Yavatmal News: यापैकी उच्च जात कोणती? शिष्यवृत्ती परीक्षेतील प्रश्नाने संताप, संस्थेवर कारवाईची मागणी
Yavatmal News: इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या प्रश्नावलीत 'उच्च जातीचे नाव काय?' असा प्रश्न विचारण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे.

Yavatmal News: यवतमाळ जिल्ह्यात इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेत (Scholarship exam) गुणवत्ता आणि निकालाची टक्केवारी वाढावी, यासाठी जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) शिक्षण विभागाने (Education Department) पुढाकार घेत टार्गेट पीक अप्स संस्थेमार्फत विद्यार्थ्यांकडून सराव मोहीम राबिविली होती. यात जवळपास 24 हजार विद्यार्थी सराव करीत होते. विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा सोडू शकतील अशी ही व्यवस्था होती. या टार्गेट पीक अप्सच्या आठवीच्या दुसऱ्या ऑनलाइन सराव चाचणीच्या प्रश्न पत्रिकेत विचारण्यात आलेला एक प्रश्न चांगल्याच वादाचे कारण बनण्याची शक्यता आहे.
या ऑनलाइन प्रश्न पत्रिकेत इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या प्रश्नावलीत 'उच्च जातीचे नाव काय?' असा प्रश्न विचारण्यात आला असून पर्याय समाजातील वर्णव्यवस्था दाखवणारे असल्याने शिक्षकांसह शैक्षणिक वर्तुळातून मोठा संताप उमटला आहे. विद्यार्थ्यांच्या मनातून जाती निर्मूलन कसे करणार, असा प्रश्नही उपस्थित करण्यात येत आहे.
Yavatmal News: संस्थेवर कारवाईची मागणी
यामुळे या संस्थेवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. परीक्षा 22 फेब्रुवारीला होणार आहे. या प्रश्नासंदर्भात संबंधित संस्थेकडून प्रश्नाची ठेवण आणि भाषा चुकीची होती. त्यामुळे त्यांच्याकडून लेखी खुलासा मागवण्यात आला आहे. त्यांनतर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी दिली आहे.
Ambadas Danve: विद्यार्थ्यांच्या मनात जात बिंबवणे हा गुन्हा : अंबादास दानवे
दरम्यान, या प्रकरणावर विधान परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सर्वात आधी जिल्हा परिषदेच्या संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित केले पाहिजे. कारण आपण हिंदुस्थानात राहतो. आपल्या घटनेत सर्वांना समान लेखलेले आहे. आपण जातपात मांडायलाच नको. जात मानत असाल तरी कोणती जात उच्च आणि कोणती जात कनिष्ठ हे बिलकुल होऊ शकत नाही. त्यामुळे असा प्रश्न विचारणे आणि विद्यार्थ्यांच्या मनात असा प्रश्न रुजवणे हे समाजाच्या दृष्टीने अतिशय चुकीचे आहे. कोणती जात उच्च हा काही प्रश्न होऊ शकतो का? सगळ्या जाती सारख्याच आहेत. विद्यार्थ्यांच्या मनात जात बिंबवणे हा गुन्हा आहे, असे अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI























