नाशकात पोलीस कर्मचाऱ्याकडून दोन सावत्र मुलांची गोळ्या घालून हत्या
संजय भोये याच्या पत्नी मनीषा यांना वडिलांनी फ्लॅट दिला होता. आजोबांनी दिलेला फ्लॅट आपल्या नावावर करावा, अशी या दोन्ही मुलांची मागणी होती. त्यातूनच गुरुवारी रात्रीपासून घरात भांडण सुरु होते. या वादातून संतापलेल्या संजयने त्यांच्यावर गोळीबार केला.
नाशिक : नाशिकमध्ये पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या दोन सावत्र मुलांची गोळ्या झाडून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कौटुंबिक वादातून ही हत्या केल्याचं समोर येत आहे. संजय भोये असं आरोपी पोलीस कॉन्स्टेबलचं नाव आहे.
नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या संजय भोये यांच्या पत्नी मनीषा हिचे आधीच्या पतीपासून शुभम आणि अभिषेक ही दोन मुलं होती. या दोन्ही मुलांचे आणि संजयचे गेल्या अनेक दिवसांपासून खटके उडत होते. अखेर या भांडणाचा अंत दोन्ही मुलांच्या हत्येने झाला. दरम्यान या भांडणाला संपत्तीचं कारण असल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झालं आहे.
नाशिकमधील अश्वमेधनगरच्या राजमंदिर हाऊसिंग सोसायटीमध्ये हे सर्वजण राहत होते. तो फ्लॅट पत्नी मनीषा हिच्या वडिलांनी तिला दिला होता. आजोबांनी दिलेला फ्लॅट आपल्या नावावर करावा, अशी या दोन्ही मुलांची मागणी होती. त्यातूनच गुरुवारी रात्रीपासून घरात भांडण सुरु होते.
शुक्रवारी दुपारी संजय आणि दोन्ही मुलांचे कडाक्याचं भांडण झालं, यातूनच संजयने रागाच्या भरात सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून चार राऊंड फायर केले. यामध्ये दोन्ही मुलांचा मृत्यू झाला.
गोळीबार केल्यानंतर संजय स्वतः पंचवटी पोलिसांना शरण आला आणि घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. या हत्येमागे नक्की हेच कारण आहे की आणखी दुसरं कारण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.