शिवसेनेचा मुख्यमंत्री होण्यासाठी पायी वारी करणाऱ्या शेतकरी दाम्पत्याला उद्धव ठाकरेंकडून शपथविधीचं निमंत्रण
शिवसेना पक्षप्रमुख आणि महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे उद्या (28 नोव्हेंबर) मुंबईत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानावर त्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.
![शिवसेनेचा मुख्यमंत्री होण्यासाठी पायी वारी करणाऱ्या शेतकरी दाम्पत्याला उद्धव ठाकरेंकडून शपथविधीचं निमंत्रण Uddhav Thackeray invites farmer couple to chief minister oath ceremony शिवसेनेचा मुख्यमंत्री होण्यासाठी पायी वारी करणाऱ्या शेतकरी दाम्पत्याला उद्धव ठाकरेंकडून शपथविधीचं निमंत्रण](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/11/27203934/ppur-farmer.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पंढरपूर : शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा म्हणून अनवाणी चालत विठुरायाला साकडं घालणाऱ्या शेतकरी दाम्पत्याचा नवस पूर्ण झाल्यानंतर आज त्याने येऊन पुन्हा विठुरायाचे दर्शन घेतले. उद्या शिवतीर्थावर होणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीसाठी या दाम्पत्याला विशेष निमंत्रण मिळाले आहे.
सांगलीच्या जत तालुक्यातील बनाळी येथील शेतकरी संजय सावंत आणि त्यांच्या पत्नी रुपाली यांनी शिवसेनेचा आणि तेही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी बनाळीपासून पंढरपूरपर्यंत अनवाणी चालत येऊन देवाला नवस केला होता. तीन दिवसांचा वेळ त्यांना यासाठी लागला होता. पंढरपुरात येऊन त्यांनी विठ्ठलास साकडे घालुन चंद्रभागेचा कलश आणि तुळशी उद्धव ठाकरे यांच्या अवकाळी नुकसान पाहणी दौऱ्याच्यावेळी त्याना दिले होते.बऱ्याच नाट्यमय घडामोडीनंतर आता उद्धव ठाकरे हे उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असून सावंत दाम्पत्याला यासाठी निमंत्रण आलं आहे. आज सकाळीच सावंत पुन्हा पंढरपूरला येऊन विठूरायाच्या चरणारवर नतमस्तक झाले. आपण घातलेल साकड देवाने पूर्ण केले. आता शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्याचे बळ शिवसेना मुख्यमंत्र्यांना मिळू दे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
शिवसेना पक्षप्रमुख आणि महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे उद्या (28 नोव्हेंबर) मुंबईत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानावर त्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. शिवसेना नेते विनायक राऊत यांच्याकडे शपथविधीच्या तयारीबाबत विचारणा केली. यावर राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीसाठी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील तब्बल 400 शेतकऱ्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. तसेच राज्यातील अनेक आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांनादेखील निमंत्रण पाठवण्यात आले आहे. राज्यातील शेतकऱ्यांना शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रित करुन आम्ही शेतकऱ्यांचा सन्मान करु इच्छितो, असे राऊत यांनी सांगितले.
शिवसेनेचे नेते आणि आमदार एकनाथ शिंदे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीसाठी शेतकऱ्यांसह काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. तर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले की, आम्ही शपथविधीसाठी विविध राज्यांमधील काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना बोलावलं आहे. तसेच द्रमुक पक्षाचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनादेखील निमंत्रण पाठवण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)