एक्स्प्लोर
महाराष्ट्र धर्माचे सरकार : सामना
'मराठी माणूस आळशी नाही व तो फाजील अपेक्षाही ठेवत नाही. मात्र त्याला खोटेपणाची आणि ढोंगाची चीड आहे. त्याच चिडीतून आजचे सरकार अभिमानाची ज्वाळा उसळावी तसे जन्माला आले आहे. महाराष्ट्र धर्म हा व्यापक आहे. त्याच महाराष्ट्र धर्मातून शिवरायांचे स्वराज्य अवतरले. ते स्वराज्य सगळ्यांचे होते. उद्धव ठाकरे यांचे नवे सरकार त्याच महाराष्ट्र धर्माचे पालन करील.' असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.
मुंबई : उद्धव ठाकरेंचे महाराष्ट्र धर्माचे सरकार सत्तेत येत आहे. त्यामुळे आता राज्यात महाराष्ट्र धर्माचं पालन होईल.. उद्धव ठाकरेंचं सरकार कसं येतं ते पाहूयात म्हणणाऱ्यांनीही एकदा महाराष्ट्र धर्माचं मर्म तपासून घ्यावं, असं म्हणत सामनातून भाजपला टोला लगावण्यात आला आहे. शिवाय, सत्तेसाठी लाचारी स्वीकारल्याच्या आरोपांनाही सामनातून चोख प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे 29 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. राज्याला दोन मुख्यमंत्री देणाऱ्या ठाकरे घराण्यातून पहिल्यांदाच कुणी व्यक्ती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहे. राज्यपालांनी शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी पत्र दिलं आहे. 28 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजून 40 मिनिटांनी उद्धव ठाकरे शिवतीर्थावर शपथ घेतील. महाविकासआघाडीच्या नेत्यांनी राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेत सत्तास्थापनेचा दावा केला. अनेक अडथळ्यांनंतर शिवसेना आज पुन्हा सत्तेच्या केंद्रस्थानी आली आहे. आणि ती ही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली. दरम्यान, आज शिवसेनेचं मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सामना वृत्तपत्रात 'महाराष्ट्र धर्माच सरकार' या मथळ्याखाली अग्रलेख लिहिण्यात आला आहे. या अग्रलेखातून महाराष्ट्रात आज नवा सूर्योदय झाला आहे, असे म्हणत सरकार स्थापनेवरून शिवसेनेवर लावण्यात आलेल्या आरोपांचेही खंडन केले आहे.
'मी उद्धव बाळासाहेब ठाकरे'... लेखक, कवी, उत्तम फोटोग्राफर ते मुख्यमंत्री, भन्नाट जीवनप्रवास
काय आहे सामनाच्या अग्रलेखात?
मराठी माणूस आळशी नाही व तो फाजील अपेक्षाही ठेवत नाही. मात्र त्याला खोटेपणाची आणि ढोंगाची चीड आहे. त्याच चिडीतून आजचे सरकार अभिमानाची ज्वाळा उसळावी तसे जन्माला आले आहे. महाराष्ट्र धर्म हा व्यापक आहे. त्याच महाराष्ट्र धर्मातून शिवरायांचे स्वराज्य अवतरले. ते स्वराज्य सगळ्यांचे होते. उद्धव ठाकरे यांचे नवे सरकार त्याच महाराष्ट्र धर्माचे पालन करील. महाराष्ट्र धर्माचे नवे सरकार आले आहे. 'ते कसे येते ते पाहू' असे जे सांगत होते त्यांनीही महाराष्ट्र धर्माचे मर्म एकदा तपासावे. उद्धवांचे सरकार सुरू होत आहे. त्यांना शुभेच्छा!!
