एक्स्प्लोर
बेताल बरळणाऱ्या दानवेंवर विरोधकांची तोफ

मुंबई : शेतकऱ्यांबद्दल असंसदीय भाषेत बेताल वक्तव्य करणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना विरोधकांनी झोडपून काढले आहे. शिवाय, राज्यातील शेतकऱ्यांमधूनही संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. दानवे पुन्हा एकदा बरळले! राज्य सरकारने एवढी तूर खरेदी केली तरी रडगाणं चालूच आहे, अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलं आहे. ते आज जालन्यातील कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. कापसाला, तुरीला, डाळीला भाव नाही, असली गाणी बंद करा, असं दानवे म्हणाले. एवढंच नाही तर यावेळी दानवेंनी शेतकऱ्यांसंदर्भात असंसदीय भाषेचा वापरही केला. डोक्यात सत्तेची नशा गेल्याने दानवेंकडून बेताल वक्तव्य : अशोक चव्हाण
“इतकी तूर खरेदी करूनही शेतकऱ्यांचे रडगाणे सुरुच आहे. एक लाख टन तूर खरेदीला परवानगी दिली तरी रडतात xxx.” असे वक्तव्य करून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले असून, सत्तेची नशा दानवेंच्या डोक्यात गेल्याने दानवे शेतकऱ्यांबाबत असंसदीय शब्द वापरून अशी बेताल वक्तव्ये करत आहेत. राज्यातले शेतकरी भाजप नेत्यांची सत्तेची नशा उतरवल्याशिवाय राहणार नाहीत.” अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे.दानवेंची मस्ती शेतकरीच जिरवतील : धनंजय मुंडे
“शेतकऱ्यांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या दानवेंची जीभ झडायला पाहिजे. शेतकऱ्यांबद्दल द्वेषच यातून दिसून येतो. फक्त दानवे नव्हे, संपूर्ण सरकारमध्ये शेतकऱ्यांबद्दल असाच द्वेष आहे. यांना शेतकरी समूहच नष्ट करायचा आहे. शेतकऱ्यांबद्दल असे गलिच्छ शब्द वापरणाऱ्यांची मस्ती शेतकरी जिरवल्याशिवाय राहणार नाहीत.”, असा घणाघात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दानवेंवर केला.रावसाहेब दानवे बेजबाबदार : पृथ्वीराज चव्हाण
“असं बेजबाबदार वक्तव्य करणं ही काही रावसाहेब दानवेंची पहिली वेळ नाही. इतक्या महत्त्वाच्या पदावर असताना त्यांनी भान ठेवायला हवं. अर्थात ती भाजपची अंतर्गत गोष्ट आहे.”, अशी टीका महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.सत्तेतून आलेला माज दानवेंच्या वक्तव्यातून स्पष्ट दिसतो : डॉ. राजू वाघमारे
“सत्तेचा आलेला उन्माद, माज हा रावसाहेब दानवेंच्या वक्तव्यातून स्पष्ट दिसतो. असं बोलणं भाजपची परंपरा आहे. शेतकऱ्यांच्या दु:खाविषयी या सुटा-बुटातल्या सरकारला जराही प्रेम नाहीय.”, अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी केली.दानवेंच्या वक्तव्याचा व्हिडीओ :
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
रायगड
व्यापार-उद्योग
भारत























