आदित्य ठाकरेंना बेबी पेन्ग्विन म्हणणाऱ्या समित ठक्करला अटक, पंतप्रधान मोदी करतात फॉलो
आदित्य ठाकरेंना बेबी पेन्ग्विन म्हणणाऱ्या तसेच मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या समित ठक्करला काल राजकोटमधून अटक केली आहे. आज त्याला नागपूर कोर्टात हजर करणार आहेत. अमृता फडणवीसांसहीत अनेकांनी त्याची पाठराखण केली होती. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदी त्याला ट्विटरवर फॉलो करतात.
नागपूर : पर्यावरण तसेच पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंना बेबी पेन्ग्विन म्हणणाऱ्या तसेच मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या समित ठक्करला काल राजकोटमधून अटक केली आहे. आज त्याला नागपूर कोर्टात हजर करणार आहेत. अमृता फडणवीसांसहीत अनेकांनी त्याची पाठराखण केली होती. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदी त्याला ट्विटरवर फॉलो करतात
सोशल मीडियाच्या माध्यमातून खासकरून ट्विटरच्या माध्यमातून ठाकरे सरकारवर टीका करणाऱ्या आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर खाजगी टीका करणाऱ्या समित ठक्करला नागपूर पोलिसांनी गुजरातमधील राजकोटमधून अटक केली आहे.
नागपूरच्या सीताबर्डी पोलीस ठाण्यात शिवसैनिकांनी ऑगस्ट महिन्यात समित ठक्कर विरोधात तक्रार दिली होती. समित ठक्कर ट्विटरच्या माध्यमातून सतत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र सरकारच्या विविध मंत्र्यांच्या विरोधात आक्षेपार्ह ट्विट करतो. धार्मिक भावना दुखावतील असे मजकूर ट्विट करतो, असे आरोप शिवसैनिकांनी केले होते. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर पोलीस समित ठक्करचा शोध घेत असताना समुतला काही अटींवर न्यायालयातून दिलासा मिळत अटकेपासून संरक्षण मिळालं होतं.
मात्र, गेल्या काही दिवसांपासून पुन्हा समित ठक्करच्या ट्विटर अकाउंटवरुन राज्य सरकार आणि शिवसेनेविरोधात टीका सुरु झाल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला होता. शनिवारी नागपूरच्या सीताबर्डी पोलीस स्टेशनच्या पथकाने समित ठक्करला राजकोटमधून अटक केली. त्याला ट्रांजिट रिमांडवर नागपूरला आणण्यात आले असून आज न्यायालयात दाखल केले जाणार आहे.
ट्विटरवर समित ठक्करचे हजारो फॉलोवर्स असून सध्या ती संख्या 60 हजारांच्या घरात आहे. तर भाजपचे अनेक मात्तबर नेते सुद्धा समित ठक्करला ट्विटर वर फॉलो करतात. यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा देखील समावेश आहे. त्यामुळे भाजपच्या अंतर्गत गोटात त्याचा प्रभाव असल्याचे बोलले जात आहे.
आता त्याच समीत ठक्करला पोलिसांनी अटक केल्यानंतर महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजप दरम्यान राजकीय कलगीतुरा वाढण्याची शक्यता आहे. गेले दोन दिवसांपासून #रिलीजसमितठक्कर ट्रेंड होत आहे. तसेच अनेक भाजप नेते हा हॅशटॅग वापरून समित ठक्करला मुक्त करण्यात यावे असे ट्विट करत आहेत. दरम्यान, नागपुरात शिवसैनिकांनी समित ठक्करला अटक झाल्याचा आनंद व्यक्त करत महाराष्ट्र पोलिसांना धन्यवाद दिले आहे.