(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कंगना रनौतचं ट्विटर अकाऊंट कायमचं बंद करण्याची मागणी करत हायकोर्टात याचिका
कंगना रनौत सोशल मीडियावर सतत काही ना काही ट्विट करून देशातील सामाजिक समतोल बिघडवण्याचं काम करत आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतचं ट्विटर अकाऊंट कायमच बंद करा या मागणीसह मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका सादर करण्यात आली आहे. अली काशिफ खान देशमुख या मुंबईस्थित वकिलानं ही याचिका सादर केली असून लवकरच यावर सुनावणी अपेक्षित आहे. या याचिकेत ट्विटरलाही प्रतिवादी करण्यात आलं आहे.
सीआरपीसी कलम 482 नुसार हायकोर्टानं आपल्या विशेष अधिकारात कंगनाचं ट्विटर अकाऊंट कायमच बंद करण्याचे निर्देश देण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली आहे. कंगना रनौत सोशल मीडियावर सतत काही ना काही ट्विट करून देशातील सामाजिक समतोल बिघडवण्याचं काम करत आहे. याआधी कंगनाची बहिण रंगोली चंदेलविरोधात अशाप्रकारची कारवाई करण्यात आली आहे. तशीच कारवाई कंगनावरही करावी अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे.
समाजात धार्मिक तेढ निर्माण केल्याबद्दल याच वकिलाच्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी कंगनाविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. जो रद्द करण्यासाठी कंगना आणि तिच्या बहिणीनं हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. ज्याचा दखल घेत हायकोर्टानं दोन्ही बहिणींना जानेवारी महिन्यात मुंबई पोलिसांपुढे हजर होण्याचे निर्देश देत तूर्तास त्यांना अटकेपासून दिलासा दिलेला आहे.