Pune Malin Village : अनेक संघर्षानंतर माळीणचं पुनर्वसन; मात्र धोका कायम, नवं माळीण गाव कसं वसलं?
अनेक संघर्षानंतर माळीणचं पुनर्वसन झालं मात्र धोका कायम आहे. इर्शाळवाडीच्या दुर्घटनेने डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या गावांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
Pune Malin Village : इर्शाळवाडीच्या दुर्घटनेने (Khalapur Irshalwadi Landslide) डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या गावांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. माळीण ते इर्शाळवाडी या दुर्घटनेनंतर यावर चर्चा होते. मात्र प्रत्यक्षात उपजीविकेमुळं ग्रामस्थ या जीवघेण्या ठिकाणीच राहणं पसंत करतात. अनेक संघर्षानंतर पुनर्वसन झालेल्या नव्या माळीण गावाने हेच अधोरेखित होतं. अनेक संघर्षानंतर माळीणचं पुनर्वसन झालं मात्र धोका कायम आहे.
सह्याद्रीच्या पर्वत रांगेतील निसर्ग पावसाळ्यात बहरून जातो. दाट धुक्यात हरवलेली घनदाट झाडी आणि त्यातून खळखळत वाहणारे धबधबे. हा निसर्ग डोळ्याचं अक्षरशः पारणं फेडतो. पण हाच निसर्ग पर्वतरांगांच्या पोटात राहणाऱ्या ग्रामस्थांच्या जीवावरही उठतो. रायगडच्या इर्शाळवाडीच्या घटनेनं हे वास्तव पुन्हा एकदा अधोरेखित झालं. डोंगराचा भाग कोसळून अख्ख गाव त्याखाली गाडलं जाण्याची ही काही पहिलीच घटना नाही. 30 जुलै 2014 ची रात्र पुण्यातील माळीणमध्येही अशीच घटना घडली होती. तो दिवस माळीणवासीय अजूनही विसरले नाहीत. पुणे जिल्ह्यात माळीण गाव होतं. 30 जुलै 2014 ची रात्र या गावासाठी अखेरची ठरली. एका रात्रीत गाव जमीनदोस्त झालं होतं.151 जणांचा मृत्यू तर शेकडो जनावरे दगावली आणि 30 जणांचा शोध लागलाच नव्हता.
पुनर्वसनासाठी संघर्ष...
माळीणच्या दुर्घटनेत कुटुंबियांना गमावलेल्या ग्रामस्थांचा पुनर्वसनासाठी संघर्ष सुरू झाला. माळीण गावाचं पुनर्वसन सुरुवातीला खाजगी जागेवर करायचं ठरलं होतं. दुर्घटनेतून बचावलेल्या ग्रामस्थांना त्यांचं शेत जवळ पडावं आणि दुभत्या जनावरांना जास्तीची पायपीट करायला लागू नये, म्हणून तसा निर्णय घेण्यात आला होता. मात्र जागा मालकाने त्यास नकार दिला परिणामी प्रशासनाला पुन्हा नव्या जागेची निवड करावी लागली आणि पुनर्वसनाची प्रतीक्षा वाढली.
नवं माळीणही डोंगराच्या उतारावरच...
पुनर्वसनासाठी नव्या जागेची शोध मोहीम सुरू झाली. माळीणच्याच लगतच्याच आमडे गावातील आठ एकर जागेचे 2015 साली भूसंपादनही झाले. 2 एप्रिल 2017ला नवं माळीण वसलं. पण दुर्दैवाने ही जागा डोंगराच्या उतारावरच मिळाली. त्यामुळंच प्रशासनाने आमचं आजचं मरण उद्यावर ढकललं, अशी खंत माळीणवासीय व्यक्त करत आहेत.
माळीणवासीय अजूनही पावसाळ्यात झोपत नाहीत...
विजय लेंभे कुटुंबियात एकूण बारा व्यक्ती होत्या. माळीणच्या दुर्घटनेत त्यातील दहा व्यक्ती दगावल्या आणि दोन सख्खे भाऊ उरले. त्यानंतर माळीणचं पुनर्वसन झालं. दुर्दैवाने हे पुनर्वसन डोंगराच्या पायथ्यालाच झालं. आज या स्मार्ट व्हिलेजमध्ये लेंभे कुटुंबीयांचं घर आहे मात्र इथली परिस्थिती पाहिली तर लेंभे कुटुंबियांना पावसाळ्यात रात्रभर झोप येत नाही, असं ते सांगतात. अशीच परिस्थिती माळीच्या सर्व कुटुंबियांची आहे. ऐन पावसाळ्यात पुन्हा एकदा तीच घटना घडेल का? असा प्रश्न त्यांच्या मनात घर करून बसला आहे. माळीणवासीय या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करतात. पण तळीये आणि इर्शाळवाडी दुर्घटना घडल्या की त्याच त्या वेदना त्यांना असह्य करतात. मधल्या काळात काही माळीणवासीयांना मानसोपचार तज्ञांकडून उपचारही देण्यात आले. हे सर्व काही भोगून ही उपजीविकेसाठी ते इथंच राहण्याला प्राधान्य देत आहेत.
उपजीविकेची साधनं असल्यानं माळीण सोडणं अशक्य!
महाराष्ट्रात आजही माळीण आणि इर्शाळवाडी सारखी असंख्य लहान-मोठी गावं, वाड्या-वस्त्या जीव मुठीत घेऊन डोंगऱ्यांच्या पायथ्याशी जगत आहेत. या गावांचं पुनर्वसन करावं, अशी मागणी अनेकदा झाली आहे. मात्र इथं राहणाऱ्यांच्या उपजीविकेची साधनं अर्थात शेती आणि दुभती जनावरं इथं सोडून त्यांना येता येत नाही. त्यामुळं अशाच जीवघेण्या ठिकाणीच ते राहणं पसंत करतात.