Mahadevi Elephant: महादेवी हत्तीणीच्या घरवापसीसाठी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका; राज्य सरकार, नांदणी मठ आणि वनताराची संयुक्त दाखल करणार
हत्तीण पुन्हा नांदणी मठात यावी यासाठी कोल्हापुरात आंदोलन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनाकडून पुनर्विचार याचिका दाखल करण्यात येईल असे सांगितले होते.

Petition in Supreme Court on for return of Mahadevi Hattini: महादेवी (माधुरी) हत्तीणीची पुन्हा नांदणी मठात घरवापसी करण्यसाठी राज्य सरकार, वनतारा आणि नांदणी येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठातर्फे एकत्रित सोमवारी (11 ऑगस्ट) सर्वोच्च न्यायालयाला पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने नांदणी मठाची याचिका फेटाळल्यानंतर महादेवी हत्तीणीची पाठवणी वनताराकडे करण्यात आली होती. त्यानंतर झालेल्या गदारोळानंतर आता सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार? याकडे लक्ष असेल. हत्तीण पुन्हा नांदणी मठात यावी यासाठी कोल्हापुरात आंदोलन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनाकडून पुनर्विचार याचिका दाखल करण्यात येईल असे सांगितले होते. शुक्रवारी मुंबईत नांदणी मठ, राज्य सरकार आणि वनताराची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत याचिका दाखल करण्यासाठी शिक्कामोर्तब झाले.
दरम्यान, मुख्यमंत्री कार्यालयाच्या निर्णयानुसार नांदणी मठ आणि राज्य सरकारने उच्चाधिकार समितीकडे विनंती अर्ज सादर करण्याचा कच्चा मसुदा गुरुवारी तयार केला होता. शुक्रवारी नांदणी मठ, वनताराचे प्रतिनिधी आणि राज्य सरकारच्या प्रतिनिधींची बैठक झाली. यावेळी राज्य सरकार, नांदणी मठ व वनताराकडून एकत्रितपणे सोमवारी सर्वोच्च न्यायालयात उच्चाधिकार समितीने महादेवी हत्तीणीला नांदणी मठात परत पाठवण्याबाबत अनुमती द्यावी यासाठी विनंती करण्यात येणार आहे. यावेळी नांदणी मठाचे अॅड.सुरेंद्र शहा, अॅड.मनोज पाटील, अॅड. बोरुलकर, वनताराचे अॅड. शार्दूल सिंग यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
हत्तीणीची निगा राखण्यासाठी डॉक्टरांसह पथक तयार करणार
नांदणी मठाच्या परंपरा आणिस्थानिक जनतेच्या भावनांचा विचार करून कायदेशीर प्रक्रिया मार्गाने माधुरी ऊर्फ महादेवी हत्तीणीला पुन्हा मठात परत आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. फडणवीस म्हणाले होते की, गेल्या 34 वर्षांपासून माधुरी हत्तीण नांदणी मठात आहे. माधुरी पुन्हा मठात यावी ही जनभावना आहे. ही जनभावना लक्षात घेऊन राज्य शासन पुनर्विचार याचिका दाखल करेल. मठानेही आपल्या याचिकेमध्ये राज्य सरकारचाही समावेश करावा. तसेच वन विभागाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्र सविस्तर भूमिका मांडण्यात येईल. यामध्ये केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाच्या निकषाप्रमाणे व उच्च स्तरीयसमितीने सुचविलेल्या सर्व मुद्द्याचे निराकरण करण्यात येईल. हत्तीणीची निगा राखण्यासाठी डॉक्टरसह राज्य सरकार एक पथक तयार करून आवश्यक ती सर्व मदत करेल. आवश्यक वाटल्यास रेस्क्यू सेंटरसारखी व्यवस्थाही करण्यात येईल व त्या प्रमाणे सुविधा देण्यात येतील, आदीबाबींचा समावेश करून या बाबी तपासण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने स्वतंत्र समिती नेमण्याची विनंतीही राज्य शासनामार्फत या याचिकेमध्ये करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या























