एसटी महामंडळाचे दरवर्षी वाचणार तब्बल 12 कोटी रुपये, नेमका काय आहे निर्णय?
एसटी महामंडळाची दरवर्षी तब्बल 12 कोटी रुपयांची बचत होणार आहे. दिवसाला सरासरी 3 लाख 23 हजार रुपयांची बचत होणार आहे.
मुंबई : एसटी महामंडळाची दरवर्षी तब्बल 12 कोटी रुपयांची बचत होणार आहे. येत्या 1 ऑगस्टपासून इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या कंपन्यांनी एसटी महामंडळाला पुरवण्यात येणाऱ्या डिझेल इंधनावर देण्यात येणाऱ्या सवलत दरात (Discount rate) प्रति लिटर 30 पैशांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं दिवसाला सरासरी 3 लाख 23 हजार रुपये याप्रमाणे वर्षाला अंदाजे 11 कोटी 80 लाख रुपये इतकी बचत होणार आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता.
गेली 70 वर्षापेक्षा अधिक काळ एसटी महामंडळ इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांकडून डिझेल इंधन खरेदी करत आहेत. सध्या दररोज एसटी महामंडळाला सरासरी 10 कोटी 78 लाख लिटर डिझेल लागते. एसटी महामंडळ हे या कंपन्यांचा मोठा खरेदी ग्राहक ( bulk purchase customer) असल्यामुळे संबंधित कंपन्या महामंडळाला प्रति लिटर सवलत देत होत्या. परंतु एसटी महामंडळाने वारंवार विनंती करुनही कित्येक वर्ष या कंपन्यांनी सवलत दरात बदल केला नव्हता. त्यामुळं परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी याबाबत सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे संबंधित कंपन्यांनी सवलत दरामध्ये मध्ये वाढ करण्याची भूमिका घेतली. त्यासाठी इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मंत्री सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात तीन-चार बैठका घेण्यात आल्या. तसेच डिझेल इंधन पुरवठा करणाऱ्या इतर खाजगी कंपन्या सोबत देखील वाटाघाटी करण्यात आल्या. एवढेच नव्हे तर स्पर्धात्मक स्तरावर निविदा काढण्याची प्रक्रिया देखील राबवण्याची तयारी ठेवली.
दररोज सरासरी 10 कोटी 78 लाख लिटर डिझेल लागते
संबंधित कंपन्यांनी सवलत दरात वाढ करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यानुसार यत्या 1 ऑगस्टपासून मुळ सवलत दरात प्रति लिटर 30 पैसे वाढ करण्याचे संबंधित कंपन्यांनी मान्य केले आहे. सध्या एसटीच्या 251 आगारात असलेल्या पेट्रोल पंपाच्या सहाय्याने दररोज सरासरी 10 कोटी 78 लाख लिटर डिझेल इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या कडून पुरविण्यात येते. भविष्यात वाढत्या बसेसच्या संख्येमुळे डिझेल इंधनाची खपत देखील वाढणार आहे. त्यामुळे प्रति लिटर 30 पैसे वाढीव सवलत दिल्यामुळे वर्षाकाठी एसटी महामंडळाची अंदाजे 12 कोटी रुपयांची अतिरिक्त बचत होणार आहे.
तिकीट विक्रीच्या व्यतिरिक्त उत्पन्नाचे इतर स्त्रोत निर्माण करणे गरजेचे
एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक आहे. अशा परिस्थितीमध्ये ज्या, ज्या ठिकाणी पैशाची बचत आणि काटकसर करणे शक्य आहे, त्या त्या ठिकाणी बचत आणि काटकसर केली पाहिजे. तसेच तिकीट विक्रीच्या व्यतिरिक्त उत्पन्नाचे इतर स्त्रोत देखील निर्माण करणे गरजेचे आहे. अर्थात, या दोन्ही प्रयत्नातून भविष्यात एस टी महामंडळ आर्थिक दृष्ट्या सक्षम होईल!" असा विश्वास परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे.

























