वाल्मिक कराडचा 21 ऑगस्ट 2024 चा 'तो' फोटो आला समोर, संजय राऊतांनी थेट ट्विट करून उडवून दिली खळबळ!
संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या संदर्भाने संजय राऊत यांनी एक्स या समाजमाध्यावर एक फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो पोस्ट करून त्यांनी सरकारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
मुंबई : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्याप्रकरणामुळे राज्य सरकार चांगलेच अडचणीत आले आहे. या हत्याप्रकरणात रोज नवनवे खुलासे होत आहेत. विशेष म्हणजे विरोधकांनीही हे प्रकरण चांगलेच लावून धरले असून मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला जात आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचे नाव आल्यानंतर या मागणीने चांगलाच जोर धरला आहे. दरम्यान, एकीकडे वाल्मिक कराडला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली जात असताना आता शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी एक फोटो पोस्ट करून खळबळ उडवून दिली आहे. हा फोटो पोस्ट करत मस्साजोगचे ग्रामस्थ अत्यंत दहशतीत आहेत, जनता अगतिक झाली आहे, असा दावा त्यांनी केलाय.
संजय राऊत यांच्या पोस्टमध्ये नेमकं काय आहे?
संजय राऊत यांनी एक्स या समाजमाध्यमावर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे बसलेले दिसत आहेत. संतोष देशमुख यांच्या खुनाचा आरोप असलेला वाल्मिक कराड हादेखील या फोटोमध्ये उभा असलेला दिसतोय. विशेष म्हणजे वाल्मिक कराडच्या बाजूलाच धनंजय मुंडे उभे असलेले दिसत आहेत. या फोटोवर 21 ऑगस्ट 2024 रोजीची असे प्रिंट झालेले दिसत आहे. हा फोटो पोस्ट करून 'एका फ्रेममध्ये सगळे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास खरंच होईल का? मस्साजोगचे ग्रामस्थ अत्यंत दहशतीत आहेत. ग्रामस्थ म्हणतायेत सरकारला जमत नसेल तर सरकारने गावाला लाकडं पाठवून द्यावी. आम्ही सगळे जळून घेतो. असंही कराड सुटून आल्यावर आम्हाला मारणारच आहे. अगतिक जनता' असं म्हणत राऊत यांनी संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाच्या तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
एका फ्रेममध्ये सगळे.
— Sanjay Raut (@rautsanjay61) January 7, 2025
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास खरच होईल का?
मस्साजोगचे ग्रामस्थ अत्यंत दहशतीत आहेत
ग्रामस्थ म्हणतायेत "सरकारला जमत नसेल तर सरकारने गावाला लाकडं पाठवून द्यावी. आम्ही सगळे जळून घेतो. असंही कराड सुटून आल्यावर आम्हाला मारणारच आहे".
अगतिक जनता pic.twitter.com/4MSWOLi3iO
कराडला कठोर शिक्षा करावी अशी मागणी
संतोष देशमुख हत्या प्रकरण भाजपाचेच आमदार सुरेश धस यांनी लावून धरले आहे. धस रोज नवनवे खुलासे करत आहेत. देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा हात आहे, असा थेट दावा ते करत आहेत. कराडला कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केलीय. सोबतच त्यांच्या आरोपांचा रोख धनंजय मुंडे यांच्याकडेही आहे. त्यांनी मुंडे यांचे थेट नाव मात्र घेतलेले नाही.
हेही वाचा :