(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pandharpur Vitthal Temple : चंद्रग्रहणामुळे विठुरायाच्या नित्योपचारात बदल, मात्र भाविकांना दर्शन सुरू
Pandharpur Vitthal Temple : चंद्रग्रहणाच्या कालावधीत विठ्ठल मंदिरात भाविकांना दर्शन खेळे असणार असून ग्रहण लागताना आणि ग्रहण सुटताना देवाला चंद्रभागेच्या पाण्याने स्नान घातले जाणार असल्याचे मंदिर पुजारी समीर कौलगी यांनी सांगितले.
पंढरपूर : पंढरपूरचं विठ्ठल मंदिर (Pandharpur Vitthal Temple) त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त (Tripurari Purnima) लक्ष लक्ष दिव्यांनी उजळलं. चातुर्मास संपल्यानंतर या दिवसाला पंढरपुरात विशेष महत्व आहे. काल रात्री विठ्ठल मंदिराला आधी आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली. तसंच मंदिर आणि परिसरात रांगोळीच्या पायघड्या घालण्यात आल्या. त्यानंतर मंदिरात आणि परिसरात लाखो पणत्या लावण्यात आल्या. या प्रकाशात मंदिर परिसर उजळून निघाला. आज चंद्रग्रहणालाही पंढरपूरचं विठ्ठल रखुमाई मंदिर भक्तांसाठी खुलं राहणार आहे.
दरम्यान आज होत असलेल्या चंद्रग्रहणाच्या कालावधीत विठ्ठल मंदिरात भाविकांना दर्शन खेळे असणार असून ग्रहण लागताना आणि ग्रहण सुटताना देवाला चंद्रभागेच्या पाण्याने स्नान घातले जाणार असल्याचे मंदिर पुजारी समीर कौलगी यांनी सांगितले. आज सकाळी विठुरायाला खिचडीचा नैवेद्य दाखविण्यात आला असून आता दिवसभर देवाला कोणत्याही अन्नमय पदार्थाचा नैवेद्य नसणार आहे. पंढरपूर परिसरात सायंकाळी 5 वाजून 52 मिनिटांनी ग्रहणाला सुरुवात होत असल्याने विठुरायाला पुरुषसूक्ताच्या मंत्रोच्चारात तर रुक्मिणी मातेला स्त्रीसूक्त म्हणत पहिले स्नान घातले जाईल . यानंतर 6 वाजून 19 मिनिटांनी म्हणजे ग्रहण संपल्यावर पुन्हा एकदा देवाला मोक्षाचे स्नान घालण्यात येणार आहे. संपूर्ण शुद्ध चंद्रबिंब दिसल्यावर देवाला अन्नाचा महानैवेद्य दाखविला जाणार आहे . ग्रहण काळात देवाचे दर्शन सुरु राहणार असून केवळ अभिषेक कालावधीत पदस्पर्श दर्शन बंद राहून मुखदर्शन सुरु राहील असे मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुडाळवंड यांनी सांगितले .
काल रात्री त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त विठ्ठल मंदिराला लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून टाकण्यात आले होते . आषाढ शुद्ध एकादशी ते त्रिपुरारी पौर्णिमा हा चार महिन्याचा अर्थात चातुर्मास संपवून देवाला जागे करण्यासाठी भगवान शंकर येतात आणि विष्णूचा कारभार भगवान शंकर त्यांच्या ताब्यात देतात अशी पुराणात मान्यता असल्याने या दिवसाला अनन्य साधारण महत्व आहे . काल रात्री विठ्ठल मंदिराला आधी आकर्षक फुलांची सजावट कार्नाय्त आली. यानंतर मंदिर आणि मंदिर परिसरात रांगोळीच्या पायघड्या घालण्यात आल्या. नंतर संपूर्ण विठ्ठल मंदिर आणि मंदिर परिसरात लाखोंच्या संख्येने पणत्या लावून संपूर्ण मंदिर परिसर उजळवून टाकण्यात आला होता.
अकलूज येथील अकलाई मंदिरात देखील पाच लाख पणत्यांचा वापर करून अनोखा दीपोत्सव करण्यात आला होता . यावेळी अकलाई मातेचे पूजन जयसिंह मोहिते पाटील यांनी सपत्नीक केले. या पूजेनंतर अकलूज पंचक्रोशीतील भाविकांनी दर्शन घेत मंदिर परिसरात इच्छेनुसार पणत्या लावत या दीपोत्सवात सहभाग घेतला.