Konkan Refinery Project : पुढील 3 महिन्यात सकारात्मक निर्णय अपेक्षित, राज्य आणि केंद्रामध्ये 'कॉस्ट असेसमेंट'बाबत चर्चा सुरु
Konkan Refinery Project : कोकणातील रिफायनरीसंदर्भातील मोठी घडामोड पुढील 3 महिन्यात रिफायनरीबाबत सकारात्मक निर्णय अपेक्षित!सध्या राज्य आणि केंद्रामध्ये 'कॉस्ट असेसमेंट'बाबत चर्चा सुरु - सूत्र
रत्नागिरी : कोकणातील रिफायनरीबाबत आता वेगाने घडामोडी घडताना दिसत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रानंतर आता केंद्र आणि राज्य स्तरावर वेगाने घडामोडी, चर्चा सुरु आहेत. कॉस्ट असेसमेंट अर्थात प्रकल्पासाठी लागणाऱ्या साऱ्या बाबी, त्यासाठी येणारा खर्च याबाबतचा आराखडा तयार करण्याचं काम वेगाने सुरु आहे. त्यामुळे पुढील तीन महिन्यामध्ये रिफायनरीबाबतचा सकारात्मक निर्णय होणार असल्याची खात्रीलायक सुत्रांनी माहिती 'एबीपी माझा'ला दिली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील बारसू आणि सोलगावच्या पंचक्रोशीमध्ये तब्बल 13 हजार एकर जागा अधिग्रहित केली जाणार आहे. शिवाय, नाटे या ठिकाणी क्रूड ऑईल टर्मिनलच्या उभारणीसाठी देखील 2400 एकर जागा अधिग्रहित केली जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रामध्ये याबाबतचा उल्लेख केला आहे. त्यानंतर आता प्रशासकीय स्तरावर देखील याबाबींना वेग आला आहे.
सध्या रिफायनरीबाबत काय सुरु?
रिफायनरी येणाऱ्या भागात परप्रांतियांनी हजारो एकर जमीन खरेदी केल्याची धक्कादायक बाब 'एबीपी माझा'ने यापूर्वीच समोर आणली आहे. जानेवारी 2019 ते मार्च 2022 या कालावधीत झालेली जमीन खरेदीमध्ये जम्मू-कश्मीर, आसाम, पश्चिम बंगाल, कर्नाटकसह राज्यातील विविध भागातील लोकांनी जमीन खरेदी केली आहे. स्थानिकांनी मात्र आमचा विश्वासघात करत जमीन खरेदी केल्याचं 'एबीपी माझा'शी बोलताना म्हटलं आहे. त्यामुळे स्थानिकांना काहीही न कळता या साऱ्या गोष्टी कोण हाताळत आहे? याबाबत सवाल विचारले जात आहेत.
रिफायनरीला समर्थन की विरोध?
रिफायनरीबाबत समर्थक असतील किंवा विरोधक अद्याप देखील शक्तीप्रदर्शन करत आहे. पण, विरोधकांनी 6 मार्च रोजी काढलेल्या मोर्चाला मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. तर, धोपेश्वर ग्रामपंचायतीमध्ये झालेला रिफायनरीबाबतचा ठराव देखील लक्षणीयरित्या बहुमत मिळवत विरोधात गेला होता. परिणामी रिफायनरीला असलेला विरोध अधिकपणे दिसून आला आहे.
रिफायनरी आल्यास काय फायदा?
कोकणात रिफायनरी आल्यास काय फायदा? असा सवाल देखील विचारला जात आहे. याबाबत बोलताना समर्थक असतील किंवा कंपनीची माणसं यांच्याकडून जवळपास तीन लाख कोटीची गुंतवणूक आल्यास कोकणच्या विकासाला चालना मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे. कोकणासह देशाच्या आणि राज्याच्या जीडीपीमध्ये वाढ होणार असून लाखो स्थानिकांना रोजगार मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे. रिफायनरी आल्यास विकासासाठी मोठा हातभार लागणार असून कोकणच्या पर्यटनाला काहीही धक्का लागणार नसल्याचा दावा देखील कंपनी आणि रिफायनरी समर्थकांकडून केला जात आहे.