महाराष्ट्र कोरोनाविरोधातील लढाई चांगली लढतोय, पंतप्रधानांकडून कौतुक
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात आज फोनवरुन बातचीत झाली. यावेळी महाराष्ट्राच्या कोरोनाविरोधात लढाईविषयी पंतप्रधानांनी कौतुक केलं.
मुंबई : महाराष्ट्र कोरोनाविरोधातील लढाई चांगली लढत आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं आहे. पंतप्रधानांनी आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरुन बातचीत केली. यावेळी कोरोनाविरुद्ध लढाईत महाराष्ट्र करत असलेल्या प्रयत्नांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून माहिती घेतली. तसंच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी मुकाबला करताना महाराष्ट्र चांगली लढाई लढतो आहे, असं सांगितले.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी देखील विशेषत: महाराष्ट्राला ऑक्सिजनच्या बाबतीत अधिक बळ मिळावे अशी विनंती केली आणि विविध उपाययोजनांची माहिती दिली. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी कसे नियोजन करत आहोत त्याविषयीही मुख्यमंत्री बोलले. पंतप्रधान आणि केंद्र सरकार हे कोरोना लढ्यात महाराष्ट्राला प्रथमपासून मार्गदर्शन करत असून त्याचा चांगला उपयोग राज्य सरकारला होत आहे. महाराष्ट्राच्या काही सूचना केंद्राने मान्यही केल्या याविषयीही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले.
अॅप आणि लसीकरणाबाबत मुख्यमंत्र्यांचं पंतप्रधानांना पत्र
कोविन अॅपमधील तांत्रिक बाबी आणि लसीकरणाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. राज्याला 18 ते 44 वयोगटाच्या लसीकरणासाठी नवं अॅप बनवण्याची राज्याला परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. तसंच महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात लसीकरण करायचं आहे, त्यासाठी लसीचा पुरवठा करावा, असंही त्यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.