विजयी मेळाव्यात राज-उद्धव यांच्यासह कोणकोणते नेते भाषण करणार? नेमकं कसं असणार नियोजन?
ठाकरेंची शिवसेना आणि मनसे विजयी मेळावा (MNS-Shivsena UBT Melava) साजरा करणार आहेत. या मेळाव्यात राज-उद्धव ठाकरे यांच्यासह विविध नेते भाषणे करणार आहेत.
Raj thackeray Uddhav thackeray victory rally : त्रिभाषा धोरणाबाबतचा जीआर सरकारने रद्द केल्यावर आता 5 जुलैला ठाकरेंची शिवसेना आणि मनसे विजयी मेळावा (MNS-Shivsena UBT Melava) साजरा करणार आहेत. मुंबईतील वरळी डोम येथे ठाकरेंची शिवसेना (Shivsena UBT) आणि मनसे (MNS) यांचा भव्य एकत्रित मेळावा होणार आहे. विजयी मेळाव्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) एकाच व्यासपीठावर पाहायला मिळणार आहेत. उद्या सकाळी 11.30 वाजता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे डोम ला पोहोचतील. दरम्यान, या विजयी रॅलीत कोणकोणते नेते भाषण करणार आहेत, याबाबतची माहिती मिळाली आहे.
हे नेते करणार भाषण
उद्या होणाऱ्या विजयी मेळाव्यात प्रकाश रेड्डी, जयंत पाटील (शेतकरी पक्ष), सुप्रिया सुळे, राज ठाकरे, उद्धव ठाकरे अशी भाषणं होणार आहेत. जर काँग्रेसचे नेते आले तर त्यांना देखील भाषण करण्याची संधी दिली जाणार आहे. शेवटचं भाषण उद्धव ठाकरे यांचं असणार आहे. डोमच्या बाहेर हाजी अली, वरळीला जाणारे दोन्ही रस्ते पॅक होतील. तिथे स्क्रीन लावली जाणार आहे. बहुदा दोन्ही मार्ग वाहतुकीसाठी बंद केले जाण्याची शक्यता आहे.
वरळीच्या परिसरात लागले मराठी भाषेचे फलक
ठाकरे बंधूंचा विजय मेळावा उद्या वरळी डोममध्ये पार पडणार आहे. सध्या या ठिकाणी जोरदार तयारी सुरू आहे. 8 हजार क्षमतेचा हा डोम सजवला जात असून, व्हीआयपी रांगांचीही आखणी केली जात आहे. मराठी भाषेचे फलक परिसरात लावण्यात आले आहेत. या मेळाव्यासाठीची स्टेज संपूर्णपणे भगव्या रंगात सजवली जात असून, झेंडूच्या फुलांनी स्टेजला खास आकर्षक स्वरूप देण्यात येत आहे. उद्या नेमकं ठाकरे बंधू काय बोलतात, युतीबाबत काही संकेत देतात का, हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एक पत्रक काढत सर्वांना आव्हान केलं आहे. आवाज मराठीचा...असं म्हणत मराठी मातांनो, भगिनींनो आणि बांधवांनो, सरकारला नमवलं का? तर हो नमवलं..., कोणी नमवलं तर ते तुम्ही, मराठी जनांनी नमवलं...आम्ही फक्त तुमच्या वतीने संघर्ष करत होतो. त्यामुळे हा आनंद साजरा करतानासुद्धा, आम्ही फक्त या मेळाव्याचे आयोजक आहोत, बाकी जल्लोष तुम्ही करायचा आहे. वाजत गाजत या, जल्लोषात, गुलाल उधळत या...आम्ही वाट बघतोय..., असं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या:






















