(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Palghar : शेलटे बंधाऱ्याच्या गळतीकडे दुर्लक्ष; अभियंता निलंबित,सरपंचाच्या समयसूचकतेमुळे 500 जणांचे प्राण वाचले
पालघर जिल्ह्यातील शेलटे बंधारा फुटल्याने किमान शंभर एकर भात शेती क्षेत्रावर परिणाम झाला असून अनेक शेतांमध्ये गाळ साचला आहे. इतर शेतांमधील लावणी झालेले भातपीक पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेले आहे.
पालघर : वाडा तालुक्यातील कोहोज किल्ल्याच्या पायथ्याशी शेलटे येथे असलेला लघुपाटबंधारे विभागाचा 46 वर्षे जुन्या पाझर तलावाच्या बंधाऱ्याला लागलेल्या गळतीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे हा तलाव 21 जुलैच्या रात्री मुसळधार पावसामुळे फुटला. यावेळी गावच्या सरपंचांनी समयसूचकता दाखविल्याने गावातील 500 पेक्षा नागरिकांचे प्राण वाचले.
शेलटे येथील 163 हजार घनमीटर क्षमतेचा मातीने बांधलेल्या या पाझर तलावाचे काम 1972 साली हाती घेण्यात आले होते. ते 1975 च्या सुमारास रोजगार हमी योजनेतून पूर्ण झाले होते. या तलावामुळे परिसरातील गावालगतच्या भागात भूगर्भातील पाण्याची पातळी वाढल्याने या भागात काकडी, कलिंगड, भाजीपाला व रब्बी पिके घेतली जात असे. यामुळे गेल्या अनके वर्षांपासून येथील नागरिकांचे रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबले होते. गेल्यावर्षी तलावात दगड रचलेल्या भागाच्या (पिचिंग) वरच्या बाजूला एका ठिकाणी गळती झाल्याचे नागरिकांनी जिल्हा परिषदेच्या निदर्शनास आणून दिले होते. ही गळती बंद करण्यासाठी ग्रामस्थांनी श्रमदानातून प्रयत्न केले होते.
या तलावाच्या मातीच्या बंधाऱ्यामध्ये खेकड्यांचे प्रमाण वाढल्याने हा बंधारा कमकुवत झाला असल्याचे ग्रामस्थानी अनेकदा पाटबंधारे विभागाच्या निदर्शनास आणून दिले होते. ज्या ठिकाणी प्रत्यक्ष बंधारा कमकुवत झाला होता, त्या ठिकाणची माती बदलून त्याला मजबुतीकरिता दगडी आवरण देणे आवश्यक होते. 15 ते 20 हजार रुपयांत होणाऱ्या या प्राथमिक दुरुस्तीच्या कामाकडे दुर्लक्ष झाले नसते तर या बंधाऱ्याचा आधार पंचक्रोशीतील गावांना राहिला असता. हा बंधारा फुटल्याने किमान शंभर एकर भात शेती क्षेत्रावर परिणाम झाला असून अनेक शेतांमध्ये गाळ साचला आहे. इतर शेतांमधील लावणी झालेले भातपीक पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेले आहे.
हा बंधारा पुन्हा बांधण्यासाठी ‘मेरी’ या संस्थेकडून आराखडा व अंदाजपत्रक तयार करण्याच्या विनंती जिल्हा परिषदेने केली आहे. जिल्ह्याच्या विकास योजनेमधून पुनर्बांधणी करीत लागणाऱ्या पाच ते सात कोटी रुपये खर्च मंजूर करून आगामी दोन वर्षांत हा बंधारा नव्याने उभारण्याचा प्रयत्न केला जाईल, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्या तलावात साचलेला गाळ काढण्यासाठी तसेच इतर सुरक्षिततेच्या बाबी नवीन आराखडा अंतर्भूत करण्यात येतील असे सांगण्यात आले आहे.
