Ratnagiri-Sindhudur Loksabha : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ कुणाचा? भाजपचा की शिंदे गटाचा? मंत्री केसरकरांच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण
Deepak Kesarkar : सध्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा (Ratnagiri-Sindhudur Loksabha) मतदारसंघाची जोरदार चर्चा सुरु आहे. मंत्री दीपक केसरकर यांच्या वक्तव्यानंतर या मतदारसंघाची चर्चा सुरु झाली आहे.
Ratnagiri-Sindhudur Loksabha : सध्या राज्यात कोकणातल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा (Ratnagiri-Sindhudur Loksabha) मतदारसंघाची जोरदार चर्चा सुरु आहे. ही चर्चा सुरु होण्याचं कारण म्हणजे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आणि शिंदे गटाचे सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर (Minister Deepak Kesarkar) यांनी केलेलं वक्तव्य. लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे (Minister Narayan Rane) स्वतः उभे राहिल्यास त्यांचा रत्नागिरी-सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघातून प्रचार करणार आणि त्यांना निवडून आणणार असल्याचे केसरकर म्हणाले होते. त्यांच्या याच वक्तव्यानंतर रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ नेमका कुणाचा? भाजपचा की शिंदे गटाचा? याची चर्चा सुरु झाली आहे.
दिपक केसरकर आणि नारायण राणे यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. राणे यांच्यावर केसरकर यांनी कायम राजकीय दहशतवादाचा उल्लेख करत टीका केली होती. शिवाय नारायण राणे यांच्या पुत्राला म्हणजेच निलेश राणे यांना लोकसभा निवडणुकीत आपणच पाडल्याचे केसरकर ठणकावून सांगत होते. शिवाय रत्नागिरी-सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघातून शिंदे गटाचा उमेदवार असणार आहे. त्यासाठी उद्योग मंत्री उदय सामंत यांचे मोठे बंधू किरण सामंत यांचे नाव देखील आघाडीवर आहे. असं असताना देखील शिंदे गटाचे मंत्री आणि आमदार असलेल्या केसरकर यांनी नारायण राणे यांच्या प्रचारार्थ केलेल्या वक्तव्यानंतर रत्नागिरी-सिंधुदुर्ग हा लोकसभा मतदारसंघ कुणाचा? अशी चर्चा सुरु झाली. त्यामुळं रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात भाजपचा उमेदवार असणार का शिंदे गटाचा? याचीही चर्चा सुरु आहे.
नेमकं काय म्हणाले होते दिपक केसरकर
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केलेल्या एका वक्तव्याकरुन राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झालीय. आगामी लोकसभा निवडणुकीत नारायण राणे उमेदवार असतील तर त्यांचा स्वतः प्रचार करून त्यांना निवडून आणणार असे वक्तव्य मंत्री दीपक केसरकर यांनी केलंय. एकेकाळी कट्टर राणे विरोधक अणाऱ्या दीपक केसरकर यांच्या या वक्तव्यामुळं राजकीय वर्तुळात आता एकच चर्चा सुरू आहे. मंत्री केसरकर एवढ्यावरच थांबले नाहीत तर आपण नारायण राणेंचा आदराने उल्लेख करतो असं देखील केसरकर म्हणाले. कोकणात दहशतवाद असा नेहमी उल्लेख करणारे आणि लोकसभेला नारायण राणेंच्या पुत्राला आपणच पाडलं असं ठणकावून सांगणाऱ्या दीपक केसरकर यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.