(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Omicron : लसीकरणाचा 12 कोटींचा टप्पा पार, 4.37 कोटी नागरिकांना कोरोना लसीचे दोन्ही डोस; राजेश टोपेंची माहिती
Rajesh Tope On Vaccination : राज्यातील 4.37 कोटी नागरिकांना कोरोना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. तर कोरोना लसीचे एकूण 12 कोटी डोस देण्यात आले आहेत.
मुंबई : राज्यात ओमायक्रॉनच्या संसर्गाचा एकही नवा रुग्ण मंगळवारी आढळून आला नाही. त्यामुळे ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या सध्या 10 आहे. तसेच राज्यात कोरोना लसीकरणाचे 12 कोटी डोस पूर्ण झाल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. गुरुवारी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी सर्व राज्यातील आरोग्यमंत्र्यांची एक बैठक बोलावली असल्याचंही त्यांनी सांगितलं.
गेल्या साधारण दीड वर्षांपासून जगभरात थैमान घालत असलेल्या करोना विषाणूपासून सुटका मिळवण्यासाठी लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहेत. भारतातही या करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने चांगलाच वेग घेतला आहे. तर महाराष्ट्राने करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा मोठा टप्पा आता गाठला आहे.
महाराष्ट्राने 12 कोटी लाभार्थ्यांच्या लसीकरणाचा टप्पा पार करत मोठा विक्रम केला आहे. 7 डिसेंबरपर्यंत महाराष्ट्रात एकूण 12 कोटी 3 लाख 18 हजार 140 लाभार्थ्यांनी करोना प्रतिबंधक लस टोचून घेतली. यापैकी 7 कोटी 65 लाख 71 हजार 728 जणांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर, 4 कोटी 37 लाख 46 हजार 512 जणांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. 7 डिसेंबर रोजी राज्यात 8 लाख 30 हजार 766 लाभार्थ्यांचं लसीकरण करण्यात आलं.
“राज्यात कोविड प्रतिबंधात्मक लसीचे बारा कोटी मात्रा देण्याचा टप्पा आज पार करण्यात यश आले. राज्याने 10 कोटींचा टप्पा नऊ नोव्हेंबरला तर अकरा कोटींचा टप्पा 25 नोव्हेंबर रोजी पार केला होता. सध्या राज्यात 12 कोटी 2 लाख 70 हजार 585 लस दिल्या आहेत. 4.37 कोटी नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत." अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करून दिली.
राज्यात ओमायक्रॉनच्या संसर्गाचा एकही नवा रुग्ण मंगळवारी आढळून आला नाही. त्यामुळे ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या सध्या 10 आहे. राज्यात मंगळवारी दिवसभरात 699 नव्या रुग्णांचे निदान झाले असून 19 मृत्यू झाले. उल्हासनगर, भिवंडी महापालिका क्षेत्रात मंगळवारी एकही नवा करोना रुग्ण आढळून आला नाही.राज्यात दिवसभरात 1087 रुग्ण करोनामुक्त झाले असून उपचाराधीन रुग्णांची संख्या 6,445 इतकी झाली आहे.
शाळा सुरु करायला परवानगी
राज्यातील शाळा सुरु करायला राज्य सरकारने परवानगी दिल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
संबंधित बातम्या :