ग्लोबल टीचरची लोकल कुचंबणा! जिल्हा प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांची फुलब्राईट शिष्यवृत्तीसाठी रजा मंजूर करण्यात आडकाठी
Global Teacher Ranjitsinh Disale : डिसले गुरुजींनी रजेची परवानगी मागितल्यावर शाळेचे काय करणार? असा सवाल शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांनी त्यांना केला आहे. यावरुन भाजपनं निशाणा साधला आहे.
Global Teacher Ranjitsinh Disale : ग्लोबल टीचर पुरस्कारप्राप्त शिक्षक रणजित डिसले हे वादात अडकण्याची चिन्हं आहेत. डिसले यांनी अध्ययन रजेचा अर्ज तसंच परदेश प्रवासाची अनुमती (शासकीय नोकरीत असल्यामुळे झेडपी प्रशासनाने द्यायची असते) मिळावी, यासाठी अर्ज केला होता. त्यांच्या अर्जात त्रुटी असल्याचं समोर आलं असून, शिक्षणाधिकाऱ्यांनी रणजित डिसले यांच्यावर काही गंभीर आरोपही केले आहेत.
रणजित डिसले यांनी डिसेंबर महिन्यात मुख्याध्यापकांमार्फत गट शिक्षण अधिकाऱ्याकडे दिलेला रजेचा तसंच परदेश प्रवासाच्या अनुमतीचा अर्ज (शासकीय नोकरीत असल्यामुळे झेडपी प्रशासनाने द्यायची असते) गेल्या दीड महिन्यांपासून टेबलावर पडून आहे. याचा अर्जाचा पाठपुरावा करण्यासाठी गुरुवारी डिसले सोलापूर जिल्हापरिषदेचे प्रशासन प्रमुख मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे गेले होते. दरम्यान, जास्तीत जास्त दोन वर्षे कालावधीपर्यंत अध्ययन रजा मिळण्याची तरतूद आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
चार डिसेंबर 2021 रोजी अमेरिकन सरकारकडून जगभरातील 40 शिक्षकांना प्रतिष्ठेची फुलब्राईट शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली. यामध्ये भारतातून रणजीत डिसले यांची निवड करण्यात आली. 'पीस इन एज्युकेशन' या विषयावर अमेरिकेतील विद्यापीठाकडून डिसले यांना ही शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. डिसले गुरुजी यांना यासाठी 6 महिने अमेरिकेत जायचे आहे. दरम्यान त्यांनी दीड महिन्यांपूर्वी सोलापूर जिल्हा परिषदेकडे अध्यापन रजेचा आणि परदेश प्रवासाच्या अनुमतीचा अर्ज केला होता. याच संदर्भात गुरुवारी डिसले गुरुजींनी सोलापूर जिल्हापरिषदेचे प्रशासन प्रमुख मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांना अर्जात त्रुटी असल्याचं सांगण्यात आले.
शिक्षणाधिकारी काय म्हणाले?
धक्कादायक बाब म्हणजे या प्रकारानंतर सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांनी रणजित डिसले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. डिसले यांनी सादर केलेल्या अर्जात त्रुटी होत्या. रणजित डिसले हे लोकांची दिशाभूल करतात. तसेच जिथे प्रतिनियुक्तीवर नियुक्ती होती, त्याठिकाणी ते मागील 3 वर्षांपासून गैरहजर आहेत, तसा रिपोर्ट संबंधित प्राचार्यांचा आहे. डिसले यांना ग्लोबल टीचर अवॉर्ड मिळाला ही आनंदाची बाब आहे, तरी त्याचा त्यांच्या शाळेला काही फायदा झालाय असे मला वाटत नाही. तीन वर्षांपासून गैरहजर असताना फायदा होईल तरी कसा? असा प्रश्न शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांनी उपस्थित केलाय.
गुरुवारी एका अर्जावर सही घेण्यासाठी डिसले आले होते, मात्र त्यासाठीच्या कायदेशीर बाबींची पूर्तता त्यांनी केली नव्हती. परदेशात शिक्षण घ्यायचं असेल तर पासपोर्ट, वैद्यकीय प्रमाणपत्र , संबंधित परदेशी विद्यापीठाचे माहितीपत्रक देणे गरजेचे होते. मात्र त्यांनी अशी कोणतीही कागदपत्रे सादर केली नाहीत. दीड महिन्यांपूर्वी अर्ज सादर केला होता, असे स्पष्टीकरण त्यांनी वर्तमानपत्राच्या माध्यमातून दिले आहे. अर्ज केला होता तर स्वतः परस्पर सही घेण्यासाठी का आले होते? त्यामुळे डिसले गुरुजींचे वक्तव्य दिशाभूल करणारे आहे. दोन वर्षे प्रतिनियुक्तीवर असणारा माणूस तीन वर्षे कसं काय गैरहजर राहू शकतो? डिसले यांच्या चौकशीसाठी पाच सदस्यीय कमिटी नेमलेली होती, त्याचा अहवाल या कार्यालयाला प्राप्त झालेला आहे. त्यावर आमचं काम सुरू आहे. त्यांच्यावर कायदेशीररित्या जी काही कार्यवाही करणे गरजेचे आहे ती केली जाईल, असे डॉ. किरण लोहार यांनी सांगितले.
