महायुतीच्या जाहीरनाम्याशी माझा संबंध नाही हे अजितदादांनी स्पष्ट करावं, कर्जमाफीवरुन शेट्टींचा हल्लाबोल
कर्जमाफीच्या मुद्यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti ) आक्रमक झालेत. कर्जमाफीवरुन त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर टीका केलीय.

Raju Shetti : कर्जमाफीच्या मुद्यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti ) आक्रमक झाले आहेत. कर्जमाफीच्या (loan waiver) मुद्यावरुन त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर टीका केलीय. महायुतीने जो जाहीरनामा प्रसिद्ध केला होता, त्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करायचं आश्वासनं दिलं होतं की नाही? शेतकऱ्यांना हमीभावावर 20 टक्के ज्यादा अनुदान देण्याचे कबूल केलं होतं की नाही? हे अजित पवार यांनी स्पष्ट करावं असे शेट्टी म्हणाले. कर्जमाफी करणार असं मी म्हणालो नव्हतो, असे अजित पवार म्हणाले होते, त्यांच्या या वक्तव्यावर शेट्टी यांनी टीका केली.
महायुतीने जो जाहीरनामा प्रसिद्ध केला होता, त्या जाहीरनाम्याशी माझा काहीही संबंध नाही, माझा पक्षाचा त्या जाहीरनाम्याशी काही संबंध नाही हे अजित पवारांनी स्पष्ट करावं असे राजू शेट्टी म्हणाले. त्यावेळी महायुतीचे नेते हे देवेंद्र फडणवीस होते. त्यांनी पुन्हा पुन्हा शेतकऱ्यांचा सातबारा कोरा कोरा कोरा करणार असे आश्वासन दिले होते. त्यांच्यावर शेतकऱ्यांना विश्वास ठेवला. त्यामुळं आता अजितदादांनी स्पष्ट करावं की शेतकऱ्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेऊन चूक केली, असे राजू शेट्टी म्हणाले.
नेमकं काय म्हणाले होते अजित पवार?
महायुती सरकारने सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात जाहीरनाम्यामध्ये घोषणा केली होती. मात्र, सत्तेत आल्यानंतर निधीचे कारण देत शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. यासंदर्भात सातत्याने विरोधकांकडून टीका होत असताना आज (2 मे) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूरमध्ये बोलताना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर अक्षरशः हात झटकले. त्यामुळे कर्जमाफीवरून पुन्हा एकदा राज्यामध्ये रणकंदन होण्याची शक्यता आहे.
कोल्हापुरात या संदर्भात बोलताना अजित पवार म्हणाले की, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आश्वासन कोणी दिलं? मी दिलं आहे का? मी दिलं आहे का? मी तरी दिलेलं नाही, असं म्हणत एक प्रकारे या मुद्द्याला बगल देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर आता शेतकऱ्यांमध्ये रोज असंतोष निर्माण होण्याची शक्यता आहे. महायुतीच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आलं होतं. दरम्यान, लाडकी बहीण हप्त्याच्या संदर्भाने अजित पवार यांनी भाष्य केले. ते म्हणाले की लाडक्या बहिणी योजनेचं आम्ही नियोजन केलं आहे. आदित्य तटकरे यांनी सांगितल्यानंतर तातडीने नियोजन केलं असून सगळ्या योजनांचे पैसे देण्याचा प्रयत्न करत असल्याचे अजित पवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
























