Wheat Price : नागपूरसह पुण्यात गव्हाच्या किंमतीत तीन ते चार रुपयांची वाढ, पाहा दरवाढीची नेमकी काय आहेत कारणं?
सध्या देशात गव्हाच्या दरात (Wheat Price) वाढ होत असल्याचे चित्र आहे. महाराष्ट्रातही नागपूर आणि पुण्यात गव्हाच्या किंमतीत तीन ते चार रुपयांची वाढ झाली आहे.
Wheat Price : सध्या देशात गव्हाच्या दरात (Wheat Price) वाढ होत असल्याचे चित्र आहे. देशात यंदा गव्हाचे उत्पादनही घटलं आहे. त्याचा परिणाम किंमंतीवर होत आहे. दरम्यान, महाराष्ट्रातही गव्हाच्या किंमतीत वाढ होत आहे. नागपूरमध्ये (Nagpur) गव्हाचे दर ठोक बाजारात दोन रुपयांनी वाढले आहेत. तर किरकोळ बाजारात गव्हाच्या दरात चार ते पाच रुपयांची वाढ झाली आहे. तसेच दुसरीकडं पुण्यात (Pune) देखील गव्हाच्या दरांमध्ये दोन ते तीन रुपयांची वाढ झाली आहे.
पुण्यात क्विंटलमागे गव्हाच्या किंमतीत अडीचशे ते तिनशे रुपयांची वाढ
दरम्यान, केंद्र सरकारनं हमीभावात वाढ करणं, भारताोौत सध्या तुलनेने कमी गहू साठा असणं, युक्रेन-रशिया युद्ध या सर्व घटनांचा परिणाम म्हणून गव्हाच्या किंमतीत वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. नागपूर बरोबर पुण्यात देखील गव्हाचे दर क्विंटलमागे अडीचशे ते तिनशे रुपयांनी म्हणजे किलोमागे दोन ते तीन रुपयांनी महाग झाले आहेत. युक्रेन युद्धामुळं भारतातील गव्हाची मोठ्या प्रमाणात निर्यात करण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून निर्यातीवर मधल्या काळात बंधने घातली होती. मात्र, त्याआधी जे व्यवहार झाले होते त्या व्यवहारांमधे ठरल्यानुसार गहू निर्यात करण्यात आला आहे. त्याचा परिणाम स्थानिक पातळीवर आणि गव्हाच्या किरकोळ बाजारातील किंमतीवर झाला आहे.
एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीतील बाजारात गव्हाची आवक वाढली
देशात यंदा गहू उत्पादन घटले आहे. तसेच निर्यातही जास्त झाली. त्यामुळं गव्हाचे दर तेजीत असल्याचं चिंत्र दिसत आहे. खुल्या बाजारात गव्हाचे दर तेजीत असल्यानं सरकारला गहू खरेदीचे उद्दीष्ट साध्य करता आले नाही. अनेक शेतकऱ्यांनी दर वाढेल, या आशेने गव्हाचा साठा मागे ठेवला होता. शेतकऱ्यांनी गहू मागे ठेवल्याने एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीतील गहू आवक यंदा मागील तीन वर्षांतील उच्चांकी ठरली. तसेच ऑक्टोबर महिन्यात दिवाळीच्या सणामुळं गव्हाला मागणी वाढली होती. यंदा रब्बी हंगामातील गहू आवक सुरु झाल्यापासून म्हणजेच एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत बाजारात मोठ्या प्रमाणात गव्हाची आवक झाली होती. मागील हंगामापेक्षा या काळात गव्हाची आवक जास्त झाली होती.
मोठ्या गहू उत्पादक राज्यात टंचाई
देशातील सर्वात मोठं गहू उत्पादक राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये देखील गव्हाची चंटाई निर्माण झाली आहे. त्यामुळं तिथेही गव्हाच्या किंमतीत (Wheat prices) वाढ झाली आहे. तसेच बिहारमध्ये देखील गव्हाच्या किंमतीत वाढ झाली आहे. इतर राज्यांच्या तुलने उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये गव्हाच्या किंमतीत 4 ते 5 टक्क्यांची वाढ झाली आहे. या दोन्ही राज्यांना प्रथमच गव्हाच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळं गव्हाच्या किंमतीत वाढ होत आहे.