साप सोडून भुई धोपटण्याचं काम बंद करा, देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना टोला
संसदेत अनेक महत्त्वाचे विषय आहेत. त्या विषयांवर चर्चा न करता भारताच्या बदनामीचा सुरू असलेला कट सुरू असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून पेगॅसस प्रकरणावरून देशभर राजकीय वातावरण तापले असून, आता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर आरोप केला आहे. फोन टॅपिंग पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्हे तर मनमोहन सिंग यांच्याच काळात झाल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. सोमवारपासून संसदेचे अधिवेशन सुरू झाले. ते डिरेल करण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाकडून होत आहे. हे अधिवेशन डिरेल करण्यासाठी रणनीती करून, कपोलकल्पित बातम्या पेरून अधिनेशनाच्या कामकाजात अडथळे आणले जात आहेत. काही माध्यमांनी त्याबद्दलची बातमी दिली आहे. पण या बातमीला कोणताही आधार नाही. केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की, आपली कोणतीही एजन्सी अशा प्रकारचे बेकायदा कृत्य करत नाही. आपल्याकडच्या टेलिग्राफ कायद्याने मोठ्या प्रमाणावर कठोर नियम केले आहेत.
एनएसओ या पेगॅसस तयार करणाऱ्या कंपनीने देखील अशा प्रकारच्या वृत्ताचा इन्कार केला आहे. त्यांनी या मीडिया हाऊसला देखील निराधार यादी प्रकाशित केल्याची नोटीस बजावली आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणालेत. दरम्यान तत्कालीन मनमोहन सिंग यांच सरकार फोन टॅपिंग करत असल्याचा आरोप झाला होता. समजावादी पार्टीचे नेते अमरसिंह यांनी सर्वात आधी हा आरोप केला होता. तेव्हा उत्तर देताना मनमोहन सिंग यांनी आम्ही नाही तर एका खासगी एजन्सीने फोन टॅपिंग केले आहेत, असे सांगितल होते. जे काम झाले ते लिगली झाले, असेही त्यांनी सांगितले होते असे देवेंद्र फडणवीस म्हणालेत. लोकसभेत याबाबत माहिती देताना फोन टॅपिंग हे राष्ट्रीय सुरक्षा, टॅक्स चोरी आणि मनी लॅान्ड्रिग रोखण्यासाठी हे फोन टॅप झाल्याचे सांगितले. ते योग्य असल्याच समर्थन केले होतं. फोन टॅपिंग होत असल्याची बातमी येणे चुकीचे असून याबाबत पुढे काळजी घेऊ असेही मनमोहन सिंग यांनी सांगितले होते. UPA च्या काळात एकदा नाही तर अनेकदा फोन टॅपिंग झाले आणि ते कसे कायदेशीर रित्या योग्य आहे हे सांगितले गेले असेही त्यांनी सांगितले.
जाणीवपूर्वक भारताला बदनाम करण्याचं हे षडयंत्र
संजय राऊतांनी साप सोडून भुई धोपटण्याचं काम बंद करा असा सल्ला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला संजय राऊत फोन टॅपिंग प्रकरणात आक्रमक झाले होते त्यांनाही फोन टॅपिंग प्रकरणावर आवाज उचलला आहे एवढंच नाही तर शिवसेनेचे सर्व खासदार लोकसभा अध्यक्षांना भेटले आणि त्यांना या प्रकरणावर तातडीनं कारवाई करण्याची मागणी केली आहे. “जाणीवपूर्वक भारताला बदनाम करण्याचं हे षडयंत्र योग्य नाही. संसदेत अनेक महत्त्वाचे विषय आहेत. त्या विषयांवर चर्चा न करता भारताच्या बदनामीचा सुरू असलेला कट सुरू असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.
पेगॅससमध्ये 45 देशांचा उल्लेख आहे. पण चर्चा फक्त भारताची केली जात आहे. ठरवून संसदेच्या अधिवेशनाच्या आदल्या दिवशी अशी बातमी देऊन एकीकडे भारतीय लोकशाहीला बदनाम करण्याचा हा कट आहे. असे लक्षात येत आहे, की जेव्हा जेव्हा भारत पुढे जातो, तेव्हा काही लोक वेगळ्या हितसंबंधांमुळे भारताला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. मध्यंतरीच्या काळात काही माध्यमांना चीनकडून फंडिंग मिळाल्याचं लक्षात आले. ते भारतविरोधी प्रचार करत होते. त्यामुळे भारत सरकारने टेलिग्राफ अॅक्टच्या माध्यमातून महत्त्वाच्या तरतुदी केल्या आहेत”, असे फडणवीस यावेळी म्हणाले