एक्स्प्लोर
पंकजा मुंडे यांची कथित ऑडिओ क्लिप जशीच्या तशी
मुंबई/बीड: भगवानगडावरुन सुरु असलेल्या वादाने नवं वळण घेतलं आहे. कारण ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यामध्ये त्यांनी महंत नामदेवशास्त्री यांच्याविरोधात कायदा हातात घेण्याची भाषा केली आहे.
ऑडिओ क्लिपमध्ये काय म्हटलंय?
आता नामदेव शास्त्रींचं पुढे काय करायचं तो भविष्यातला विषय आहे. आता दसरा मेळावा करायचा आहे आपल्याला. त्यामुळे आता काही गलिच्छपणा आपल्याला होऊ द्यायचा नाही. आणि कुणी आपल्याविषयी बोललेलंही खपवून घ्यायचं नाही. आपण आता स्ट्राँग भूमिकेने जायचं. आता मी परळीमध्ये..मी म्हटलं तुम्हाला खेटायला वगैरे...तर माझे पण लोकं आहेतच...लोकांना मारुन, त्यांच्याचविरोधात केस करुन, त्यांनाच तडीपार करतो आम्ही,..आम्ही पण साधे नाहीत. कारण तुम्ही शेवटी नालायक लोकांशी लढा देता तर... ते नालायकही नाहीत..दारु पिऊन गोविंदआण्णासारख्या सिनिअर मानसाला आणि केशवदादांसारख्या लोकांच्या अंगावर चालले..म्हणून मी दादांच्या तिथंच राहून मारायले खरं. ते नालायकच आहेत ना ते पोरं..त्यांची काय हिंमत होते या मॉबमध्ये..आणि त्याच्यातलं अजून एक. दोन-तीन गोष्टी ध्यानात ठेवा, बाकीचं प्लॅनिंग मी टीमला सांगेन, टीम तुम्हाला सांगेल, तेवढं ऐका, स्वत:चं डोकं लावू नका प्लीज. कारण जास्त डोकं लावायचं नसतं आपण. साहेब काय म्हणायचे, गरम डोकं आहे आपलं...जास्त लावायचं नाही...मी खूप थंड ठेवलंय, बर्फ ठेवून ठेवून..माझं डोकं उठलं त्या दिवशी मला लक्षात आलं, ह्यांच्या अंगावर गेले ...मला ते सहन नाही झालं. मी ते कधीच सहन करणार नाही. (संपूर्ण ऑडिओ क्लिप ऐकण्यासाठी इथे क्लिक करा)
ती क्लीप ऐकून धक्का बसला, पंकजांनी सत्तेचा दुरुपयोग करु नये: नामदेवशास्त्री
पंकजां मुंडेंनी आपल्याला धमकी दिल्याची क्लिप ऐकून धक्का बसला अशी प्रतिक्रिया, नामदेवशास्त्री यांनी एबीपी माझाकडे दिली.
ती क्लिप पंकजा मुंडेंचे कार्यकर्तेच व्हायरल करीत असल्याचा आरोप नामदेवशास्त्री यांनी केला आहे.
‘माझं आजही पंकजावर मुलीप्रमाणे प्रेम आहे. पण धमकीची ती क्लिप ऐकून मला धक्का बसला आहे. पंकजानं सत्तेचा दुरुपयोग करु नये.’ असं नामदेवशास्त्री एबीपी माझाशी बोलताना म्हणाले
‘संताना मरणाची भीती नसते. त्या ऑडिओ क्लीपबाबत माझा काहीही आरोप नाही. पण त्या क्लीपनं मला धक्का बसला आहे. नेत्यांनी राजकारणासाठी एवढ्या खालच्या पातळीला जाऊ नये.’ असंही नामदेवशास्त्री म्हणाले.
पंकजा मुंडे राजीनामा द्या : धनंजय मुंडे
‘पंकजाताई मुंडे यांचं संभाषण गंभीर आहे. कायदा तयार करणारे कायदा हातात घेण्याची उघड भाषा करतात आणि सत्ता, पदाचा गैरवापर सुरु आहे. पंकजा मुंडेंनी राजीनामा द्यावा’ अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे.
‘कायदा हातात घेणाऱ्या अशा मंत्र्यांना मंत्रीपदावर राहण्याचा अधिकारच नाही. मुख्यमंत्री याप्रकरणी काय करणार याकडे आता आमचं लक्ष लागून राहिलं आहे.’ असंही धनंजय मुंडे म्हणाले.
भगवान गडाचा वाद नेमका काय?
भगवान गडावरील दसरा मेळावा आणि गोपीनाथ मुंडे हे समीकरण होतं. गोपीनाथ मुंडे यांचं दसरा मेळाव्याला भगवान गडावरुन भाषण होत असे. मात्र, त्यांच्या मृत्यूनंतर भगवान गडावर राजकीय भाषण होणार नाही, अशी भूमिका भगवानगडाचे महंत नामदेवशास्त्री सानप यांनी घेतली. त्याला वंजारी सेवा संघानं विरोध करत आक्रमक भूमिका घेतली. गेल्या वर्षी भगवानगडावरील दसरा मेळावा पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत झाला होता.
मात्र, गेल्या काही दिवसात नामदेवशास्त्री आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये वाद सुरु झाले. त्यानंतर या गडावरुन राजकीय भाषण होणार नाही, अशी भूमिका नामदेवशास्त्रींनी घेतली.
गोपीनाथ गडावरुन भाषण करावं
भगवानगडावरुन राजकीय भाषण करु नये असं सांगत नामदेव शास्त्री म्हणाले, “पंकजा मुंडेंनी गोपीनाथगड उभा केला आहे. त्याठिकाणी त्यांनी राजकीय भाषण करावं”.
वंजारी संघाचा इशारा
भगवानगडावरील दसरा मेळावा पंकजा मुंडेंच्या उपस्थितीमध्येच झाला पाहिजे, नाही तर तीव्र आंदोलन करु, असा इशारा वंजारी सेवा संघाच्या वतीनं देण्यात आला होता. तर दुसरीकडे पंकजा मुंडेचे येथे भाषण होणार नाही, अशी भूमिका गडाचे महंत नामदेवशास्त्री सानप यांनी घेतली होती.
संबंधित बातम्या:
भगवान गडावर येणारच, पंकजा मुंडेंचा व्हिडीओ मेसेज
भगवान गडावर ये, पण भाषण नको, नामदेवशास्त्रींची पंकजा मुंडेंना अट
दसऱ्याला भगवान गडावर येणारच: पंकजा मुंडे
महंत नामदेव शास्त्रींवर जीवे मारण्याच्या धमकीचा गुन्हा
भगवानगडावर राडा, नामदेव शास्त्री-पंकजा मुंडे समर्थक भिडले
भगवानगड दसरा मेळावा वादः नामदेव शास्त्रींचं मुख्यमंत्र्यांना पत्र
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement