(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Needle Free Vaccine : नाशिक-जळगाव जिल्ह्यात 'नीडल फ्री' लसीकरण; अशी देणार लस
Needle Free Vaccine : झायडस कॅडिलाची कोरोना लस झायकोव्ह-डी डीएनए आधारित कोविड लस आहे. 'नीडल फ्री' लसीकरणासाठी जळगाव आणि नाशिकची निवड करण्यात आली आहे.
Needle Free Vaccine : लसीकरणासंदर्भात आरोग्य विभागानं एक मोठा निर्णय घेतला आहे. नीडल फ्री अर्थात सुईशिवाय देण्यात येणाऱ्या लशीसाठी नाशिक आणि जळगाव जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. 'झायकोव -डी' या लशीचे नीडल फ्री डोस देण्यात येणार आहेत. 28 दिवसाच्या अंतराने 3 डोस दिले जाणार असल्याची माहिती मिळत आहे. नाशिक आणि जळगावला जवळपास 8 लाख डोस मिळणार आहेत.
झायडस कॅडिलाची कोरोना लस झायकोव्ह-डी डीएनए आधारित कोविड लस आहे. या लसीच्या आप्तकालीन वापरासाठी केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. ही जगातील पहिली डीएनए-आधारित लस आहे. ही लस तीन डोसची लस आहे, दिवस 0, दिवस 28 आणि दिवस 56 अशाप्रकारी ती दिली जाते. काही दिवसांपूर्वी भारताच्या औषध नियंत्रकाने झायडस कॅडिलाच्या स्वदेशी विकसित नीडल-फ्री कोविड-19 लस, ZyCoV-D च्या आपत्कालीन वापरामध्ये (EUA) 12 ते 18 वयोगटातील लोकांना देण्यास मान्यता दिली होती.
ZyCoV-D ही लस दोन ते चार अंश सेल्सिअस तापमानात ठेवता येईल आणि त्यासाठी कोल्ड चेनची आवश्यकता नसेल. यामुळेच या लसीचे डोस सहजपणे देशाच्या कुठल्याही भागात जाऊ शकतात. दरम्यान, केंद्र सरकारने म्हटले आहे की, देशातील एकूण प्रौढ लोकसंख्येच्या 69% लोकांना कोविड-19 लसीचा किमान एक डोस मिळाला आहे आणि 25% लोकांना दोन्ही डोस मिळाले आहेत.
67 टक्क्यांपर्यंत परिणामकारक जायकोव-डी (ZyCoV-D)
जायडस कॅडिलानं काही दिवसांपूर्वी दावा केला होता की, या लसीची 12 ते 18 वर्षांच्या जवळपास हजार मुलांवर ट्रायल करण्यात आली आणि ही लस सुरक्षित असल्याचं स्पष्ट झालं आहे. याची एफिकेसी 66.60 टक्के आहे. तीन डोस असणारी ही लस 4-4 आठवड्यांच्या अंतरावर दिली जाऊ शकते. या लसीला 2-8 डिग्री तापमानावर स्टोअर केलं जाऊ शकतं. ही पहिली Plasmid डीएनए लस आहे. यामध्ये इंजेक्शनता वापर केला जात नाही, तर ही लस नीडल फ्री आहे. ही लस जेट इंजेक्टरमार्फत देण्यात येईल. कंपनीची योजना वार्षिक 10-12 कोटी लसीचे डोस तयार करण्याची आहे.
जायडस कॅडिया व्यतिरिक्त दुसऱ्या अनेक कंपन्याही लहान मुलांसाठी परिणामकारक लस तयार करण्यासाठी काम करत आहेत. भारत बायोटेकचं 2 ते 18 वर्षांच्या मुलांवरील ट्रायल जवळपास पूर्ण झालं आहे. कंपनी लवकरच चाचणी पूर्ण करुन अंतरिम डेटासह आपातकालीन यूज ऑथरायजेशनसाठी अर्ज करणार आहे. याव्यतिरिक्त नोवावॅक्ससाठीही लहान मुलांच्या ट्रायलसाठी परवानगी मिळाली आहे. अशातच बायो ईनं परवानगी मागितली आहे. आशा आहे की, लहान मुलांसाठीची लस लवकरच मिळू शकते.