सतर्कतेमुळे 500 प्राण वाचले
तलावामध्ये मासेमारी ठेकेदाराचा किसन वरठा हा पहारेकरी रात्री बंधाऱ्यावर वास्तव्य करत असे. बंधाऱ्यामधून गळती वाढल्याचे त्यांनी पाहिले. त्याने सरपंच राजू गायकर यांना तातडीने सूचित केले. सरपंच व तंटामुक्ती समिती अध्यक्ष यांनी त्यांच्याकडे असलेल्या ध्वनिक्षेपकाद्वारे गावकऱ्यांना आवाहन करत सावधतेच्या दृष्टिकोनातून गावकऱ्यांना उंचीवरील सुरक्षित ठिकाणी तातडीने स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्या. अनेक नागरिक ग्रामपंचायत कार्यालय इमारत व इतर काँक्रीट घरांमध्ये स्थलांतरित झाले.
दरम्यान, काही ग्रामस्थानी भगदाड बुजवण्यासाठी प्रयत्न केला, मात्र गळतीच्या ठिकाणाहून पाण्याचा प्रवाह वाढू लागल्याने त्यांनी सुरक्षित स्थळी पोहोचणे पसंद केले. रात्री साडेदहा- अकराच्या सुमारास बंधारा फुटला. काही अंतरावर असलेल्या लहानशा टेकडीमुळे पाण्याच्या प्रवाहाला नैसर्गिक अडथळा निर्माण झाल्याने पाण्याचा प्रवाह तीन दिशेने विभागला गेला. त्यामुळे शेलटे गावातील 530 तर वाघोटे गावातील 244 नागरिकांचे प्राण वाचले.
कार्यादेश नसतानाही गळती रोखण्याचे काम
दोनशे मीटर लांब तलावाच्या बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी सुमारे 25 लाख रुपये किमतीचे कामांना मार्च 2021 महिन्यात प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. मात्र निविदा प्रक्रियेत सर्वात कमी निविदा भरणाऱ्या ठेकेदाराचे दर अंदाजपत्रकापेक्षा 21 टक्के कमी असल्याने त्या ठेकेदाराकडून वाढीव अनामत रक्कम भरून घेण्याची प्रकिया सुरु असल्याने कार्यादेश जारी करण्यात आले नव्हते. तरीदेखील संबंधित ठेकेदाराने काही महिन्यांपूर्वी तीन-चार ट्रक माती-मुरूम आणून गळतीच्या ठिकाणी टाकले. मजबुतीकरण करण्याऐवजी बंधाऱ्याच्या बाहेरच्या बाजूला असलेले दगडाचा थर (पिचिंग) काढून टाकले. त्यामुळे मजबुती कमी होऊन 21 जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसात तलावाच्या बांधाचा 40 मीटर भाग वाहून गेला.
तत्पूर्वी 20 जुलै रोजी या बंधाऱ्यावर झालेल्या कामाचे मोजमाप करण्यासाठी ठेकेदाराचे व पाटबंधारे विभागाचे कर्मचारी उपस्थित असल्याचे ग्रामस्थांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते. ठेकेदाराने या कामाच्या जिल्हा परिषदेकडे सादर केलेली काही कागदपत्रे बंधारा फुटल्यानंतर रातोरात गायब केल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते. दरम्यान, जिल्हा परिषदेने पाटबंधारे विभागाच्या संबंधित अभियंताला निलंबित केले आहे.
पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ म्हणाले की, "तलावाचा बंधारा फुटण्याच्या प्रकाराची चौकशी सुरु आहे. पाटबंधारे विभागाच्या उपअभियंत्याला निलंबित करण्यात आले आहे. चौकशीनंतर दोषींविरुद्ध कारवाई करण्यात येईल. नवीन बंधारा उभारण्याच्या दृष्टीने कामे अग्रक्रमाने हाती घेण्यात आली आहेत."
महत्वाच्या बातम्या :
- राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्ट 16 हजार कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचं किट वाटणार, पूरग्रस्तांसाठी शरद पवारांची मोठी घोषणा
- Raj Kundra Police Custody : पॉर्नोग्राफी प्रकरणी राज कुंद्राला 14 दिवसांची पोलीस कोठडी
- महापुरातील मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना राज्य सरकार पाच लाख तर केंद्र सरकार दोन लाख रुपये मदत देणार: अजित पवार