विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी प्रविण दरेकर यांची निवड
विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी भाजपच्या प्रविण दरेकर यांची निवड झाली आहे. थोड्याच वेळात याबाबत औपचारिक घोषणा होणार आहे.
नागपूर : विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी भाजपच्या प्रविण दरेकर यांची निवड झाली आहे. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी सभागृहाबाहेर येऊन याबाबतची घोषणा केली आहे. कालपर्यंत सुजितसिंह ठाकूर यांच्या नावाची चर्चा असताना त्यांना मागे टाकत प्रविण दरेकरांनी बाजी मारली आहे. भाई गिरकर यांचही नाव या विरोधी पक्षनेतेपदाच्या शर्यतीत होतं. तर पंकजा मुंडे या देखील विधानपरिषद विरोधी पक्षनेते पदासाठी आग्रही होत्या, अशी चर्चा आहे.
विधानपरिषद विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि सर्व भाजप नेत्यांचे प्रविण दरेकर यांनी आभार मानले. विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडेन. भाजपच्या सर्व सदस्यांनी एक मताने ठराव मांडल्याबद्दल प्रविण दरेकर यांनी सर्वांचे आभार मानले.
सरकारला धारेवर धरण्याचं काम, सरकारला प्रश्न विचारण्याचं काम आम्ही करणार आहोत. राज्यातील विविध प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, हिंदुत्वाचा मुद्दा अशा सर्व प्रश्नाची उत्तरे विधानपरिषदेत सरकारला विचारण्याचं काम प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वात भाजपचे आमदार करणार आहेत, असं प्रसाद लाड यांनी सांगितलं.
प्रविण दरेकर 2009 ते 2014 पर्यंत मनसेचे आमदार राहिले आहेत. मात्र 2014 विधानसभा निवडणुकीत प्रविण दरेकर यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यानंतर मनसेला सोडचिठ्ठी देत प्रविण दरेकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. प्रविण दरेकर मुंबईच्या मागाठणे मतदारसंघातून विधानपरिषद आमदार आहेत. प्रविण दरेकर विधानपरिषदेवर नवीन असतानाही भाजपने त्यांच्यावर विरोधी पक्षनेतेपदाची मोठी जबाबदारी दिली आहे.