महाराष्ट्रावर नवा सूर्योदय झाला आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची घोषणा होताच महाराष्ट्राच्या मनात आनंदाचे तरंग उठले होते. आज उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार अधिकारावर येईल. 15 ऑगस्ट 1947 साली स्वातंत्र्य दिनानिमित्त जसा उत्स्फूर्त सोहळा महाराष्ट्रासह संपूर्ण हिंदुस्थानात साजरा झाला तोच आनंद, तोच जोश आज महाराष्ट्रातच नाही, तर संपूर्ण देशात दिसत आहे. महाराष्ट्रनिर्मितीची घोषणा शिवनेरीवर झाली आणि सारा मराठी माणूस उत्साहाने, आनंदाने, आशा-अपेक्षांनी उचंबळून आला होता. आजही त्यापेक्षा वेगळे चित्र नाही. शिवसेनेचा मुख्यमंत्री व त्यातही उद्धव ठाकरे या पदावर विराजमान होत आहेत हे महाराष्ट्राचे भाग्य आहे. मराठी माणसाला धन्य वाटावे, कोणीही हेवा करावा असाच हा सोहळा आहे. जे श्री. उद्धव ठाकरे यांना ओळखतात त्यांच्या मनात एक विश्वास आहे तो म्हणजे, एखादी जबाबदारी त्यांनी स्वीकारली की ती ते तडीस नेतात. उद्धव ठाकरे यांचे वैशिष्ट्य असे की, बाहेर वादळ असले की ते शांत राहतात व शांतता झाली की वादळ निर्माण करतात. देशातील भलेभले पुढारी दिल्लीश्वरांसमोर गुडघे टेकत आहेत असे चित्र असताना उद्धव ठाकरे यांनी कोणताही दबाव जुमानला नाही. स्वाभिमान गहाण ठेवणाऱ्या तडजोडी केल्या नाहीत व ज्यांनी बाळासाहेबांच्या साक्षीने 'खोटे' बोलण्याचा प्रयत्न केला. त्या ढोंगाशी हातमिळवणी केली नाही. 'काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे सरकार हे तीन पायांचे आहे व ते टिकणार नाही,' असा शाप देवेंद्र फडणवीस यांनी शुभमुहूर्तावरच दिला आहे. पण हा त्यांचा भ्रम आहे. हे सरकार राष्ट्रीय प्रश्नांवर नाही, तर महाराष्ट्राच्या प्रश्नांवर आणि विकासाच्या मुद्द्यांवर स्थापन झाले आहे व राज्याचा विकास करण्याबाबत तिन्ही पक्षांत कोणतेही मतभेद नाहीत. मुख्य म्हणजे सरकारी बंगले, सरकारी कार्यालये व तपास यंत्रणांचा वापर कपट-कारस्थानांसाठी होणार नाही हे पक्के. त्यामुळे स्वच्छ-निर्मळ मनाने कारभार चालेल. शरद पवार यांच्यासारखा अनुभवी
खंदा मार्गदर्शक
पाठीशी आहे. तीनही बाजूला प्रशासनाची चांगलीच जाण असलेल्या माणसांची फौज आहे. मुख्य म्हणजे कुणाच्याही मनात एकमेकांविषयी जळमटे नाहीत. सरकारने सरकारचे काम करावे आणि मागच्या चारेक दिवसांत काय घडले त्या चिखलात दगड न मारता विरोधी पक्षाने विधायक भूमिका बजावावी. लोकशाहीचे संकेत हेच आहेत. दहशत निर्माण करून सरकारे बनविण्याचे व पाडण्याचे खेळ पाच वर्षांत देशात झाले. महाराष्ट्र या सगळय़ांना पुरून उरला. महाराष्ट्राला काय हवे आहे, याचा विचार एकत्र बसून करण्याची वेळ आली आहे. खेड्यापाड्यातील बांधावर राहणारा, शेतावर राबणारा माणूस डोळय़ासमोर ठेवून प्रत्येकाला काम करावे लागेल. शेतकऱ्यास त्याची चूल पेटवता यावी, मुलाबाळांचे शिक्षण करता यावे इतके उत्पन्न तरी मिळावे. कर्जाच्या ओझ्याखाली गुदमरलेला बळीराजाचा श्वास मोकळा कसा करता येईल यादृष्टीने काम करणे गरजेचे आहे. पोटभर अन्न, अंगभर कपडा व कोणत्याही बाबतीत
लाचारी न जाणवण्याइतकी सुस्थिती
खेड्यापाड्यात व झोपड्या-झोपड्यांत नांदली पाहिजे. अन्न-वस्त्राची ददात असता कामा नये. त्याचबरोबर बौद्धिक लाचारी न वाटण्याइतकी शैक्षणिक पातळी असली पाहिजे. शेतकरी हा बळीराजा आहे असा साक्षात्कार प्रत्येकाला झाला पाहिजे. रिकाम्या हातांना काम आणि महाराष्ट्राला स्वाभिमान हे तत्त्व पाळण्यासाठी कोणत्याही वेगळय़ा कार्यक्रमाची गरज नाही. महाराष्ट्राच्या मातीत प्रगती आहे. हवा-पाण्यात कष्टाचा घाम आहे. मराठी माणूस आळशी नाही व तो फाजील अपेक्षाही ठेवत नाही. मात्र त्याला खोटेपणाची आणि ढोंगाची चीड आहे. त्याच चिडीतून आजचे सरकार अभिमानाची ज्वाळा उसळावी तसे जन्माला आले आहे. महाराष्ट्र धर्म हा व्यापक आहे. त्याच महाराष्ट्र धर्मातून शिवरायांचे स्वराज्य अवतरले. ते स्वराज्य सगळय़ांचे होते. उद्धव ठाकरे यांचे नवे सरकार त्याच महाराष्ट्र धर्माचे पालन करील. महाराष्ट्र धर्माचे नवे सरकार आले आहे. 'ते कसे येते ते पाहू' असे जे सांगत होते त्यांनीही महाराष्ट्र धर्माचे मर्म एकदा तपासावे. उद्धवांचे सरकार सुरू होत आहे. त्यांना शुभेच्छा!!
संबंधित बातम्या :
महाराष्ट्रात 20 वर्षांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री, उद्धव ठाकरेंचा आज शपथविधी
उद्धव ठाकरेंच्या शपथविधीचं आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना निमंत्रण, राज्यभरातून 400 शेतकरीही येणार
शिवसेनेचा मुख्यमंत्री होण्यासाठी पायी वारी करणाऱ्या शेतकरी दाम्पत्याला उद्धव ठाकरेंकडून शपथविधीचं निमंत्रण
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement