Radhanagari Tehsil : तर राधानगरी आगामी ग्रामपंचायत निवडणुकीवर सर्वपक्षीय बहिष्कार घालणार
Radhanagari Tehsil : राधानगरी नगरपंचायत स्थापनेची अधिसूचना जारी न झाल्यास बहिष्काराच्या निर्णयावर ठाम राहण्यासाठी मतदारांचे सहमती पत्र घेण्याची मोहीम सर्वपक्षीय कृती समितीकडून हाती घेण्यात आली आहे.
Radhanagari Tehsil : कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी ग्रामपंचायतीला नगरपंचायत (Radhanagari Nagar Panchayat) दर्जा मिळवण्यासाठी सर्वपक्षीय एल्गार करण्यात आला आहे. राधानगरी नगरपंचायत स्थापनेची अधिसूचना जारी न झाल्यास बहिष्काराच्या निर्णयावर ठाम राहण्यासाठी मतदारांचे सहमती पत्र घेण्याची मोहीम सर्वपक्षीय कृती समितीकडून हाती घेण्यात आली आहे. राधानगरी येथील शिष्टमंडळाने गेल्या महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत प्रस्ताव सादर केला होता. येत्या पंधरा दिवसांत राधानगरी ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपत असल्याने निवडणूक आयोगाकडून प्रशासक नेमला जाऊन निवडणूक लागण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर राधानगरी नगरपंचायत स्थापनेची अधिसूचना जारी न होता ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यास बहिष्काराचा निर्णय कृती समितीने घेतला आहे. या निर्णयाला सहमती दर्शविणारे लेखी पत्र जवळपास साडेचार हजार मतदारांकडून घेण्यात आली आहेत.
राधानगरी नगरपंचायत होण्यासाठी लोकसहभाग आणि पाठबळासाठी सहमती पत्रावर घरोघरी जाऊन प्रत्येक मतदारांच्या स्वाक्षऱ्याही घेतल्या जाणार आहेत. दरम्यान, राधानगरी ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन असल्याचे नगरविकास विभागाने राज्य निवडणूक आयोगाला पाठविलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे.
निवडणूक कार्यक्रमातून राधानगरीला वगळा
दरम्यान, ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम संभाव्य अधिसूचनेतून राधानगरी ग्रामपंचायतीला वगळण्याची मागणी सर्वपक्षीय नगरपंचायत कृती समितीने यापूर्वीच केली आहे. राधानगरी नगरपंचायत स्थापनेच्या अधिसूचनेची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. नगर विकास विभागाने अधिसूचना जारी करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडे परवानगी मागितली आहे. आयोगाच्या संमतीनंतर अधिसूचना जारी होणार आहे. तत्पूर्वीच ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यास नगरपंचायत अधिसूचना लांबणीवर जाण्याची चिन्हे आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या