्हणाले, “टीव्हीवरुनच दुपारी 12.30 वाजता अपघाताची माहिती मिळाली. या वृत्ताने अतिशय दु:ख झालं. सहकाऱ्यांना सकाळी साडेसहा वाजता कॉल केला, तेव्हा तब्येत बरी नसल्याने आपण पिकनिकला येत नसल्याचं सांगितलं. सहकाऱ्यांनी व्हॉट्सअॅपवर फोटो पाठवले, नऊ वाजेपर्यंत चॅटिंग सुरु होतं, पण त्यानंतर कॉन्टॅक्ट झाला नाही”
आमदार भरत गोगावले यांची माहिती
दरम्यान, या अपघातानंतर स्थानिक प्रशासनाकडून तातडीने रेस्क्यू ऑपरेशन करण्यात येत असल्याची माहिती आमदार भरत गोगावले यांनी दिली. या बसमध्ये ड्रायव्हरसह 33 जण होते, त्यापैकी 32 जणांचा मृत्यू झाला. पावसामुळे काही काळ रेस्क्यू ऑपरेशनला व्यत्यय आला, मात्र पाऊस थांबल्याने वेगाने बचावकार्य सुरु आहे. अॅम्ब्युलन्स, पोलीस प्रशासन आणि स्थानि मिळून सर्वजण मदतकार्य करत आहेत, असं आमदार भरत गोगावले यांनी सांगितलं.
कृषीराज्यमंत्री घटनास्थळाकडे रवाना
कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आंबनेळी घाटात अपघातस्थळी भेट देण्यास सांगलीतून रवाना झाले. कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांचा अपघात झाल्याने कृषी राज्यमंत्र्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
अपघातातील मृतांची नावे
1. संदीप भोसले
2. प्रमोद शिगवण
3. पंकज कदम
4. संजीव झगडे
5. निलेश तांबे
6. संतोष झगडे
7. रत्नाकर पागडे
8. दत्तात्रय धायगुडे
9. हेमंत सुर्वे
10. सचिन गुजर
11. राजाराम गावडे
12. राजेश सावंत
13. रोशन तबीब
14. सुनील साठले
15. संतोष जालगावकर
16. राजेंद्र बंडबे
17. संदीप सुवरे
18. सचिन गिम्हवणेकर
19. सुयश बाळ
20. सचिन झगडे
21. प्रमोद जाधव
22. रितेश जाधव
23. विक्रांत शिंदे
24. सुनील कदम
25. जयवंत चौगुले
26. विनायक सावंत
27. राजेंद्र रिसबूड
28. किशोर चौगुले
29. संदीप झगडे
30. प्रशांत भांबीर
एकमेव बचावले - प्रकाश सावंत देसाई
संबंधित बातम्या
पोलादपूर घाटात बस दरीत कोसळली, 30 जणांचा मृत्यू
प्रकाश देसाई दरीतून वर आले, रेंज आल्यावर अपघाताची माहिती दिली!
पोलादपूर बस दुर्घटना : बायकोने थांबवलं म्हणून जीव वाचला, प्रवीण रणदिवेंची पहिली प्रतिक्रिया
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
क्राईम
राजकारण
क्रिकेट
Advertisement