(Source: ECI/ABP News/ABP Majha)
डिसले गुरुजींसाठी रविवारीही शिक्षण विभाग सुरु राहणार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची माहिती
महाराष्ट्राचं नाव जगात झळकावणारे ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते रणजितसिंह डिसले यांचा परदेशात स्कॉलरशिपसाठी जाण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला असून त्यांच्या या स्कॉलरशीप प्रक्रियेसाठी शिक्षण विभाग आता रविवारीही काम करणार आहे.
Ranjitsinh Disale News : ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते रणजितसिंह डिसले यांना परदेशात स्कॉलरशिप संपादन करण्यासाठी जाण्याकरता बऱ्याच अडचणी येत होत्या. त्यांच्याबद्दल एक चौकशी अहवाल समोर आला होता. 2017 साली रणजितसिंह डिसले यांची जिल्हा शिक्षण प्रशिक्षण केंद्र येथे प्रतिनियुक्तीवर नियुक्ती करण्यात आलेली होती. मात्र या ठिकाणी डिसले गुरुजी हे तीन वर्षे गैरहजर होते. असा अहवाल जिल्हा शिक्षण प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्यांकडून प्राप्त झाला होता. पण या प्रकरणाची संपूर्ण चौकशी झाल्यानंतर राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना डिसले यांना स्कॉलरशीपसाठी परदेशात पाठवण्यात यावे असे निर्देश दिले आहेत. विशेष म्हणजे यासाठी शिक्षण विभाग आज आणि उद्या म्हणजेच सुट्टीचा दिवस असणाऱ्या रविवारीही चालू राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. सुट्टी असली तरी विभाग सुरू राहणार असल्याची माहिती सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली आहे.
शिक्षणंत्री वर्षा गायकवाड यांच्या आदेशानंतर सोलापूर शिक्षण विभागाने कामाला त्वरीत सुरु केली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी याची माहिती देताना ते म्हणाले, 'डिसले यांना परवानगी देण्यासाठी कागदपत्रे पूर्तता करून घेण्यासाठी जिल्हा परिषद प्रयत्नशील आहे. त्यांच्या शिष्यवृत्तीला जिल्हा परिषदेचा कधीच विरोध नव्हता. तसंच मला डिसलेंबाबत कोणताही चौकशी अहवाल प्राप्त झालेला नाही. जर तसा अहवाल असेल तर सोमवारी मागवून घेतला जाईल, त्याची खातरजमा करून घेतली जाईल. विनाकारण कोणतीच कारवाई केली जाणार नाही, त्यामुळे डिसले गुरुजींना काळजी करण्याची गरज नाही. डॉ. किरण लोहार यांच्याशी आज माझी भेट झालेली नाही, मात्र त्यांना समक्ष बोलवून प्रत्येक गोष्ट तपासून घेतली जाईल. तसंच डिसले यांना मी एक पत्र देणार आहे ज्यामध्ये जर कोणी तुम्हाल त्रास दिला असेल ते त्यांनी त्यांची नावं, पुरावे द्यावे त्यांच्यावर कारवाई केली जाईल तसंच डिसले यांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा!'
संबंधित बातम्या
- ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसलेंना सरकारी 'बाबूं'चा त्रास, नोकरी सोडण्याच्या मनस्थितीत
- ग्लोबल टीचरची लोकल कुचंबणा! जिल्हा प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांची फुलब्राईट शिष्यवृत्तीसाठी रजा मंजूर करण्यात आडकाठी
- आता राज्यभर 'शाळा' घेणार ग्लोबल टिचर रणजितसिंह डिसले, सर्व जिल्ह्यांमध्ये देणार धडे