(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Chhagan Bhujbal : खरंच गृहमंत्रीपदावरून महायुतीची गाडी अडली? छगन भुजबळांनी सांगितलं कारण; म्हणाले, मोदी-शाह...
Chhagan Bhujbal : महायुतीत गृहमंत्रिपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरु असून यामुळे सरकारचा शपथविधी लांबणीवर पडत असल्याची चर्चा रंगली आहे.
नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या महायुतीला (Mahayuti) स्पष्ट बहुमत मिळाली. तर शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठा फटका बसला. यानंतर महायुतीत सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु आहेत. एकीकडे मुख्यमंत्रिपद भाजपला मिळणार असल्याचे स्पष्ट झाले असले तरी शिवसेना शिंदे गट गृहमंत्रिपदासाठी आग्रही असल्याचे बोलले जात आहे. यामुळे नव्या सरकारचा शपथविधी लांबणीवर पडत असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. आता यावरून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मोठं वक्तव्य केलंय.
नेमकं काय छगन भुजबळ?
छगन भुजबळ म्हणाले की, गृहमंत्री पदावरून काही पेच नाही. त्याच्यावरून काहीही अडलेले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह बाहेर होते, एका कॉन्फरन्समध्ये ते व्यस्त होते, त्यामुळे शपथविधी थोडा पुढे गेला आहे. अंतर्गत चर्चा सर्व पक्षात झाली आहे, प्रत्येक खातं महत्वाचं आहे. गृह खातं जेवढे चांगलं आहे तितकंच अडचणीच देखील आहे. कोण कुठे दंगल करतो, बलात्कार करतो, त्याचे देखील प्रश्न गृहमंत्र्यांना विचारले जातात. मी गृहमंत्री असताना तर गँगवॉर सुरू होता. काळी दिवाळी साजरी केली जात होती. मुंबईत लग्न देखील त्यावेळी कोणी करत नव्हते. गृहमंत्री पद म्हणजे काही सोपं काम नाही. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे की, यावर चर्चा करून मार्ग काढू, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
संजय राऊतांच्या वक्तव्यावर भुजबळांची प्रतिक्रिया
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी गृहखातं स्वतः कडे ठेवायला हवं होतं.गृहखातं, विधानसभेचं अध्यक्षपद हे संवेदनशील विषय होते. ते आमच्याकडे नसल्याने आमचं सरकार पडलं, असे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले. याबाबत विचारले असता छगन भुजबळ म्हणाले की, मला नाही माहिती ते काय म्हणालेत. नाना पटोले यांनी जर विधानसभा अध्यक्ष पद सोडले नसते तर पुढच्या घटना घडल्या नसत्या, असे त्यांच्याच पक्षातील कोणीतरी म्हटले. सोयीचं बोलण्यात काही अर्थ नाही, असे त्यांनी म्हटले.
छगन भुजबळांचा गुलाबराव पाटलांना टोला
विधानसभेला आम्ही केवळ 85 जागा लढलो होतो. अजितदादा आमच्यामध्ये आले नसते तर त्या जागा आम्हाला मिळाल्या असत्या. त्यामुळं आमच्या 90 ते 100 जागा आल्या असत्या, असे वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी केले. यावरून छगन भुजबळ यांनी गुलाबराव पाटलांना टोला लगावला आहे. ते आमच्यासोबत नसते तर आमच्याही 100 जागा आल्या असत्या, असे छगन भुजबळ यांनी म्हटले. तिघांनी मिळून जे चांगले निर्णय घेतले त्याचा फलित मिळालं असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
आणखी वाचा