Prakash Ambedkar : देवेंद्र फडणवीसांचं सध्याचं राजकारण शूरपणाचं नाही ; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल
Prakash Ambedkar : "आपण देवेंद्र फडणवीस यांना फार शूर राजकारणी समजत होतो. परंतु, सभागृहात पेनड्राईव्ह दाखवणे हे शूरपणाचं नाही अशी टीका वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी केली आहे.
Prakash Ambedkar : वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. "आपण देवेंद्र फडणवीस यांना फार शूर राजकारणी समजत होतो. परंतु, सभागृहात पेनड्राईव्ह दाखवणे हे शूरपणाचं नाही, तर गां**पणाच्या राजकारणाचं लक्षण असल्याची घणाघाती टीका प्रकाश आंबेडकरांनी केली आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी 'एबीपी माझा'सोबत संवाद साधला. यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, "देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहापेक्षा हा पेनड्राईव्ह आणि त्यासंदर्भातील आरोप बाहेर जनतेसमोर केले असते तर त्याला महत्व राहिले असते. त्या पेनड्राईव्हमध्ये काय 'गुलकंद' आहे? तेही फडणवीसांनी स्पष्ट केले पाहिजे आणि ते जनतेसमोर आले पाहिजे, अशी मागणी प्रकाश आंबेडकरांनी केली आहे.
"देवेंद्र फडणवीस यांना मी फार शूर आणि लढाऊ राजकारणी समजत होतो. ते तलवार म्यानातून काढूत लढत बसतील. मात्र, सभागृहात पेन ड्राईव्ह दाखवणे हे शूरपणा नाही. सभागृहातील आरोपांतून फारसं साध्य होणार नाही. सभापती फार तर त्यांचे आरोप फेटाळून लावतील. मात्र, त्यांनी हाच पेनड्राईव्ह आणि त्यासंदर्भातील आरोप बाहेर जनतेसमोर केले असते तर त्याला महत्व राहिले असते. फडणवीसांनी जे बोलावं ते स्पष्ट बोलावं. त्यातून दुसरा कोणताही वास येऊ नये असा टोला आंबेडकरांनी लगावला आहे.
"राष्ट्रपती राजवटीचा निर्णय जनतेला घेऊ द्या"
दिशा सालियन प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर आरोप केले होते. त्यानंतर शिवसेनेने राणेंवर आरोप केले आहेत. परंतु, दोघांनीही आरोप करताना याचे पुरावे दिले नाहीत. या गोष्टी आम्ही फक्त टीव्हीवरच पाहतो. याचे पुरावे कधी देणार? असा प्रश्न प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केला आहे. तसेच राज्यात राष्ट्रपती राजवट लावताना केंद्र पुरावे काय देणार? राष्ट्रपती राजवटीचा निर्णय जनतेला घेऊ द्या, असं आंबेडकर यांनी म्हटले आहे.
"काँग्रेसनं आतातरी समझोत्याचं राजकारण करावं"
काँग्रेसची आतापर्यंतची घोडचूक म्हणजे आपल्याला आणि आंबेडकरवाद्यांना पाडण्याचं राजकारण त्यांनी केल्याचा आरोप आंबेडकरांनी केला आहे. काँग्रेसने चळवळच संपविल्यामुळे मुस्लिम आणि दलितांनी काँग्रेसकडे पाठ फिरवली आहे. आताही काँग्रेसनं समझोत्याचं राजकारण केलं नाही तर जे व्हायचं ते होईल. राजकारणात कुणीच कुणाचा कायम शत्रू किंवा मित्र राहात नसल्याने आपण मैत्रीचा हात काँग्रेससमोर ठेवला असल्याचे आंबेडकर म्हणालेत. भाजपसोबत असलेले मतभेद काँग्रेसह इतर कुणाशीही नाहीत. त्यामूळे पुढचा निर्णय काँग्रेसनेच घ्यायचा असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
"संजय राऊतांनी सरड्यासारखे रंग बदलू नयेत"
निवडणुकीच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील सर्वात वाईट नेते असल्याचं संजय राऊत हे एका मुलाखतीत सांगतात. तेच संजय राऊत दुसरीकडे आता त्यांनाच देशातील एकमेव राष्ट्रीय नेते म्हणतात. त्यांनी सरड्यासारखं रंग बदलणं सोडावं, असा टोला आंबेडकरांनी संजय राऊतांना लगावला आहे. उत्तरप्रदेशातील भाजपच्या 80 जागा फक्त हजार मतांनी निवडून आल्याचं सांगतांनाच भाजपच्या विजयाचं विश्लेषण हे 'चमडी बचाओ' राजकारण असल्याचं आंबेडकर म्हणाले आहेत.
"देशभर फोफावण्यात आर्थिक आणि संघटनात्मक अडचणी"
आपल्याला देशात मायावतींनी उभ्या केलेल्या राजकारणाची स्पेस भरायला आर्थिक अडचणी आहेत. आपल्याकडे असलेली आर्थिक आणि संघटनात्मक ताकद फक्त दोन-तीन राज्यांपुरतीच मर्यादीत आहे. त्यामूळेच चादर पसरवताना ती फाटणार नाही याची आम्ही काळजी घेतो आहे. त्यामूळे जिथे आमची ताकद आहे तिथेच आम्ही फोफावण्याचा प्रयत्न करीत असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी सांगितले.
महत्वाच्या बातम्या