डिसले गुरुजी काय म्हणाले?
या संदर्भात जिल्हा परिषदेकडून अद्याप कोणताही लेखी आदेश मला मिळालेले नाहीत. लेखी आदेश आल्यानंतर भूमिका स्पष्ट करू, अशी प्रतिक्रिया डॉ. रणजितसिंह डिसले यांनी दिली.
भाजपकडून निषेध -
ग्लोबल टिचर पुरस्कार मिळवणारे बार्शी जी सोलापूर जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक रणजित डिसले गुरुजी यांनी PHD करण्यासाठी अमेरिका जायला रजा मागितली. पण शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी डिसले यांना रजा नाकारणे, त्यांच्या जाण्यावर आक्षेप घेणे निंदनीय आहे. देशाच्या शिक्षण क्षेत्राची मान उंचवणाऱ्या गुरुजीला असा अनुभव येणे चुकीचे असून अशा शिक्षणधिकाऱ्याचा निषेध आहे, असं भाजपचे राज्य प्रवके राम कुलकर्णी यांनी केला आहे.
कोण आहेत रणजित डिसले?
- 2009 साली सोलापूर जिल्हा परिषदेत शिक्षक म्हणून रुजू
- सोलापूर जिल्हा परिषदेच्या परितेवाडीच्या शाळेत प्राथमीक शिक्षक म्हणून कार्य
- 2017 साली सोलापुरातील वेळापूर येथील जिल्हा शिक्षण प्रशिक्षण केंद्र येथे प्रतिनियुक्ती
- जिल्हा शिक्षण प्रशिक्षण केंद्रात IT विषय सहाय्यक म्हणून नेमणूक
- तंत्रस्नेही अशी ओळख असलेल्या डिसले यांनी विद्यार्थ्यांना व्हर्च्युअल विज्ञान प्रयोग शिकवले
- QR कोडेड पाठयपुस्तकाची संकल्पना मांडली
- लेट्स क्रॉस द बॉर्डर या उपक्रमाच्या माध्यमातून जगभरातील अशांत देशातील मुलांना एकत्र आणून त्यांच्यात अहिंसेच्या विचारांचा प्रसार करण्याचे काम
- कार्याची दखल घेत त्यांना 4 डिसेंबर 2020 रोजी ग्लोबल टीचर अवॉर्ड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
- जून 2021 मध्ये वशिंग्टन dc मधील जागतिक बँकेच्या सल्लागर पदी नेमणूक करण्यात आली
- शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल ग्वाल्हेरच्या आयटीएम विद्यापीठकडून 20 नोव्हेंबर 2021 रोजी मानद डॉक्टरेट प्रदान
- 1 डिसेंबर 2021 रोजी अमेरिकेन सरकारची प्रतिष्ठित फुल ब्राईट स्कॉलरशिप जाहीर करण्यात आली
- याच स्कॉलरशिपसाठी डिसले यांना अमेरिकेत जायचे आहे
काय आहे फुलब्राईट शिष्यवृत्ती?
- अमेरिकन सरकारकडून दिली जाणारी प्रतिष्ठित फुलब्राईट स्कॉलरशिप
- 2021 मध्ये जगभरातील 40 शिक्षकांना ही प्रतिष्ठेची स्कॉलरशिप जाहीर
- पीस इन एज्युकेशन या विषयावर अमेरिकेतील विद्यापीठात अधिक संशोधन करण्यासाठी त्यांना ही स्कॉलरशिप जाहीर करण्यात आली
- लेट्स क्रॉस द बॉर्डर या उपक्रमाच्या माध्यमातून ते जगभरातील अशांत देशातील मुलांना एकत्र आणून त्यांच्यात अहिंसेच्या विचारांचा प्रसार करण्याचे काम ते करत आहेत
- याच विषयावर अधिक संशोधन करण्याची संधी डिसले गुरुजींना या स्कॉलरशिपच्या माध्यमातून मिळणार
- अमेरिकन सरकारकडून दिली जात असून हे 75 वे वर्ष आहे.
संबंधित बातम्या
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI