Plasma Premier League : प्लाझ्मा डोनेशन वाढीसाठी प्लाझ्मा प्रीमियर लीग!
Plasma Premier League : पुणे येथील वंदे मातरम संघटनेने या उपक्रमाची सुरुवात केली असून त्यांनी गेल्या वर्षभराच्या कोरोना काळात मोठे सामाजिक काम उभारले असून अन्नाची पाकिटे वाटप करणे, रुग्णांना मदत करणे तसेच आदी सामाजिक कामात सहकार्य करत आहे.
पुणे : गेल्या काही आठवड्यांपासून राज्यात कोरोनाचा हाहाकार वाढत असताना उपचारात वापरल्या जाणाऱ्या अनेक गोष्टीचा तुटवडा पडू लागला आहे. यामध्ये प्रामुख्याने लस,ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड्स, रेमेडेसिवीर आणि टॉसिलीझूम्याबी, ऍम्ब्युलन्स यांची कमतरता जाणवत आहे. त्याचबरोबर कोरोनाच्या उपचारात चांगली भूमिका निभावणारा 'प्लाझ्मा' याची राज्यात मोठ्या प्रमाणात टंचाई भासत आहे. बाकीच्या तुटवडा लागणाऱ्या गोष्टीची कमतरता प्रशासन इतर ठिकाणाहुन भरून काढू शकते. मात्र प्लाझ्मासाठी स्वतः वैयक्तीक कोरोबाधित नागरिकांना पुढे यावे लागणार आहे. याकरिता पुणे येथील सामाजिक संघटनेने पुढाकार घेतला असून त्यांनी या प्लाझ्मा डोनेशन वाढीसाठी प्लाझ्मा प्रीमियर लीग आयोजित केली आहे. यामध्ये राज्यातील कुणीही रजिस्टर्ड गणेश मंडळ, सामाजिक संघटना सहभागी होऊ शकतात, या स्पर्धेचा कालावधी 14 एप्रिल ते 15 मे इतका असणार असून या काळात जी संघटना बाधित लोकांचे मनोबल उंचावून अधिक 'प्लाझ्मा' दान करण्यासाठी प्रोत्साहित करेल ते या स्पर्धेचे मानकरी ठरणार आहेत.
पुणे येथील वंदे मातरम संघटनेने या उपक्रमाची सुरुवात केली असून त्यांनी गेल्या वर्षभराच्या कोरोना काळात मोठे सामाजिक काम उभारले असून अन्नाची पाकिटे वाटप करणे, रुग्णांना मदत करणे तसेच आदी सामाजिक कामात सहकार्य करत आहे. वर्षभर अनेक वेळा त्यांना रक्तदानासाठी किंवा प्लाझ्मा दानासाठी फोन येत होते. मात्र वैयक्तिक पातळीवर ते काम त्यावेळी होत असे. मात्र प्लाझ्माची गरज संपूर्ण राज्यात असून यासाठी काहीतरी एकत्रित प्रयत्न व्हायला हवे होते, याकरिता या संघटनेने या उपक्रमाची सुरुवात केली आहे.
याप्रकरणी वंदे मातरम संघटनेचे वैभव वाघ यांनी एबीपी माझा डिजिटलशी बोलताना सांगितले की, "सध्याच्या काळात कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी प्लाझ्माची मोठ्या प्रमाणात गरज भासत आहे. ही गरज ओळखून आमच्या संघटनेने एका स्पर्धेचे आयोजन करण्याचं ठरविले असून त्याला प्लाझ्मा प्रीमियर लीग नाव देण्यात आले आहे. यामध्ये राज्यतील कोणतीही सामाजिक रजिस्टर्ड संघटना सहभागी होऊ शकते. या स्पर्धेची सुरुवात ही 14 एप्रिलपासून सुरु करण्यात आली असून ती 15 मे पर्यंत चालणार आहे. या कालावधीत ज्या संघटना, मंडळ आमच्याकडे नाव नोंदणी करतील त्यांना या स्पर्धेत सहभागी होता येईल. या कालावधीत या मंडळांनी ज्या ठिकाणी आहेत, त्या ठिकाणी राहून आपाल्या आजूबाजूच्या भागातील जे कोरोनाबाधित रुग्ण होते, त्यांना प्रोत्साहित करून प्लाझ्मा दान करण्यासाठी उत्तेजन द्यायचे आहे. जी संघटना सगळ्यात जास्त प्लाझ्मा दान करण्यात यशस्वी ठरेल, त्यांना रोख रक्कम आणि सुदंर चषक देण्यात येणार आहे. पारितोषिक सगळ्यांनाच मिळणार आहे. मात्र रोख रखमेच्या पारितोषिकाकरिता संघटनेने 100 च्या वर प्लाझ्मा दाते तयार करायचे आहेत. 15 मे अंती त्यांनी सर्व पुराव्याशी माहिती संघटनेला देणे अपेक्षित आहे. त्यातून विजयी टीमची घोषणा करण्यात येणार आहे."
त्यांनी पुढे असेही सांगितले की, "सदर स्पर्धा महाराष्ट्रासाठी असून संघटना जेथे आहे. तेथे त्यांनी काम करणे अपेक्षित आहे. आतापर्यंत पुणे, सातारा, ठाणे, पिंपरी चिंचवड येथील आकुर्डी आणि निगडी, नाशिक, राजगुरूनगर, जळगाव येथील मंडळ आणि संघटनांनी या स्पर्धेसाठी नाव नोंदणी केली आहे. मुळात स्पर्धेचा हेतू पुरस्कार मिळविणे नसून त्यामुळे प्लाझ्मा दाना बद्दल लोकांमध्ये जनजागृती होईल आणि प्लाझ्मा डोनेशन वाढेल हा या स्पर्धा आयोजनाचा मुख्य हेतू आहे. आमची ही स्पर्धा जाहीर झाल्यानंतर राज्यातील काही मंडळांनी याच संकल्पनेवर आधारित स्पर्धा सुरु करण्यासाठी आम्हाला विचारले होते. तर आम्ही त्यांना तत्काळ होकार दिला आहे."
या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक 50,000 रुपये आणि चषक, दुसरे पारितोषिक 30,000 रुपये आणि चषक आणि तृतीय पारितोषिक 20,000 रुपये आणि चषक असे स्वरूप आहे. सहभागी सर्व टीमना पारितोषिक देण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या आयोजनाकरिता वंदे मातरम संघटनेसोबत, अखिल सदाशिव शनिवार नारायण पेठ आंबेडकर जंयती महोत्सव समिती आणि युवा फिनिक्स सोसायटीचा सहभाग आहे.
तसेच या संघटनेतर्फे काही दिवसापूर्वीच प्लाझ्मा स्ट्राईक नावाचा उपक्रम सुरु करण्यात आला असून त्यांनी याकरिता पुणे महापालिकेकडून कोरोनाबाधित रुग्णांची माहिती घेतली असून 80 हजार रुग्णांची माहिती प्राप्त झाली असल्याचे संघटनेचे प्रदेशाध्यक्ष वाघ यांनी सांगितले. त्यांनी त्या माहितीतून 45 वर्षाखाली कोरोनाबाधित रुग्णाची यादीतील नावे वेगळी काढली असून ती कार्यकर्त्यांना दिली आहे. संघटनेचे कार्यकर्ते त्यांना फोन करून प्लाझ्मा दान प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी विनंती करीत आहेत. हा उपक्रम मात्र पुणे या शहराकरिता सीमित आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी या 9890798903 क्रमांकावर संपर्क साधावा.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Blog | आता 'यंगिस्तानची' जबाबदारी!
- Corona Vaccination in India : सरसकट लसीकरणासाठी...
- BLOG | संसर्ग रोखणे : आव्हान