पंढरपूर निवडणुकीचे दुष्परिणाम; निवडणूक ड्युटीला आलेल्या शिक्षकासह कुटुंबातील चौघांचा कोरोनामुळे मृत्यू
इलेक्शन ड्युटीला आलेल्या शिक्षकाला स्वतःसह कुटुंबातील आई, वडील व मावशीचे प्राण गमवावे लागले आहेत. पंढरपूर निवडणुकीसाठी सांगोला तालुक्यातील घेर्डी येथील प्रमोद माने हे शिक्षक मतदानाच्या ड्युटीला होते.

पंढरपूर : पंढरपूरची पोटनिवडणूक कोरोनाचे पीक वाढण्यासाठी अतिशय पोषक ठरली असून अनेकांना यामुळे प्राण गमवावा लागला आहे. जे या निवडणूक प्रक्रियेत सामील होते त्यांना याचा अधिक फटका बसला असून त्यांच्या संसर्गाने इतरांनाही आपले प्राण गमवावे लागत आहेत. एकट्या पंढरपूर शहरात मतदानानंतर 259 जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले असून ग्रामीण भागातील आकडे यात सामील नाहीत. अशीच अत्यंत भयावह अवस्था मंगळवेढा येथे झाली असून आत्तापर्यंत 50 पेक्षा जास्त नागरिकांना कोरोनाने शिकार बनवले आहे. ना हॉस्पिटलमध्ये बेड ना ऑक्सिजन ना रेमेडिसिवीर अशी अवस्था असताना अंत्यसंस्कारालाही ताटकळत थांबायची वेळ आली आहे.
गावेच्या गावे आजारी आहेत. हॉस्पिटलमध्ये जागा मिळत नसल्याने मंगळवेढा परिसरात आजारी रुग्ण मोठ्या संख्येने घरीच आहेत. या सर्व भयावह परिस्थितीला तत्कालीन कारण ठरलंय पोटनिवडणूक. देशात आणि राज्यात कोरोनाचे थैमान सुरु असतानाही निवडणूक कोरोना संपल्यावर घेतली असती तर किमान या शेकडो लोकांचे प्राण तरी वाचवता आले असते. नक्कीच सर्वत्र कोरोनाची दुसरी लाट घटक ठरत आहे मात्र पंढरपूर मंगळवेढ्यात निवडणूक प्रचारामुळे ही लाट गावोगावी घराघरात पोहोचली आणि आता त्याला आवर घालणे अवघड बनत चालले आहे.
सांगोला तालुक्यात असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला असून केवळ इलेक्शन ड्युटीला आलेल्या शिक्षकाला स्वतःसह कुटुंबातील आई, वडील व मावशीचे प्राण गमवावे लागले आहेत. पंढरपूर निवडणुकीसाठी सांगोला तालुक्यातील घेर्डी येथील प्रमोद माने हे शिक्षक मतदानाच्या ड्युटीला होते. येथून परत गेल्यावर त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यांच्यामुळे त्यांची पत्नी, मुलगा, आई, वडील व मावशी यांनाही कोरोनाची लागण झाली. प्रमोद यांचेवर सांगोला येथे सुरुवातीला उपचार करण्यात आले. मात्र तब्येत खालावल्याने त्यांच्या डॉक्टर भावाने त्यांना मुंबई येथे हलवले. मात्र प्रयत्नांची शिकस्त करूनही प्रमोद माने यांचे निधन झाले. यानंतर त्यांचे वडील वसंतराव, आई शशिकला व मावशी जया घोरपडे यांचाही कोरोनाने मृत्यू झाला. सुदैवाने त्यांची पत्नी व मुलगा याने कोरोनावर मात केली असली तरी या निवडणुकीमुळे केवळ शासकीय ड्युटी करणाऱ्या प्रमोद माने यांचे कुटुंब उध्वस्त झाले आहे.
निवडणुकीनंतर समोर येत चाललेली आकडेवारी ही केवळ कोरोना तपासणी केलेल्यांची आहे. ज्यांनी तपासणीच केली नाही पण ते घराघरात आजारी आहेत अशांची संख्या खूप मोठी आहे. जे पालकमंत्री प्रचारात आघाडीवर होते ते आता या रुग्णांसाठी कोविड केअर सेंटरचे उदघाटन करत आहेत. तर विजयी आमदार आता कोरोनाच्या कामात मग्न झाले आहेत. लोकांनी घरी न बसता तपासणी करून उपचार घेण्याचे आवाहन आता आमदार समाधान अवताडे करत असले तरी दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी थोडा संयम दाखवला असता तर हे मृत्यूचे तांडव पाहायची आणि भोगायची वेळ पंढरपूर मंगळवेढ्याच्या जनतेवर आली नसती. किमान आता तरी राज्य सरकारने या भागात एखादा विशेष कार्यक्रम राबवत कोरोनाला आळा घालण्याचे प्रयत्न नाही केले तर बळी गेलेल्या निष्पाप मृतात्मे आपणास कधीच माफ करणार नाहीत.
इतर बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
