(Source: Poll of Polls)
Covid-19 Oral steroid therapy : कोरोना रुग्णांसाठी तोंडाद्वारे 'स्टिरॉइड' उपचारपद्धतीचा वापर करणार!
WEB EXCLUSIVE Covid-19 Oral steroid therapy : कोरोनाबाधितांना बरं करण्यासाठी तोंडाद्वारे पंपाच्या साहाय्याने 'स्टिरॉइड' घेण्याच्या नवीन उपचारपद्धतीची भर पडणार आहे. येत्या काळात या उपचारपद्धतीचा डॉक्टरांना देण्यात येणाऱ्या मार्गदर्शक सूचनांमध्ये समावेश करण्यात येणार आहे.
मुंबई : कोरोनाबाधितांच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. रुग्णांची बेड्स मिळविण्याकरिता मोठी धावपळ होत आहे. या अशा परिस्थितीत रुग्ण लवकर बरे करण्यासाठी आता कोविडच्या उपचार पद्धतीत तोंडाद्वारे पंपाच्या साहाय्याने 'स्टिरॉइड' घेण्याच्या नवीन उपचारपद्धतीची भर पडणार आहे. काही दिवसातच या उपचारपद्धतीचा डॉक्टरांना देण्यात येणाऱ्या मार्गदर्शक सूचनांमध्ये समावेश करण्यात येणार आहे. राज्यातील डॉक्टरांचा टास्क फोर्स ह्या उपचारपद्धतीची शिफारस करणार असून काही दिवसातच या उपचार पद्धतीचा महाराष्ट्रात वापर करण्यात येऊ शकतो. मात्र विशेष म्हणजे ही उपचार पद्धती केवळ सौम्य ते माध्यम स्वरूपाच्या रुग्णांमध्ये वापरण्यात येणार असून यामुळे कोविडच्या रुग्णांमध्ये फुफ्फुसाला जी सूज येते ती कमी करण्यास मदत होऊ शकत असल्याचे वैद्यकीय तज्ञ सांगत आहेत.
सध्याच्या घडीला आपल्याकडे श्वसनविकारशी संबंधित किंवा अस्थमाचे रुग्ण पंपाद्वारे अशाच पद्धतीचे औषध घेत असतात. त्याच पद्धतीने हे स्टिरॉइड घेण्याची पद्धत आहे. मात्र डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय हे औषध घेऊ नये, असे सूचित करण्यात आले आहे. सध्या आपल्याकडे कोविडच्या रुग्णांना राज्यातील डॉक्टरांच्या टास्क फोर्सने उपचारपद्धतीच्या मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्याप्रमाणे उपचार दिले जात आहे. दिवसागणिक उपचार पद्धतीत नवीन संशोधन होत असल्याने नवनवीन उपचार पद्धती विकसित होत आहे.
याप्रकरणी राज्य कोरोना विशेष कृती दलाचे सदस्य डॉ. राहुल पंडित सांगतात की, "कोविडच्या रुग्णांमध्ये सुरुवातीच्या दिवसात तोंडाद्वारे पंपाच्या साहाय्याने बुडेसोनाईड स्टिरॉइड उपचारपद्धतीचा चांगला परिणाम असल्याचे दिसून आले आहे. याप्रकरणी या विषयातील डॉक्टरशी चर्चा करण्यात आली आहे. त्यामुळे आपल्या कोविडच्या उपचारपद्धतीत या औषधाचा समावेश केला जाणार आहे. त्याचप्रमाणे हे औषध हे सुरुवातीच्या काळात सौम्य ते माध्यम स्वरूपाच्या रुग्णांसाठी आहे. या उपचार पद्धतीचा वापर कोणाला करायचा हे रुग्णाला उपचार देणारे डॉक्टर ठरवतील. काही दिवसापूर्वीच या विषयाच्या अनुषंगाने ऑक्सफर्ड विद्यापीठचा अभ्यास लॅन्सेट रेस्पिरेटरी मेडिसिन या वैद्यकीय शास्त्रातील जरनल मध्ये प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यामध्ये रुग्णांना या उपचारपद्धतीचा प्रतिसाद चांगला असल्याचे दिसून आले आहे."
या उपचारपद्धतीत 14 दिवसांकरिता पंपाच्या साहाय्याने या औषधाचे दोन पफ्फस घेतल्याने रुग्णालयात भरती करण्यात येण्याची शक्यता कमी करत असल्याचे सौम्य ते मध्यम स्वरूपाच्या रुग्णात दिसून आल्याचे लॅन्सेट रेस्पिरेटरी मेडिसिन मधील अभ्यासात दिसून आले आहे.
ग्लोबल रुग्णालयातील श्वसनविकार तज्ञ डॉ. समीर गर्दे या उपचारपद्धतीबद्दल अधिक माहिती देताना सांगतात की, "ही उपचार पद्धती खरोखर चांगली आहे. याचा नक्कीच सुरुवातीच्या काळात फायदा होऊ शकतो. आम्ही अशा पद्धतीचे उपचार आमच्या अस्थमाच्या आणि श्वसन विकाराशी संबंधित रुग्णामध्ये या पूर्वी वापरत आहोत, त्यांच्यामध्ये चांगले परिणाम दिसत आहेत. त्याचपद्धतीने जर सुरुवातीच्या काळात कोविडच्या रुग्णांमध्ये ही उपचारपद्धती वापरली तर त्याचा नक्कीच फायदा होईल. यामुळे रुग्णांच्या फुफ्फुसांना जी सूज येते ती कमी होण्यास मदत होणार आहे."
तर पुणे येथील केईएम रुग्णालयातील श्वासविकार तज्ञ डॉ. स्वप्नील कुलकर्णी यांच्या मते, "हा एक चांगला पर्याय आहे. त्याचा वापर केल्यामुळे नक्कीच फायदा होईल. त्यामुळे आमचे जे काही जुने अस्थमाचे किंवा श्वासनविकारशी संबंधित रुग्ण कोविडचा संसर्ग होऊन भरती झाले होते. त्यांना फारसा या आजारच त्रास झालेला दिसत नाही कारण ते अशा स्वरूपाची उपचार पद्धती पूर्वीपासून घेत आहेत. मात्र या कोविडच्या या काळात हे औषध डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावे. हे औषध घेण्याची पद्धत आहे. ती बरोबर त्या पद्धतीने घ्यावे कारण ते औषध घशाद्वारे फुफ्फुसापर्यंत जाणे अपेक्षित आहे. जर ते घशातच जमा होऊन राहिले तर फंगल इन्फेक्शनचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे ते औषध डॉक्टरांच्या योग्य सल्ल्यानेच घ्यावे."
महत्त्वाच्या इतर बातम्या :